तुझ्यावाचून करमेना

‘किट कॅट’ नावाच्या चॉकलेटच्या जाहिरातींचं घोषवाक्य आहे ‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किट कॅट’.

नवं दशक नव्या दिशा

सौरभ करंदीकर

‘किट कॅट’ नावाच्या चॉकलेटच्या जाहिरातींचं घोषवाक्य आहे ‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किट कॅट’. अर्थात— क्षणभर विश्रांती घ्या, किट कॅट खा! १९३५ साली इंग्लंड मधल्या रोंट्री नावाच्या उत्पादकाने किट कॅट चॉकलेट आणि कालांतराने हे घोषवाक्य नावारूपाला आणलं. त्या काळात ‘हॅव अ ब्रेक’ म्हणावं अशी परिस्थिती असावी हे खरं वाटत नाही. त्या काळात कामसू, मेहनती, धडपडी माणसं नव्हतीच असं नाही, परंतु आजच्यासारखी घडय़ाळाच्या काटय़ामागे सैरावैरा पळत नसावीत हे नक्की.

‘हॅव अ ब्रेक’ या वाक्यावर आधारित अनेक मनोरंजक जाहिराती आजपर्यंत केल्या गेल्या आहेत. त्यांच्या एका जाहिरातीत फुटपाथवरील एका बाकावर एक माणूस आरामात बसला आहे आणि ते लाकडाचं बाक ‘किट कॅट’च्या आकाराचं, येणाऱ्या जाणाऱ्याला जरा विश्रांती घ्या’ असं सुचवणारं आहे, असं दर्शवलं होतं. जाहिराती समाजाचं प्रतिबिंब मानल्या जातात. काही वर्षांंपूर्वी किट कॅटने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत एका मोबाइल फोनचे दोन तुकडे केलेले दाखवले होते (त्यांचं चॉकलेट जसं मध्यभागी तोडतात अगदी तसं). ही जाहिरात कमालीची लोकप्रिय झाली. तिला अनेक बक्षिसं मिळाली. याचं मुख्य कारण म्हणजे सतत मोबाइल फोनला जखडलेल्या ग्राहकांना अगदी हेच करावं, असं वाटत असे.

आपल्यालासुद्धा हातातला मोबाइल फोन भिरकावून द्यवा, हातोडय़ाने लॅपटॉपच्या ठिकरम्य़ा कराव्यात, आपलं सोशल मीडिया आणि ईमेल अकाऊंट ‘डीलीट’ करावं असं कधीतरी वाटत असणार. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर आपला संताप असा उफाळून येतोच. ‘आई म्हणते आग लागो त्या फेसबुकला’ या (किंवा तत्सम) नावाचा एक ग्रुप मध्यंतरी पहिला होता (तोही फेसबुकवरच होता ही देखील गमतीची बाब!). एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञान आपल्या आयुष्याला सुकर बनवतंय, तर दुसरम्य़ा बाजूला त्याच तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन अधिक क्लिष्ट होतंय.

आधुनिक तंत्रज्ञानाचा धिक्कार करणारम्य़ा चळवळीला ‘निओ लडाईझम’ असं नाव आहे. तंत्रज्ञान, मग ते कुठल्याही पातळीवर असो, चांगलं असो अथवा वाईट, त्याचा नायनाट करणं, त्याला प्रोत्साहन न देणं, त्याला सामाजिक पाठिंबा न मिळू देणं इत्यादी कृती करणारम्य़ांना किंवा निदान तसा विचार करणारम्य़ांना ‘निओ लडाईट’ असं म्हणतात. ही काही एक विशिष्ट व्यक्तीचं नेतृत्व असलेली चळवळ नाही, ही एक विचारसरणी आहे. परंतु त्याचं नाव मात्र एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या ‘लडाईट’ या खरम्य़ाखुरम्य़ा चळवळीवरून घेतलेलं आहे. तंत्रज्ञान—द्वेषाची पाळंमुळं आपल्याला तेव्हापासून पाहायला मिळतात. त्याकाळी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा चेहरामोहरा अर्थातच वेगळा होता, परंतु तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम मात्र काहीसे सारखेच होते.

१७७९ साली नेड लड नावाच्या एका आळशी तरुणाने बापाच्या कटकटीला, त्याच्या “काम कर” या सततच्या तगाद्यला कंटाळून, रागाच्या भरात त्याच्या हातमागाची चौकट तोडून टाकली. तेव्हापासून यंत्राची रागाने नासधूस करण्याच्या प्रवृत्तीला त्याचं नाव पडलं. १८११ साली इंग्लंडमधील नॉटिंगहॅम परगण्यातील काही विणकरांनी स्थानिक यंत्रमाग उद्योगाविरुद्ध अशीच टोकाची पावलं उचलली. त्यांना सर्वप्रथम ‘लडाईट’ म्हटलं गेलं.

