विनय नारकर
कवी मुक्तेश्वराने अध्यात्मिक साहित्याची रूढ चौकट मोडली. रचना आणि विषय दोन्हीबाबत त्याने स्वत:ची वाट निवडली. पौराणिक गोष्टींच्या रसपूर्ण वर्णनातून श्रोत्यांना काव्यानंद ग्रहण करायला शिकवले. द्रौपदी वस्त्रहरणासारख्या प्रसंगातूनही मुक्तेश्वरानी वस्त्रवर्णन कसे फुलविले हे आपण मागच्या लेखात पाहिले. मुक्तेश्वरांनी या प्रसंगाद्वारे तत्कालीन प्रचलित वस्त्रांचे व वस्त्र पेठांचे वर्णन आपल्या काव्याद्वारे केले. याद्वारे त्या वस्त्रांच्या नावांचे, काही प्रकारांचे, वस्त्ररंगांच्या विशिष्ट नावांचे व तत्कालीन पेठांचे दस्तऐवजीकरण साध्य झाले आहे.
मुक्तेश्वरांनी सोळाव्या शतकात हे वस्त्र वर्णन द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाद्वारे साध्य केले. त्यानंतर अगदी अलीकडच्या काळापर्यंत अशा प्रकारची काव्यरचना होत आली आहे. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाद्वारे आपण तत्कालीन वस्त्रांचे वर्णन करून काव्यामध्ये रसनिर्मिती होऊ शकते हे नंतरच्या कवींच्या लक्षात आले. त्यामुळे या प्रकारची वस्त्रांकित अभिव्यक्ती नंतरच्या काळात लोकगीतं, ओव्या, लावण्या अशा प्रकारच्या लोक साहित्यातून पुन्हा पुन्हा दिसून येते. शाहीर परशरामाची एक लावणी तर या दृष्टीने अतिशय लालित्यपूर्ण आहे. परशराम हे एक सनदधारी शाहीर होते. ते व्यवसायाने शिंपी होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या या शाहिरांना नव्वद वर्षांचे आयुष्य लाभले होते. यांनी स्वराज्याच्या काळापासून पेशवाईपर्यंतचा काळ पाहिला होता. परशरामांनी अनेक विषयांवरील लावण्यांची रचना केली. वस्त्र आणि त्यातले तपशील देत, लालित्य साधण्याचं कसब परशरामांनी लीलया साधलं आहे.
जरी किनारी पदर नारळी पितांबर पिवळा
कळस पाकळी लेउन गुलतारी पैठणि पातळा
चंद्रकळा शेलारी कुसुंबी बसतिरंगी बहु
पर्वत पडले गणित नाही मुखी कुठवर गाऊ
मराठी वस्त्रांचे वैभव दाखवणारी ही एक प्रकारे प्रतीकात्मक लावणी वाटते.
शाहीर परंपरेतील आणखी एक महत्वाचे नाव म्हणजे होनाजी बाळा. होनाजी शिलारखाने हा व्यवसायाने गवळी होता. थोरल्या माधवरावांच्या काळातच होनाजी नावारूपाला आला होता. उत्तर पेशवाईमध्ये होनाजीच्या नावाचा फारच दबदबा होता. दुसऱ्या बाजीरावाची होनाजीवर खास मर्जी होती. त्याच्या काही रचना आजही लोकप्रिय आहेत. होनाजी आपल्या लावण्यांमधून बऱ्याचदा वस्त्रांचे दाखले देतो. स्त्री सौंदर्याचे वर्णन करताना होनाजीने वस्त्र प्रतिमांचा वापर अतिशय चपखलपणे केला आहे. लावणीचा रसरशीतपणा त्यामुळे निश्चितच वाढला आहे. या द्रौपदी वस्त्रहरणाच्या काव्यात मराठी वस्त्र लावण्य बहरलं आहे.
तव दुर्जन दु:शासन सरसी निरी ओढीत फेडीत वसनाशी ।
नेसवी वस्त्रे हरी भगिनीशी ॥
डाळींबी मोती चुरनकसीं। राघावळ गुजरी खसखसी ।
कंबुवर्ण पटवस्त्र प्रकाशी । निळी हिरवी अंजिरी पानसी । सोनवळी रानघडीसरसी ॥
नानाजाती पुरविली भगिनीसी वस्त्रें । श्रीरंगे ।
आपल्या पीतांबरे झाकिली द्रौपदी गात्रे ।
भगवंते ।
हे फेडतील म्हणून करी बसविली शस्त्रास्त्रे ।।
या लावणीतून राघावळ, सोनवळी अशा कालौघात अदृष्य झालेल्या साडय़ांची आठवण जागती ठेवली आहे.
