कठोर मेहनतीला आत्मविश्वासाची जोड दिल्यानेच नेमबाजीत आतापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. अर्थात माझ्या या वाटचालीत माझ्याबरोबर सतत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या माझ्या आईचा अनन्यसाधारण वाटा आहे. तिने दिलेल्या प्रोत्साहनामुळे व केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच मला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळाला आहे. मी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावे हे माझ्याबरोबरच तिचेही स्वप्न आहे आणि ते साध्य झाल्याशिवाय मला चैन पडणार नाही, असे आंतरराष्ट्रीय नेमबाज पूजा घाटकर हिने ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात सांगितले. ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी मिलिंद ढमढेरे आणि भक्ती बिसुरे यांनी पूजाला बोलतं केलं..
ऑलिम्पिक पदकाचेच स्वप्न
नेमबाजीत वयाच्या साठ वर्षांपर्यंतही करिअर करता येते. परदेशातील अनेक स्पर्धामध्ये ५६ वर्षांपेक्षा जास्त मोठे असलेले खेळाडू मी पाहिले आहेत. ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते साकार करण्याची क्षमताही माझ्याकडे आहे. हे स्वप्न साकार करेपर्यंत व त्यानंतरही करिअर करण्याबाबत मी ठाम आहे. पुढचे वर्ष माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आशियाई क्रीडा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या दोन्ही स्पर्धा माझ्या दृष्टीने व आपल्या देशासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. २०२० च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत.
तिरंगा फडकताना अभिमान वाटतो
परदेशात पदक मिळविल्यानंतर आपल्या देशाचा तिरंगा फडकताना खूप अभिमान वाटतो व डोळ्यात आनंदाश्रु येतात. भारतामातेचे आपण सुपुत्र आहोत व आपल्याला जे काही यश प्राप्त झाले आहे ते या देशामधील कोटी लोकांच्या प्रेरणेमुळेच असेच विचार मनात येतात.
आत्मनिरीक्षण हाच खरा गुरू
प्रत्येक खेळाडूच्या यशामागे गुरूचे मोठे पाठबळ असते. नेमबाजीत करिअर करताना माझे असे गुरू नव्हते. आत्मपरीक्षण हाच माझा गुरू आहे. प्रत्येक स्पर्धेचे वेळी आपण किती यश मिळविले, आणखी किती मजल गाठायची आहे, आपण कोठे कमी पडलो अशा आत्मपरीक्षणांमधूनच मी शिकत गेले. अर्थात ‘मुक्तांगण’ शाळा व त्यानंतर ‘शाहू मंदिर महाविद्यालया’त शिकत असताना अनेक शिक्षकांकडून मला खूप काही शिकावयास मिळाले. माझी आई सर्वार्थाने माझ्यासाठी सर्व काही आहे. मी लहान असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मला माझ्या आईनेच मोठे केले आहे. माझ्यासाठी ती आई व वडील अशा दोन्ही भूमिका पार पाडत असते. मी कोठे कमी पडते, माझी मानसिक तयारी कोठे कमी पडत आहे याबाबत तीच माझी प्रशिक्षक आहे.
अभिनव, गगन व सचिनचा आदर्श
माझ्यासाठी माझी आई ही सदैव आदर्श असते. खेळाच्या बाबत विचार केल्यास अभिनव बिंद्रा, गगन नारंग हे नेमबाज व सचिन तेंडुलकर हे माझ्यासाठी आदर्श आहेत. कितीही संकटे आली तरी शांतचित्ताने फक्त आपल्या खेळावर लक्ष कसे केंद्रित करायचे हे मी अभिनव बिंद्राकडून शिकले आहे. अनेक वेळा तो मला प्रोत्साहन देतो. गगनबरोबर मी बालेवाडीत काम करते. नेमबाजीच्या साहित्यापासून अनेक गोष्टींबाबत तो सदैव माझ्या मदतीसाठी तत्पर असतो. सचिन हा तर सर्वाचेच प्रेरणास्थान आहे. त्याच्याकडून खेळाडूने कशी समर्थपणे करिअर करायची हे शिकले आहे. अभिनेता नाना पाटेकर हे अनेक वेळा नेमबाजी संकुलात येत असतात. ते हक्काने माझे कौतुक व विचारपूस करतात.
बर्फातही घाम फुटला
स्वीडनमध्ये एका स्पर्धेसाठी गेले असताना, तेथे कडाक्याची थंडी होती. उणे पाच अंश तापमानात मी ही स्पर्धा केली. स्पर्धेत मला एक सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदक मिळाले. स्पर्धेचे हे ठिकाण खेडेगावात होते. तिथे बसस्थानकापासून साधारणपणे अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतरच पोहोचता येत होते. पहिल्या दिवशी स्पर्धा संपल्यानंतर आम्ही बस स्थानकापर्यंत चालत आलो. त्या वेळी अंधार पडला होता. बर्फ पडत होते. भरपूर थंडी असून रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे मी आणि आई देवाचा धावा करतच आलो. त्या वेळी अक्षरश: भीतीपोटी मी घामाने थबथबले होते.