या विणकरांनी कापडनिर्मितीची आपली पारंपरिक कला मोठय़ा मेहनतीने जोपासली होती. त्याच ठिकाणी काही उद्योजकांनी यंत्रमाग सुरू केले. कापडनिर्मिती जलद आणि कमी खर्चात केली जाऊ लागली. परिणामी या विणकरांची दुकाने बंद पडली. व्यवसायावर गदा येताच त्यांनी त्याच यंत्रमाग असलेल्या कारखान्यात नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुशल विणकरांची गरज त्या कारखान्यांना नव्हती. त्यांनी यंत्रमागावर काम करण्याची तयारी दाखवली तरी त्यावर काम करायला इतक्या लोकांची गरजच नव्हती.

धंदा गेला, नोकरी मिळेना, या परिस्थितीत या विणकरांनी शस्त्र हातात घेतली. कारखान्यांवर चाल करून त्यांनी तिथल्या यंत्रमागांची नासधूस केली. कारखान्यांच्या मालकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अनेकांचे बळी गेले. या घटनेचे पडसाद इतर परगण्यांत उमटू लागले. अखेरीस ही चळवळ १८१६ साली काही कायदेशीर उपायांनी, तर कधी सैन्यबळाचा वापर करून संपवण्यात आली. त्यानंतरही असंतोष धुमसतच राहिला. तात्कालिक तंत्रज्ञानाला विरोध करणारम्य़ांना जगभरात ‘लडाईट’ हे कायमचं नाव पडलं. आजच्या ‘निओ लडाईट’ प्रवृत्तीला तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर, परंपरांवर, रितीरिवाजांवर केलेला विपरीत परिणाम कारणीभूत आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कुठले आविष्कार आपल्या जीवनावर, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर कसा परिणाम करतील याबद्दल पुरेसा विचार आज केला जात नाही. अणुऊर्जेवरील संशोधन आपल्याला विद्य्ुतशक्ती देतं, तसंच अण्वस्त्रंनादेखील जन्माला घालतं. शिवाय हजारो वर्षं धोकादायक ठरणारा आण्विक कचरा जन्माला घालतं. अर्थात हे उदाहरण पराकोटीचं झालं. तंत्रज्ञानाचे परिणाम आपल्या जीवनावर इतर प्रकारे होतच असतात. संगणकीकरणाने बेरोजगारी वाढणं आणि यंत्रमागांनी लडाईटना उठाव करायला भाग पाडणं यात साम्य आहेच. पेट्रोलियम पदार्थांच्या वापराने पर्यावरणाचा समतोल ढळणं, ऑनलाइन शॉपिंगने दुकानदारांना संपवणं, इलेक्ट्रॉनिक रीडर्सने पुस्तकांना रद्दीत काढणं, क्लाऊड स्टोरेजमुळे स्मरणशक्तीला गंज चढणं, इंटरनेट— उपलब्धतेमुळे ज्ञानलालसा बोथट होणं, या परिणामांना आज आपली भावी पिढी सामोरी जाते आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करणारम्य़ांनी तसंच तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारम्य़ांनी यासारख्या परिणामांची दखल घेतली पाहिजे.

लडाईटना कालांतराने नवीन कौशल्ये आत्मसात करून घ्यावी लागली. जुने विसरून नव्याचा स्वीकार करताच त्यांचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू झाला. मात्र तंत्रज्ञानातील बदलांचा वेग आपल्याला असं जुळवून घ्यायला पुरेसा वेळ देत नाही. दरवर्षी बाजारात येणारम्य़ा मोबाइलच्या नव्या व्हर्जनप्रमाणे आपण अपग्रेड होत नाही. प्रगतीकडे एकाच दृष्टिकोनातून पाहणे बरोबर नाही. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं आपलं आणि तंत्रज्ञानाचं द्वेषप्रेम चालूच राहील. आपल्या तंत्रज्ञान — आधारित आयुष्यात समतोल कसा आणायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर आपला संताप असा उफाळून येतोच. ‘आई म्हणते आग लागो त्या फेसबुकला’ या (किंवा तत्सम) नावाचा एक ग्रुप मध्यंतरी पहिला होता (तोही फेसबुकवरच होता ही देखील गमतीची बाब !). एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञान आपल्या आयुष्याला सुकर बनवतंय, तर दुसरम्य़ा बाजूला त्याच तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन अधिक क्लिष्ट होतंय.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New world new start advertise ysh

ताज्या बातम्या