scorecardresearch

‘जॉब’ सज्ज होताना..

सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो कुठल्याही नोकरीच्या अर्जात स्वत:ला प्रेझेंट करण्याचा आणि कॉलेजच्या मार्काच्या शर्यतीत, अभ्यासक्रम संपवण्याच्या शिक्षणात आपल्याला स्वत:ला नेमकं प्रेझेंट कसं करायचं हे कुणीच शिकवत नाही.

job interview viva1
फोटो सौजन्य़ : फायनान्शिअल एक्सप्रेस

विशाखा कुलकर्णी

कॉलेज नुकतंच संपलेलं असतं.. फुलपाखरासारखे छान छान दिवस संपून आपल्याला आता ‘जॉब’ शोधायचा आहे ही जाणीव झाल्यावर ‘दुनियदारी’शी ओळख होऊ लागते आणि मग सुरू होते कसरत नोकरीसाठी अर्ज देणे.. मुलाखती.. होकार, नकार आणि ऑफर्स. त्याचा पहिला टप्पा असतो तो यासाठी स्वत:ची व्यावसायिक ओळख करून देण्याचा.. 

सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो कुठल्याही नोकरीच्या अर्जात स्वत:ला प्रेझेंट करण्याचा आणि कॉलेजच्या मार्काच्या शर्यतीत, अभ्यासक्रम संपवण्याच्या शिक्षणात आपल्याला स्वत:ला नेमकं प्रेझेंट कसं करायचं हे कुणीच शिकवत नाही. अनेकदा इंटरनेटवरचे-मित्रमंडळींचे फॉरमॅट वापरून तयार केलेला सीव्ही आपलं नाव डकवून पाठवून दिला जातो. अपुऱ्या आणि लक्षवेधी नसलेल्या सीव्ही आणि अर्जामुळे आपण अगदी परफेक्ट उमेदवार असलो तरीही बाजूला फेकले जातो.  त्यामुळे पदवीधर होत असतानाच आपल्या नोकरीच्या अर्जावर आणि आपण स्वत:ला कशा प्रकारे नोकऱ्यांच्या शर्यतीत उभे करतो यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

आपण कुठलाही नोकरीचा अर्ज भरल्यावर मुलाखत घेणारी व्यक्ती आपला सीव्ही सर्वप्रथम बघते. हा सीव्ही लक्षात राहणारा आणि सुव्यवस्थित असा तयार केल्यास आपल्याला नोकरी मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. सीव्ही तयार करताना केवळ आपली आहे ती माहिती कुठल्या तरी सरधोपट फॉरमॅटमध्ये लिहिण्यापेक्षा तो शक्य तितका ‘पर्सनालाइझ’ कसा करता येईल हे पाहावे. केवळ ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट आणि टाइम्स न्यू रोमन फॉन्टपेक्षा सौम्य आणि गडद रंगसंगती वापरून, एखादा चांगला फॉन्ट वापरूनदेखील सीव्ही आकर्षक होऊ शकतो; परंतु हे करताना आपला सीव्ही अजिबात बटबटीत दिसता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला कायम आत्मस्तुती करू नये याचे धडे दिलेले असतात. सीव्हीमध्ये मात्र आपल्याला आपल्यात असलेली कौशल्ये चांगल्या शब्दांत आणि योग्य पद्धतीने मांडणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले लहान-लहान गुणदेखील सीव्हीमध्ये मांडल्यास सीव्ही उठून दिसू शकतो, पण यात मुख्य अडचण ही की, बऱ्याचदा एखादे कौशल्य कोणत्या शब्दांत मांडायचे हा प्रश्न असतो. म्हणूनच, आपल्या क्षेत्रातल्या कौशल्यांचे ‘कीवर्डस’ आपण इंटरनेटवर सर्च करू शकतो आणि त्यातील आपल्याला लागू होणारे कीवर्डस वापरून आपण आपला सीव्ही लिहू शकतो. सीव्हीच्या सुरुवातीलाच दोन- किंवा जास्तीत जास्त तीन ओळींमध्ये स्वत:ची ओळख, शिक्षण आणि पद याची माहिती द्यावी. नोकरीचे अर्ज पाहणाऱ्या सगळय़ांकडे शेकडो अर्ज आलेले असतात, आपण कमीत कमी शब्दांत आपली ओळख करून दिल्यास आपल्या अर्जाकडे लक्ष वेधले जाऊन तो पूर्ण वाचला जाऊ शकतो. अर्जात आपला प्रोफेशनल फोटो, संपर्क इत्यादी माहितीचा स्पष्ट उल्लेख असावा, परंतु वैयक्तिक माहितीमध्ये वैयक्तिक छंद तसेच कौटुंबिक माहितीचा उल्लेख नोकरीसाठी संबंध नसल्यास कटाक्षाने टाळावा. ऑफिस अथवा कंपनीमधील नोकऱ्यांच्या अर्जाची छाननी करताना आपण राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी केली नसल्यास आपल्या गायन, खेळ, (यात अनेक जण ‘टीव्ही पाहणे’ हेदेखील लिहितात!!) असल्या छंदांशी त्यांना काहीही देणे-घेणे नसेल ही बाब लक्षात घ्यावी.

