आसिफ बागवान

तीन पत्ती, रमी यांसारख्या अ‍ॅपचं प्रस्थ गेल्या चार वर्षांपासून वाढत आहे. विशेषत: तरुणवर्ग या अ‍ॅपवर अधिक सक्रिय दिसतो. खोटय़ा ‘चिप्स’च्या मोबदल्यात का होईना खेळला जाणारा हा जुगार धोकादायक ठरू लागला आहे.

भारतीय समाज जुगाराकडे कुप्रथा म्हणून पाहात असला तरी, ही संकल्पना हजारो वर्षांपासून भारतात घट्ट रुजली आहे. द्यूतक्रीडा हा जुगाराचाच प्रकार. या द्यूतक्रीडेनेच महाभारत घडवले. दिवाळीच्या रात्री पत्त्यांचा जुगार खेळण्याची प्रथा आजही अनेक समाजांत रूढ आहे. गणेशोत्सवाच्या मंडपात रात्री जागरणादरम्यान खेळण्यात येणारे तीन पत्ती, रमी असोत की, सहलीला गेल्यानंतर रंगणारा मेंढीकोटचा डाव असो, विरंगुळा म्हणून खेळला जाणारा हा डाव जुगारापर्यंत कधी पोहोचतो, हे अनेकांना कळतही नाही. गेल्या काही वर्षांत हाच जुगार ‘ऑनलाइन’ झाला आहे. पत्त्यांचा डाव मांडायला चार टाळकी एका टेबलावर एकत्र बसण्याची गरजही आता उरलेली नाही. कारण स्मार्टफोनवरील तीन पत्ती, इंडियन रमी, पोकर, स्लॉट अशा गेमिंग अ‍ॅपमुळे टेबलावरचा डाव स्मार्टफोनवर कधीही, कुठेही मांडण्याची सहज सोय उपलब्ध झाली आहे. गेल्या चारेक वर्षांत अशा गेमिंग अ‍ॅपनी भारतात आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. विरंगुळा म्हणून हे खेळ अनेक जण खेळत असतात. मात्र, अशा प्रकारच्या गेमिंग अ‍ॅपमधूनच आता ऑनलाइन जुगाराचे प्रस्थ वाढत चालले आहे.

