वेदवती चिपळूणकर
एखाद्या व्यक्तीची एकदा एक ‘स्क्रीन इमेज’ किंवा ‘मीडिया इमेज’ तयार झाली की ती पुसणं किंवा त्यामागच्या व्यक्तित्वाची ओळख करून देणं हे फार अवघड काम असतं. त्या व्यक्तीने ती इमेजही अत्यंत कष्टाने मिळवलेली असते. मात्र त्या फ्रेमच्या चौकटीपलीकडे एक माणूस आहे आणि त्याचे स्वतंत्र विचार, धारणा, मतं आहेत या गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. माध्यमात काम करताना कधी हरवलेलं, कधी दडवलेलं असं या ‘माध्यमी’चं व्यक्तिमत्त्व समोर आणण्याचा प्रयत्न या सदरातून करत आहोत.
एका नजरेने भिरभिरणारी अक्षरं वाचत, एक नजर सतत कॅमेऱ्यामधून प्रेक्षकांकडे ठेवत, एक कान निमंत्रितांच्या बोलण्याकडे तर एक कान प्रोडय़ुसरच्या सूचनांकडे ठेवत काम करणाऱ्या आणि या सगळ्याची तसूभरही जाणीव चेहऱ्यावर न दाखवणाऱ्या व्यक्तीला ‘न्यूज अँकर’ म्हणतात! चॅनेलचा चेहरा बनून ते सगळ्या शिव्याशापांची जबाबदारी पेलत असतात, वेळप्रसंगी उत्तरंही देत असतात आणि वेळप्रसंगी दुर्लक्षही करत असतात. अशाच तारेवरच्या कसरतीतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे ‘नम्रता वागळे’!
रत्नागिरीमधल्या अगदी लहान गावातून आल्यावर आधी पुणे आणि मग मुंबईच्या स्पर्धात्मक वातावरणात नम्रताने स्वत:ला टिकवून ठेवलं. ‘स्ट्रगल हा प्रत्येकालाच करावा लागतो’ हे ब्रीदवाक्य मानणारी नम्रता स्वत:च्या धडपडीला ‘प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि करिअरचा अविभाज्य भाग’ इतकंच महत्त्व देते. अशा विचारांच्या नम्रताने स्वत:चं करिअरही स्ट्रगल करूनच उभं केलं आहे. पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना कॉल सेंटरमधली नाइट डय़ुटी आणि सकाळी कॉलेज या दिनक्रमातून तिने अभ्यास केलेला आहे. ‘या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकानेच स्ट्रगल केलेला आहे, धडपड केलेली आहे, अनेक गोष्टींना तोंड दिलेलं आहे. खरं तर करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सगळ्यांनाच स्ट्रगल करावा लागतो. आपण स्ट्रगल केला म्हणजे फार काही मोठं केलं असं कोणालाच मानण्याचं काही कारण नाही. करिअर घडवू पाहणारा प्रत्येकजण हा ती स्ट्रगल स्वत:साठी करत असतो. जगाला त्याच्या स्ट्रगलची गरज नसते. त्यामुळे जी गोष्ट आपण स्वत:साठी करतो आहोत त्याचा गवगवा करण्याची, अवडंबर करण्याची काहीच गरज नाही’, अशी थेट सरळ भूमिका ती मांडते.