याव्यतिरिक्त, कामाचा किंवा एखाद्या प्रोजेक्टवर काम केल्याचा अनुभव असल्यास त्याच्या उल्लेखासोबत आपण त्या ठिकाणी नेमके काय केले हे एखाद्या ओळीत नमूद केल्यास आपली त्या कामामधील भूमिका समोरच्यांपर्यंत पोहोचते. याचबरोबर लक्षात घेण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे वेगवेगळय़ा पदांसाठी अर्ज करताना आपण अर्ज करत असलेल्या प्रत्येक पदासाठी सीव्ही योग्य कसा होईल याची खबरदारी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ- एखादा सायन्स शाखेचा उमेदवार एकाच वेळी शिक्षक आणि एखाद्या कंपनीमधील पदासाठी अर्ज करत असेल तर या दोन्ही अर्जात वेगवेगळे सीव्ही वापरून त्या-त्या पदासाठी आवश्यक असणारी कौशल्ये अधोरेखित करता येतील. आपल्या सीव्हीमधील स्पेलिंग ऑनलाइन मोफत उपलब्ध असलेल्या ‘ग्रामरली’सारखे टूल्स वापरून योग्य आहेत की नाही हे आवर्जून तपासावे, चुकूनही चुकीचे स्पेलिंग सीव्हीमध्ये गेल्यास ते निष्काळजीपणाचे लक्षण मानले जाते. यासोबतच आपला सीव्ही पीडीएफमध्ये सेव्ह करून त्याला आपले नाव उश् अशा प्रकारचे नाव देऊनच तो कुणालाही पाठवावा.

सध्याच्या काळात नोकरीसाठी उमेदवार गृहीत धरताना आवर्जून केली जाणारी गोष्ट म्हणजे त्या उमेदवाराच्या सोशल मीडियाची तपासणी. आपला वैयक्तिक सोशल मीडिया नोकरी देणाऱ्यांकडून आपल्याला गृहीत धरण्याआधी पाहिला जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या वैयक्तिक सोशल मीडियावरदेखील प्रक्षोभक, अश्लील किंवा वादग्रस्त मजकूर टाळावा. अतिशय वैयक्तिक फोटोदेखील शक्यतो फेसबुकसारख्या साइटवर टाळावेत.

नोकरी शोधण्यासाठी आपण प्रोफेशनली कोण आहोत याबाबत ओळख करून देण्यासाठी आणि प्रोफेशनल संबंध टिकवण्यासाठी वापरली जाणारी महत्त्वाची सोशल मीडिया साइट म्हणजे ‘लिंक्ड इन’. या साइटकडे बहुतांश जणांचे दुर्लक्ष होते. अनेकदा या साइटवर प्रोफाइल तयार करून पुन्हा ती कधीही उघडली जात नाही. खरे तर आपल्या सीव्हीप्रमाणेच आपण आपल्या क्षेत्राच्या बाबतीत सजग आहोत, हे दाखवायची उत्तम जागा म्हणजे लिंक्डइन. इथे आपल्या क्षेत्रातील लोकांना फॉलो करून महत्त्वाची माहिती मिळतेच, पण आपल्याला नोकरी मिळण्याच्या अनुषंगाने यावर अनेक महत्त्वाचे संपर्क मिळू शकतात. त्यामुळे ही साइट तयार करून वेळोवेळी अपडेट ठेवणे गरजेचे आहे. या साइटचा उल्लेख सीव्हीमध्ये केल्यास तो सीव्हीमधील आणखी एक ठळक मुद्दा होऊ शकतो.

