बहीणभावांचं नातं हे टॉम अॅण्ड जेरीसारखं असतं. टॉम जेरीला मारण्यासाठी अनेक मजेशीर कट कारस्थानं करतो, पण चतुर जेरी ही कारस्थानं नेहमी टॉमवरच उलटवतो. भावाबहिणींमधला हा शह-काटशहचा खेळ घराघरांतून पाहायला मिळतो. सणाच्या दिवशी तर या लुटुपुटीच्या भांडणाला आणखीनच रंग चढतो. पण कितीही भांडण झालं तरी भाऊ बिजेच्या दिवशी त्याच्या आवडीची वस्तू घेण्यापासून त्याच्या आवडीचा खाऊ करण्यापर्यंत सगळे लाड पुरवण्यासाठी बहिणी कंबर कसतात. नेहमीच्या सणासुदीच्या या चित्रात सध्या एक बदल दिसतो आहे. बहिणींप्रमाणेच हल्ली अनेक घरांमधून बंधुराजही तिच्या आवडीचा खाऊ बनवण्यासाठी स्वयंपाकघरात नवनवे प्रयोग करताना दिसतात. असेच प्रयोग उद्याच्या भाऊ बिजेच्या सणाला सफल करण्यासाठी शेफ विष्णू मनोहर यांनी तयार चटकदार फराळाच्या साथीने नवीन पदार्थ कसे घडविता येतील याची उकल पाककृतींच्या माध्यमातून केली आहे.
शेव भात
साहित्य – तयार शेव २ वाटय़ा, तांदूळ २ वाटया, हळद पाव चमचा, तिखट, मीठ चवीनुसार, कढीपत्ता १ काडी, मोहरी अर्धा चमचा, बारीक चिरलेला लसूण २ चमचे, दही २ चमचे.
कृती – तांदूळ धुऊन शिजत ठेवा. त्यामध्ये हळद, मीठ, दही व तेल टाका. तांदूळ ९० टक्के शिजल्यानंतर त्यात तयार शेव घाला. मंद आचेवर भात पूर्णपणे शिजवून त्यावर हिंग, मोहरी व लसूणाची फोडणी घालून चिंचेच्या कढीबरोबर खायला द्या.
आमचूर कढी – १ चमचा आमचूरमध्ये २ वाटया पाणी मिसळून ठेवा. पॅनमध्ये २ चमचे घेऊन त्यात जिरे पावडर, हळद, तिखट, हिंग, गूळ, मीठ व कढीपत्ता घालून त्यामध्ये आमचूरचे पाणी घाला. उकळी आल्यावर गॅस बंद करा. घट्ट करण्यासाठी थोडे बेसन लावू शकता.
चकली पकोडा
साहित्य : उरलेल्या चकल्याचे तुकडे २ वाटय़ा, ब्रेड ५ ते ६ नग, कोिथबीर ४ चमचे, मीठ चवीनुसार, दही २ चमचे.
कृती : उरलेल्या चकल्याचे तुकडे मिक्सरवर बारीक करून घ्या. त्यामध्ये पिठाच्या अध्रे ब्रेडक्रम्स, थोडे दही, मीठ व कोिथबीर घालून मिश्रण भिजवा. नंतर त्याचे मंद आचेवर पकोडे तळून घ्या. चटणी बरोबर खायला द्या.
वेफर्सची भजी
साहित्य – उरलेले वेफर्स १ वाटी, बेसन अर्धी वाटी, मदा १ चमचा, सोडा पाव चमचा, कोथिंबीर २ चमचे, मीठ चवीनुसार, तिखट चवीनुसार.
कृती – वेफर्सला तिखट चोळून ठेवा. बेसन, मदा, सोडा, मीठ व कोथिंबीर एकत्र करुन मिश्रण घट्ट भिजवून घ्या. नंतर यात वेफर्स बुडवून मंद आचेवर डीप फ्राय करा.
शेव भाजी
साहित्य – तुरकाटी शेव १ वाटी (ही शेव बाजारात मिळते किंवा घरी सोडा न टाकता ही शेव घरी बनवावी), आलं-लसूण पेस्ट ४ चमचे, भाजलेल्या कांद्याची पेस्ट अर्धी वाटी, हळद, तिखट चवीनुसार, धणे-जीरे पावडर १-१ चमचा, तमालपत्र ४-५, भाजून वाटलेले सुकं खोबरं पाव वाटी, भिजवलेली खसखस पाव वाटी, काळा मसाला १ चमचा.
कृती – खसखस, खोबरं, कांद्याची पेस्ट व आलं-लसूण पेस्ट एकत्र वाटून घ्या. पॅनमधे तेल घेवून त्यात तमालपत्र व वाटलेला मसाला घालून छान परतून घ्या. तेल सुटल्यावर हळद, तिखट, धणे-जीरे पावडर टाकून चांगले परता. थोडे पाणी घाला. चांगले तेल सुटल्यावर त्यात गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून पुन्हा गरम पाणी घालून उकळा. रस्सा थोडा पातळसर ठेवा. भाजी वाढताना त्यामधे वेळेवर शेव घालून वाढा.
शंकरपाळ्यांचे कुकीज
साहित्य – शंकरपाळे २ वाटय़ा, खोबरा कीस १ वाटी, दूध १ वाटी, बेकिंग पावडर १ चमचा, मीठ चवीनुसार, खोबरा काप पाव वाटी.
कृती – शंकरपाळे बारीक करून त्यामध्ये खोबरा कीस, मीठ, वेलची पावडर, बेकिंग पावडर व थोडे दूध घालून मिश्र-णाचा घट्ट गोळा करा. नंतर याची जाड पोळी लाटून साच्याने बिस्किटे पाडून घ्या. त्यावर खोबरा काप घालून १८० डिग्रीवर १५ ते २० मिनिटे बेक करा.
चकली बाईट
साहित्य – चकल्यांचे तुकडे १ वाटी, मिल्क पावडर अर्धी वाटी, मिक्स हर्ब्स् अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, सायट्रीक अॅसिड १ चमचा, तिखट चवीनुसार, लसूण पावडर पाव चमचा.
कृती – चकली सोडून सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करा. नंतर चकलीचे तुकडे मायक्रोवेव्ह ओव्हनला अर्धा मिनिट लावून त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली पावडर मिसळून खालीवर करा. थंड करून डब्यात भरून ठेवा.
संकलन : मितेश जोशी
viva@expressindia.com