पत्रकारिता म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं आणि स्वत:हून खड्डय़ात उडी मारणं हा समज अजूनही कायम आहे. मुलींनी पत्रकारिता करणं म्हणजे त्यांना खून झालेली डेड बॉडी बघवणार नाही, राजकीय मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार नाही, अपघाताची दृश्यं सहन होणार नाहीत, राजकीय आणि आर्थिक बातम्यांमधली गणितं आणि समीकरणं तर त्यांच्या डोक्यावरूनच जातील, इत्यादी इत्यादी सर्व समजांना छेद देत अनेक मुली आज पत्रकारितेत स्थिरावल्या आहेत आणि उत्तम प्रगती करत आहेत. नम्रताने ‘एबीपी माझा’ वाहिनीवर वृत्त निवेदक म्हणून येण्याअगोदर सहा वर्ष ‘ऑन फील्ड जर्नलिझम’ केलेलं आहे. ‘मी ऑन फील्ड रिपोर्टर म्हणून काम करत असताना माझ्या बॉसनी मला मी मुलगी आहे म्हणून कधीच कोणत्या फील्डवर जाण्यापासून रोखलं नाही. पुरुषप्रधान म्हणावंसं हे क्षेत्र, खरं तर सगळीच क्षेत्रं तशी म्हणायला हवीत, पण या क्षेत्रातले धोके वेगळे, समस्या वेगळ्या! माझ्या सुदैवाने हा भेद जाणवू न देणारे आणि प्रत्येक गोष्टीत मला पुढे जायला मदत करणारे सिनिअर्स मला भेटले’, असं ती सांगते. त्या वेळची आठवणही ती सांगते, ‘जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाले तेव्हा सगळ्यात आधी तिथे पोहोचलेली रिपोर्टर मी होते. मला ते दृश्य बघवणार नाही किंवा मी काय तिथे जाऊन बातमी देणार असा कोणताच समज ना माझ्या बॉसनी करून घेतला, ना माझा करून दिला! बॉम्बस्फोटानंतर एका वर्षांने पुन्हा तिथे जाऊन स्टोरी करायलाही मलाच सांगितलं गेलं. मी तिथे गेल्यावर साहजिकच मला एका टेकमध्ये स्टोरी नाही करता आली, मला पाच-सहा टेक घ्यावे लागले आणि हेच माझ्या माणूस असण्याचं लक्षण आहे असं माझ्या सरांनी मला सांगितलं’. मुलगी म्हणून स्वत:ला कमकुवत न मानणाऱ्या किंवा मुलगी असल्याचा अॅडव्हान्टेजही न घेणाऱ्या मोजक्या समानतावादी स्त्रियांमध्ये नम्रताचा समावेश होतो, असं म्हणायला हरकत नाही.
स्क्रीनवरचा चेहरा कायम तसाच सांभाळणं आणि ‘स्त्री’पणा जपणं या दोन्ही बाबींचा समतोल साधण्यात माध्यमातल्या अनेक स्त्रिया भरडल्या गेल्याची उदाहरणं काही नवीन नाहीत. या सगळ्यासोबतच टीव्हीच्या चौकटीत हरवून न जाता स्वत:ला व्यक्ती म्हणून घडवण्याचं आव्हानही ताकदीने पेलावं लागतं. ‘प्रत्येकीने आपापल्या प्रायोरिटीज ठरवायला हव्यात आणि सगळ्यात मोठी प्रायोरिटी ही आपण स्वत: असायला हवं. कुटुंब, करिअर, जबाबदाऱ्या या सगळ्यात आपल्याला कशात आनंद मिळतोय आणि समाधान मिळतंय हे ठरवायला हवं’, असं ती सांगते. ‘वुमनहूड म्हणून ज्या लग्न किंवा प्रेग्नन्सी या गोष्टींबद्दल आपण बोलतो तिथे प्रत्येकीने आपल्या मनाची तयारी आपल्या प्रायोरिटीनुसार करायला हवी. माझ्या वैयक्तिक मतानुसार जर निसर्गाने आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलंय तर निसर्गाने आपल्याकडून काही अपेक्षाही केल्या आहेत आणि त्या पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे, असं मी मानते. त्यामुळे आई होण्यासाठी जो गॅप घ्यावा लागेल तो घेण्यासाठी मानसिक तयारी आधीपासून करणं हे मी जास्त श्रेयस्कर समजते’. नम्रताच्या म्हणण्यानुसार स्वत:चा पेला पूर्ण भरला तरच मग इतरांना आनंद देता येतो. त्यामुळे स्वत:कडे लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं!
नम्रताने कधीकाळी डिफेन्स फोर्सेसमध्ये जाण्याची स्वप्नं बघितली होती, त्यासाठी जोमाने तयारीही केली होती. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला आपसूकच एक धार आहे. ती तिच्या विचारांवर, मतांवर आणि धारणांवर ठाम आहे. तिचे विचार, तिची ट्रेकिंगची आवड, तिची फोटोग्राफी याबद्दल ती तिच्या फेसबुक पेजवर व्यक्त होत असते. नम्रताच्या मते, ‘स्क्रीनच्या पलीकडे तुमचं अस्तित्व आहे. तुम्ही स्वत:ला एक्स्प्रेस करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वत:चा अधिकाधिक शोध घेत नाही. त्यामुळे व्यक्त होणं गरजेचं आहे’.
viva@expressindia.com