सदा सर्वदा स्टार्टअप : स्टार्टअप्सचा पुनर्विचार

करोना हे एक निमित्त होतं, स्टार्टअप्ससाठी पुनर्विचार करण्याचं..

डॉ. अपूर्वा जोशी : 

जग तुमच्या बिझनेस प्लान्सप्रमाणे चालत नसतं, नैसर्गिक आपत्ती किंवा विपदादेखील व्यवसाय करताना गृहीत धराव्याच लागतात हा एक नवीन धडा या करोनामुळे मिळालाच, पण दबक्या आवाजात का होईना जगभरातील माध्यमं आता हे वास्तव मान्य करायला लागली आहेत की ७०% स्टार्टअप्स अपयशी ठरतात. करोना हे एक निमित्त होतं, स्टार्टअप्ससाठी पुनर्विचार करण्याचं..

२०२० साल उजाडेपर्यंत जगात स्टार्टअप या शब्दाची जणू त्सुनामीच आली होती. गुंतवणुकांची होणारी कोटीच्या कोटी उड्डाणे, जगभरात त्यांचे गाजलेले आयपीओ, त्यांच्या मालकांच्या अपुऱ्या शिक्षणाचं केलं गेलेलं उदात्तीकरण यावर वर्तमानपत्रात मथळेच्या मथळे झळकत होते. भारतातल्या स्टार्टअपमध्ये २०१८ मध्ये बक्कळ गुंतवणूक केली गेली, २०१९ मध्ये ती अजून उंचावली, २०२० मध्ये ती नवनवीन शिखरं पादाक्रांत करेल असं वाटतच होतं की करोनाने स्टार्टअप्सना दाहक वास्तवाची जाणीव करून दिली.

जग तुमच्या बिझनेस प्लान्सप्रमाणे चालत नसतं, नैसर्गिक आपत्ती किंवा विपदादेखील व्यवसाय करताना गृहीत धराव्याच लागतात हा एक नवीन धडा या करोनामुळे मिळालाच, पण दबक्या आवाजात का होईना जगभरातील माध्यमं आता हे वास्तव मान्य करायला लागली आहेत की ७०% स्टार्टअप्स अपयशी ठरतात. करोना हे एक निमित्त होतं, स्टार्टअप्ससाठी पुनर्विचार करण्याचं..

व्हेंटिलेटर, मास्क, टॉयलेट पेपर बनवणाऱ्या कंपन्यांनी करोनाचा प्रश्न अधोरेखित करून गुंतवणूकदार आकर्षित करायला सुरुवात केली. पण प्रत्येक व्यवसाय करोनाच्या आपत्तीशी स्वत:ला जोडून पाहू लागला. यातूनच शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडू लागला. शिक्षक मंडळी झूम, गूगल क्लासरूम सारख्या तंत्रज्ञानाकडे आकर्षित झाली. बऱ्याच शिक्षकांनी झूम क्लासेस घेतले. या कालावधीत फेसबुक उघडलं की किमान १० कंपन्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या जाहिराती दिसायला लागल्या, इन्स्टाग्रामवर तर प्रत्येक स्टोरी पाहताना मध्ये एका  शिक्षणसंस्थेची व्हिडीओ लर्निगची जाहिरात हमखास दिसायला लागली. करोनानंतर शिक्षणाचं स्वरूप बदलणार हे आता जवळपास निश्चित झालंआहे. ‘युडेमी’ या व्हिडीओ लर्निग कंपनीने माहिती प्रसिद्ध केली त्याप्रमाणे करोना लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यात विद्यार्थ्यांमध्ये ४२५% वाढ नोंदवली गेली. माझ्या ओळखीतले अनेक चेहरे फेसबुकवर लाइव्ह जायला लागले, पाककलेपासून ते क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार कसे करावेत यावर ज्ञान देऊ लागले. एकूणच करोनामुळे ज्ञानदानाचे कार्य जोरात सुरू झाले. कोणतीही नवीन लाट आली की त्यावर स्वार होऊन आपली नय्या पार करू पाहणारे अनेक असतात आणि इथेच खरी गोची होते. २००० साली डॉटकॉम तेजीत आल्यावर अनेक कंपन्या सुरू झाल्या, पण तितक्याच लवकर तो फुगा फुटला. आता लाट आहे ती व्हेंटिलेटर्स, मास्क, टॉयलेट पेपर इत्यादींची पण त्याहीपेक्षा जास्त लाट आहे ती शैक्षणिक व्यवसायांची.