नेमबाजीचे बूट माहितीच नाही
नेमबाजीत करिअर सुरू केल्यानंतर शिवछत्रपती क्रीडानगरीत अन्य खेळाडूंचा पोशाख पाहिल्यानंतर नेमबाजीकरता स्वतंत्र वेगळे बूट घालावे लागतात हे मला पहिल्यांदा कळले. या बुटांची किंमत साधारणपणे २५ हजार रुपयांच्या आसपास होती. ते ऐकून मला खूप धक्का बसला. बुटांकरता एवढे पैसे घालणे शक्य नव्हते. बूट विक्रेत्याने मला सवलत दिली व टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचीही मुभा दिली. रायफल व किट मिळून साधारणपणे प्रत्येक वेळी तीस किलो वजन असते. प्रत्येक स्पर्धेसाठी हे आवश्यक सामान असते. अनेक वेळा परदेशात किंवा देशातही वजनाच्या मर्यादेपेक्षा नेहमीच जास्त वजन असते. त्यामुळे जास्त पैसे मोजावे लागतात. एअर इंडियाकडून मात्र नेमबाजांना सवलत मिळते.
उत्तेजकाबाबत काळजी
स्वीडनमधील स्पर्धेच्या वेळी मला पहिल्याच दिवशी ताप भरला होता. मात्र आपण एखादे औषधे घेतले तर ते औषध उत्तेजकाच्या यादीतील औषध नाही ना याची काळजी वाटत होती. त्यावेळी मी दिवसभर आईने केलेल्या आल्याच्या वडय़ांवरच राहिले. स्पर्धेचा अखेरचा दिवस संपल्यानंतर उत्तेजक चाचणी झाल्यानंतरच मी तापावरचे औषध घेतले आणि तेही तेथील वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यावरूनच. उत्तेजकाबाबत खूपच काळजी घ्यावी लागते. कारण अनेक औषधे किंवा अन्नपदार्थामधूनही बंदी घातलेले पदार्थ आपल्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतो मी आईने बनवलेल्या पदार्थाना प्राधान्य देते.
ग्लॅमर नाही तरीही..
क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसमधील खेळाडूंना जसे वलय लाभते तसे आमच्या खेळात नाही. तरीही नेमबाजीतील अनेक खेळाडूंचे भरपूर चाहते आहेत. एक मात्र नक्की की अभिनव, गगन यांच्यासारख्या लोकप्रिय खेळाडूंचे पाय जमिनीवरच असतात. ते सर्वामध्ये सहजपणे मिसळतात. आम्हाला अनेक वेळा विमानाने प्रवास करावा लागतो, त्या वेळी एअर इंडिया किंवा नेहमीच्या अन्य विमान कंपन्यांही आमचे नाव पाहिल्यावर लगेचच आम्हाला सामान तपासणीसाठी प्राधान्य देतात हीच आमच्या लोकप्रियतेची पावती आहे.
नेमबाजीत मुलींना भरपूर संधी
अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर नेमबाजीत करिअर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातही मुलींचे व महिलांचे प्रमाण अधिक आहे. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पाच हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यावरून या खेळाची लोकप्रियता कळून येते. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रीय महिला खेळाडूंचे वर्चस्व आहे. मुलींनी जरूर या खेळात करिअर केले पाहिजे. मात्र जिद्दीने कठोर मेहनत करण्याची तयारी पाहिजे.
दडपण न घेण्याची वृत्ती फायदेशीर
आपल्याबरोबर कोणता प्रतिस्पर्धी आहे याचा मी कधीच विचार केला नाही. २०१४ मध्ये माझ्याबरोबरच ऑलिम्पिक विजेती येई सिलिंग स्पर्धक होती. पण मी तिच्याबाबत अजिबात दडपण घेतलं नाही. आपली कामगिरी कशी शंभर टक्के होईल याचाच मी विचार करत असते. त्यामुळे मी सिलिंगवर मात करू शकले. राष्ट्रीय स्पर्धेतही माझ्यापेक्षा अनुभवाने वरचढ असलेल्या खेळाडूंना हरवले आहे ते केवळ आत्मविश्वासाच्या जोरावरच. अर्थात फाजील आत्मविश्वास बाळगू नये हेही मी शिकले आहे.
दैनंदिनी लिहिण्याची सवय
मला कोणताही गुरू नसल्यामुळे मी दैनंदिनी लिहिण्याची सवय विकसित केली आहे. प्रत्येक स्पर्धेच्या वेळी आपली कामगिरी कशी झाली, कोठे आपण कमी पडलो याचे मी जरूर टिपण करते. त्याचा फायदा मला अनेक वेळा झाला आहे. अर्थात आपल्याला भविष्यात कोणते उद्दिष्टय़ गाठावयाचे आहे हे मी लिहीत नाही. हे ध्येय मी नेहमी मनातच ठेवते.