नोकरी शोधतानाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कव्हर लेटर. अनेकदा नव्याने नोकरी शोधणारे उमेदवार सोशल मीडिया साइट्सवरच्या नोकरीच्या जाहिरातींना प्रतिसाद देत आपला नंबर तिथे टाकून निवांत नोकरीसंबंधी कॉल येईल असा विचार करतात. कुठल्याही एच-आरच्या वैयक्तिक सोशल मीडिया प्रोफाइलवर, मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त निनावी/ विचित्र नाव असलेली सीव्हीची फाइल पाठवून मोकळे होतात, ही अत्यंत अनप्रोफेशनल बाब असून ते कटाक्षाने टाळावे. मग नवीन व्यक्तीशी जॉबसंबंधी संपर्क करताना तो कसा करता येईल? यासाठी कव्हर लेटरचा वापर केला जातो. ज्याला नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, त्याच्या नावे हे कव्हर लेटर अत्यंत औपचारिक भाषेत आणि मुद्देसूद लिहावे. या पत्रात साधारणत: तीन परिच्छेद असावेत, ज्यात पहिल्या परिच्छेदामध्ये आपले नाव, आपल्याला या व्यक्तीचा संपर्क कुठून मिळाला आणि हे पत्र कशासाठी आहे याचा उल्लेख असावा. दुसऱ्या परिच्छेदात आपले शिक्षण, अनुभव आणि नोकरीसाठी आपल्यात असलेले गुण या गोष्टींचा उल्लेख आणि शेवटच्या परिच्छेदात आपणच या नोकरीसाठी योग्य उमेदवार का आहोत यासह आपल्याला या नोकरीच्या उमेदवारीसाठी गृहीत धरण्याची विनंती असावी.

कुणालाही नोकरीसंबंधी संपर्क करताना जोपर्यंत वेगळा मार्ग सांगितला जात नाही, तोपर्यंत फक्त आणि फक्त ईमेलवरूनच केला जावा. सीव्हीप्रमाणेच कव्हर लेटरदेखील प्रत्येक नोकरीच्या पदासाठी वेगवेगळे असावे. अर्थात, अर्जाचा मूळ नमुना एकच असला तरी त्यात नोकरी काय आहे त्याप्रमाणे वारंवार बदल केले जावेत. ईमेलच्या सब्जेक्टमध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत याचा उल्लेख जरूर असावा. यासोबत कुणाला मेल करत आहोत त्यांचा उल्लेख आणि दोन- तीन ओळींमध्ये ईमेलचे कारण लिहीत. याच ईमेलमधून सीव्ही आणि कव्हर लेटर पाठवावे.

वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये जाताना त्यांनी दिलेल्या सूचनांबरोबरच आपल्या अर्जाची आणि सीव्हीची रंगीत प्रत, आपले सर्व डॉक्युमेंट्स आणि त्यांची झेरॉक्स आवर्जून सोबत असावी. आपली सर्व कागदपत्रे स्कॅन करून कायम ड्राव्हर किंवा क्लाऊड स्टोरेजमध्ये सेव्ह ठेवावीत. अतिशय लहान-लहान वाटणाऱ्या या गोष्टी अमलात आणल्यास आपली प्रोफाइल नोकरी देणाऱ्याच्या नजरेत ठळकपणे राहते. नोकरी शोधताना आपल्या चांगल्या प्रोफाइल आणि स्किलसेटबरोबरच या गोष्टी आपल्याला सहज नोकरीच्या स्पर्धेत पुढे नेऊ शकतात.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या