मध्यंतरी मी ‘इंडिया फोरेन्सिक’ या संस्थेचे शैक्षणिक संचालक वेदांत संगीत यांच्याशी बोलत होते, जोखीम व्यवस्थापनात शिक्षण देण्याचं काम ही संस्था गेल्या कित्येक दशकांपासून करते आहे. करोनामुळे  लॉकडाऊन झाल्यानंतर आमचा व्यवसाय बंदच पडायची पाळी आलेली, आम्ही ना ई लर्निग द्यायचो, ना झूमवर शिक्षण.. पण या कालावधीत आम्हाला ई लर्निग कोर्सेस सुरू करणंच भाग पडलं. पण ते करत असताना आम्ही बदललेल्या परिस्थितीचा बराच अभ्यास केला, आम्ही आमचे काही उपक्रम हे ‘युडेमी’ आणि तत्सम संकेतस्थळांवर काही दिवस चालवून पाहिले, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया गोळा केल्या आणि आमच्या लक्षात आले की भारताबाहेरून आमच्या काही कार्यक्रमांना खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे, मग आम्ही स्वत:च रिब्रँडिंग करायचे ठरवले, बाहेरच्या देशातील विद्यार्थ्यांना केवळ इंडिया नावामुळे शिक्षण घेण्यासाठी संकोच वाटायला नको म्हणून हा खटाटोप, पण मग यासाठी खूप जाहिरात करावी लागणार म्हणून मग या नवीन कंपनीसाठी गुंतवणूक हवी, असे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक क्षेत्रातल्या स्टार्टअपची कथा यापेक्षा फार काही वेगळी नसते. साधारणपणे या क्षेत्रात सध्या दोन प्रकारचे खेळाडू आहेत, एक जे स्वत:ची बाजारपेठ बनवतात जिथे शिक्षक आणि विद्यार्थी यांची गाठ घालून दिली जाते आणि मग त्या कोर्सच्या फीमधून काही कमिशन कमावले जाते तर दुसऱ्या प्रकारचे खेळाड ूअसतात ‘इंडिया फोरेन्सिक’सारखे, ज्यांना कन्टेन्ट क्रिएटर्स म्हटले जाते. यांच्याकडे फक्त ज्ञानच नसतं तर विविध फॉरमॅट्समध्ये ते ज्ञान वितरित करायची सुविधा असते. मुकेश अंबानी म्हणतात तसे डेटा हे भविष्यातले तेल आहे, कंटेंट हाच भविष्यातला राजा आहे,  पण आता या क्षेत्रात अपग्राड, अनाकडेमी, युडेमी असे अनेक नवीन-जुने खेळाडू बाजारपेठ बनवत आहेत. अर्थातच, सध्या विद्यार्थ्यांनी  तिथे यावं यासाठी प्रचंड  प्रमाणात जाहिरातींवर खर्चही  केला जातो आहे, पण करोनापूर्व स्टार्टअप्स आणि शिक्षणक्षेत्रातील स्टार्टअप्स यात थोडा फरक नक्कीच आहे.

फेसबुक आणि अमेझॉनने कित्येक वर्ष तोटय़ात धंदा केला, ग्राहकांना पहिली सवय लावली, त्यासाठी गोष्टी फुकट दिल्या, अमेझॉनने डिस्काउंट्सचा भडिमार केला आणि जशी त्यांना सवय लागली तशी डिस्काउंट  बंद केली. ग्राहक जिंकण्यात आणि त्यांना सवय लावण्यातच ८—१० वर्षे त्यांनी घालवली आणि हाच यशाचा फॉम्र्युला आहे असं अवघ्या जगावर बिंबवलं गेलं. तोटा जेवढा मोठा तेवढी गुंतवणूक जास्त असा या स्टार्टअपचा  जणू दंडकच पडून गेला. काहीही झालं तरी विक्री वाढवा, तोटा वाढला तरी चालेल विक्री वाढलीच पाहिजे या तत्त्वावरच स्टार्टअप मार्गक्रमण करू  लागले, विक्री करण्यासाठी ही मंडळी काहीही करू लागली होती, एक रुपया विक्री दाखवायला या स्टार्टअप्स दोन किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा खर्च करतात आणि वर तोटा वाढला की गुंतवणूकदारांकडे हात पसरायला मोकळे.. पण करोना उत्तर काळात निर्माण झालेल्या स्टार्टअप्स या कदाचित हा विचार दूर सारतील आणि पहिले नफ्याचा विचार करतील, अशी अंधूकशी आशा आता वाटायला लागली आहे.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about startup success startup growth

Next Story
व्हिवा
ताज्या बातम्या