म्हणूनच नेमबाजीकडे वळले
शाळेत असताना मी एनसीसीच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये नेमबाजीत भाग घेतला. तेथे मला सुवर्णपदक मिळाले आणि महाराष्ट्र संघासही विजेतेपद मिळवून देण्यात माझा खारीचा वाटा होता. माझी आई ही जरी कबड्डीपटू असली तरी त्या खेळात मला फारसे स्वारस्य वाटत नव्हते आणि सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखवले की निवड होणे सोपे असते असे माझे ठाम मत होते. त्यामुळेच नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.
मी कोणते करिअर करावे याबाबत मला आईने पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. जे करिअर निवडशील, त्यामध्ये कष्ट करण्याची व स्वत:ला झोकून देण्याची तयारी पाहिजे, एकदा करिअर निवडले की त्यामधून मागे पडता कामा नये अशी शिकवण मला आईने दिली. त्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडू शकले.
स्पर्धक आणि मैत्रिणीदेखील
मी फक्त दहा मीटर एअर रायफलमध्ये करिअर करत असल्यामुळे अनेक वेळा नेहमीच्याच प्रतिस्पध्र्याबरोबर लढत देण्याची वेळ येते. त्यामुळे या परदेशी स्पर्धकही परिचयाच्या झाल्या आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किंवा स्पर्धा संपल्यानंतर आम्ही मैत्रिणीच्या भावनाविश्वात रमत असतो. मला एखादे साहित्य कमी पडले किंवा अन्य काही गोष्ट मला पाहिजे असल्यास निसंकोचपणे त्या मला मदत करतात आणि मीदेखील त्यांना मदत करते.
वक्तशीरपणा हितावह
कोणत्याही स्पर्धेच्या वेळी वक्तशीरपणा ठेवणे आवश्यक असते. आपल्याला ज्या ठिकाणी नेम साधायचा आहे, तेथे स्पर्धेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे हितावह असते. नेमबाजीसाठी आवश्यक पोशाख परिधान करणे, पोझिशन घेण्यासाठी किमान दहा पंधरा मिनिटे लागतात. त्यामुळेच मी आजपर्यंत वक्तशीरपणा पाळला आहे. स्पर्धेच्या ठिकाणीही आम्ही एक दोन दिवस अगोदरच पोहोचतो त्यामुळे तेथील वातावरणाशी अनुरूप होणे सोयीचे जाते.
बदलत्या हवामानाशी अनुरूप
विविध स्पर्धासाठी अनेक वेळा मी पुण्याबाहेरच असते. प्रत्येक ठिकाणचे वातावरण काही सारखे नसते. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास, मी गेल्या दोन महिन्यांमध्ये दिल्ली, जपान, त्रिवेंद्रम, पुन्हा दिल्ली असा प्रवास केला आहे. जपानमधील कडाक्याच्या थंडीपाठोपाठ त्रिवेंद्रममधील उष्ण हवामानाला सामोरे जावे लागले. अर्थात अशा गोष्टींची मला सवय झाली आहे.
उपस्थितांच्या प्रतिक्रिया
पूजाचा जीवनप्रवास आमच्यासाठी प्रेरणादायक
मला खेळात त्यातही नेमबाजीत करिअर करायचे आहे. खेळात कसा आत्मविश्वास ठेवावा, कसे निशाण बरोबर साधायचे हे मला तिच्याकडून कळाले. प्रत्येक प्रश्नाद्वारे हळूहळू तिच्या जीवनातील एकेक पडदा उलगडत गेला आणि तिने आजपर्यंत यश मिळविताना केलेल्या संघर्षांची कथा ऐकायला मिळाली. परदेशात आपले राष्ट्रगीत वाजताना मनात काय भावना निर्माण होत असतात हे तिच्याकडून खूप छान ऐकावयास मिळाले.
– मनस्वी पेंढारकर
आईचे माहात्म्य पूजाकडून उमगले
पितृछत्र नसताना पूजाला नेमबाजीत करिअर करण्यासाठी आईने दिलेले प्रोत्साहन व सहकार्य खूपच मोलाचे आहे. आईचे माहात्म्य किती असते हे पूजाकडून मला उमगले आहे. मी स्वत: नेमबाजी करीत असल्यामुळे पालकांचे पाठबळ हे आकाशासारखे कसे अमर्यादित असते, विविध स्पर्धामध्ये सहभागी होताना कसा आत्मविश्वास ठेवला पाहिजे, कसा संयम बाळगला पाहिजे, कितीही मोठे यश मिळाले तरी आपले पाय जमिनीवरच असले पाहिजे हे तिने खूप छान समजावून सांगितले. कठोर मेहनतीला आत्मपरीक्षणाची जोड कशी दिली पाहिजे हे तिच्याकडून कळले. आम्हा सर्व उदयोन्मुख खेळाडूंसाठी पूजा ही प्रेरणास्थानी आहे.
– शिवानी खैरे
तंदुरुस्तीबाबत योग्य मार्गदर्शन
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी होताना शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती कशी ठेवली पाहिजे हे पूजाने अतिशय सोप्या भाषेत समजावून दिले. केवळ खेळासाठी नव्हे तर एकूणच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी नियमित कसा व्यायाम केला पाहिजे याचेही तिने योग्य दाखले दिले.
– संपदा बुचडे