स्मार्टफोनचा वापर वाढू लागल्यापासून भारतात मोबाइल गेमिंगलाही उत्तेजन मिळू लागले आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी बनवण्यात आलेल्या गेम्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पब्जी, कॅण्डी क्रश सागा, सब वे सर्फर यांसारख्या गेमनी तर वापरकर्त्यांवर भुरळच पाडली आहे. वापरकर्त्यांना सुरुवातीला गेमकडे आकर्षित करून नंतर त्यांना त्याची सवय लावणे व कालांतराने ‘इन अ‍ॅप पर्चेसेस’ अर्थात अ‍ॅपमधील गोष्टींचा वापर करण्यासाठी शुल्क आकारणे, ही पद्धत या गेमनी चांगलीच रूढ केली आहे. मोबाइल गेमला चटावलेली मंडळी अशा प्रकारचे सशुल्क व्यवहार करताना अनेकदा मागचापुढचा विचारही करत नाहीत. स्मार्टफोनवरील पत्त्यांच्या खेळांचीही हीच ‘स्ट्रॅटेजी’ आहे. ‘तीन पत्ती’ किंवा ‘रमी’सारख्या गेमिंग अ‍ॅपमध्ये सुरुवातीला वापरकर्त्यांला ठरावीक धनराशी मोफत दिली जाते. ही ‘व्हर्च्युअल’ रक्कम वापरून ते पत्त्यांमध्ये बोली लावतात. यातील रोमांचकता, गेमचा इंटरफेस आणि जिंकण्याची ईष्र्या यांतून वापरकर्त्यांला या गेमचे एक प्रकारचे व्यसनच जडते; परंतु ही मोफत धनराशी संपल्यानंतर वापरकर्त्यांसमोर खरा पेच उभा राहतो. अशा वेळी खरेखुरे पैसे देऊन वापरकर्ता त्या बदल्यात ‘व्हर्च्युअल चिप्स’ खरेदी करण्यास धजावतो. यातूनच खरा जुगार सुरू होतो. खोटय़ा पैशांनी हा खेळ खेळत असल्याने जुगार वगैरे खेळत असल्याचा विचार आपल्या मनाला शिवतही नाही; परंतु प्रत्यक्षात त्या खोटय़ा पैशांच्या खरेदीसाठी आपण खरे पैसे खर्च केलेले असतात. त्यामुळे एक प्रकारे हा जुगारच झाला आहे. मात्र, ही गोष्ट अनेकांच्या ध्यानीमनीही नसते. अशा प्रकारच्या गेमिंग अ‍ॅपवर अनेक जण २४ तास सक्रिय असतात. इतकेच नव्हे तर, यातून ‘चिप्स’ परस्पर विकण्याचा व्यवहारही अनेकदा होतो. उदाहरणार्थ एखाद्याने गेमिंग अ‍ॅपवर जिंकून काही कोटी ‘चिप्स’ कमावले तर तो या ‘चिप्स’चा ऑनलाइन लिलाव करतो. जो कोणी त्या ‘चिप्स’साठी जास्त बोली लावेल, तो ‘चिप्स’ विकणाऱ्यासोबत खेळतो आणि चिप्स विकणारा स्वत:चा पराभव करून त्या ‘चिप्स’ समोरच्या व्यक्तीला बहाल करत जातो. अशा प्रकारच्या ‘फिक्सिंग’ची उघड चर्चा कुठेच होत नाही; परंतु सोशल नेटवर्किंगमधून एकमेकांच्या संपर्कात आलेले हे खेळाडू परस्पर व्यवहार करून अ‍ॅप निर्मात्या कंपनीलाही गंडवतात. यातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदाबादमधील एका दुकलीने तिसऱ्याच व्यक्तीच्या डेबिट कार्डाचे तपशील वापरून त्याद्वारे एका कार्ड गेम अ‍ॅपसाठी ‘चिप्स’ खरेदी केल्या. अशा प्रकारे या दुकलीने त्या व्यक्तीला १६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

अशा प्रकारच्या गेमिंगमधून जुगार प्रवृत्ती फोफावत असताना कायदेशीर पातळीवर त्याबाबत अनेक संभ्रम आहेत. मुळात १९६७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘रमी’ हा खेळ ‘गेम ऑफ स्किल’ अर्थात कौशल्यावर आधारित खेळ असल्याचे स्पष्ट करून त्याला कायदेशीर ठरवले होते; परंतु पैशांद्वारे खरेदी केलेल्या ‘चिप्स’ बोलीवर मांडून खेळण्यात येणारा ‘रमी’ हा खेळ कायदेशीर आहे का, याविषयी अजूनही पुरेशी स्पष्टता नाही. नेमका याचाच फायदा कार्ड गेमचे अ‍ॅप बनवणाऱ्या कंपन्या घेतात. तेलंगणा, आसाम, ओदिशा या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कार्ड गेमवर बंदी आहे; परंतु अ‍ॅपवरील बंदीबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा जुगारावर बंदी आहे त्या ठिकाणी खेळाडू जिंकलेले पैसे काढून घेऊ शकत नाहीत; परंतु त्यांना खेळण्यापासून प्रतिबंध कोणाचाच नाही.

अशा प्रकारच्या गेमिंग अ‍ॅपचे वेड तरुणाईत अधिक प्रमाणात आहे, हे सांगायला नको. अलीकडे काही गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून विशेष स्पर्धाही भरवण्यात येतात. त्यातील डाव मोठमोठय़ा रकमांचे असतात. तरुणवर्ग हे पैसे मोजून या खेळात उतरताना दिसतो. याकडे ‘जुगार’ म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन पुसला गेला असून सर्वसामान्य खेळासारखेच त्याकडे पाहिले जात आहे. मात्र, त्यात होणारा खऱ्या पैशांचा वापर चिंताजनक आहे.

viva@expressindia.com