एका लोकगीतातून द्रौपदी वस्त्रहरणातील वस्त्र वर्णनाने लालित्य निर्मिती तर झालीच आहे, पण त्यासोबत काही विशेष माहितीही पुरवली आहे.
दुर्योधनाने हासडितां निरी
फेडिली पहिली सोनेरी चटक अंजिरी
फेडिली दुसरी शेलारी वैजापूरी
फेडिली तिसरी पुन्नड नागद भर्जरी
हिरवा दोखा कंचुकी गोरू पटाव्या नेसली
चुन्ना खंबाईत हिरवी जाई
संकटात पडले एकदा मज भेट देई
सोडिली दिंड काडिली बोभाटाची खजोरी
डाळिंबी काळी चंद्रकळा झळझळी
गुलाबी हिरवी वाण पुरीची खंजुरी
डाळींबी शेवटला म्हणोनि
आपला पितांबर झाकी भेटला मजला देव श्रीहरी
या गीतामधून खंजुरी या वस्त्रांवरील छपाई करण्याच्या विशिष्ट कसबाचे, जे आता संपून गेले आहे, त्याचे नाव आपल्या समोर येते. याशिवाय, आणखीही विशेष माहीती मिळते. महाराष्ट्रात ‘शेलारी’ ही एक प्रसिद्ध साडी होती. या साडीची विशेष माहिती मात्र फारशी कुठे मिळत नाही. औरंगाबाद आणि पैठण ही हातमाग विणकामाची महत्वाची ठिकाणं. पण औरंगाबाद जवळील वैजापूर येथे शेलारी विणली जात असे, ही दुर्मिळ माहिती या लोकगीतामधून आपल्याला मिळते. शेलारीचाच उल्लेख असलेले आणखी एक द्रौपदी वस्त्र वर्णन गीत आहे. यातही सहा-सात साडय़ांची नावे आली आहेत.
पांचाळीचा धावा ऐकुनि लगबग पळतो हरि
नाभीमधूनी दे आिलगन नेसवी शेलारी
शुभ्र पातळ लाल कुसुंबी शालू चंदेरी
खडी चौकडी मुगवी चुनडी पैठणी जरतारी
महाराष्ट्रतल्या लोकगीतांमधून कृष्णाचाच अवतार मानल्या गेलेल्या विठ्ठलाचा उल्लेख कृष्णाच्या जागी केला जातो.
धुरपती नेसईली उंच मोलाचा पीतांबर
दुर्योधन बोलविला बैस माझ्या मांडीवर
धुरपती गांजली केली नगीन उधडी
पांडुरंग बंधु इथे देती भारूंभार लुगडी
धुरपतीच्या निऱ्या काय फेडशील येडय़ा
परोपरीच्या त्या घडय़ा इंद्रदेशीच्या चुनडय़ा
धुरपती नेसईली नऊ लाखाची मिराणी
तिची बोळवण केली बंधु सारंगधरानी
हे गीतही पीतांबर, चुनडी, मिराणी अशा मराठी साडय़ांनी नटले आहे. आणखी एका गीतातूनही शेलारी त्या वेळची किती लाडकी साडी होती हे समजते.
द्रौपदीला वस्त्रं देव पुरवी परोपरीची
नेसवली चिटं तिला संगमनेरीची
द्रौपदी नेसली चंद्रिभगाची शेलारी
पापी दुर्योधनाच्या डोळय़ा पडली अंधारी
द्रौपदी नेसली नवलाखाची शेलारी
दुष्ट कौरवांचे डोळय़ाला आली अंधारी
या लोकगीतातून ‘चंद्रिभगाची शेलारी’ हे विलक्षण काव्यात्म नाव आपल्या समोर येते, आणि नऊ लाखांची शेलारी बघून कौरवांच्या डोळय़ाला अंधारी आली, असं कवी म्हणतो. म्हणजे आपल्याला आपल्या वस्त्र वैभवाचे किती हे कौतुक.! अशा साडय़ा द्रौपदीला नेसवून कवीचं मन भरत नाही, तो कृष्णा करवी द्रौपदीला संगमनेरची छापील साडी, चिटंही नेसवतो. या सगळय़ा गीतांमध्ये वस्त्राचे पर्वत पडले असा उल्लेख येतो.
पर्वत वस्त्राचे पडले शत्रु झाले दंग ॥
मथुरेची साडी आणीली जरी पिवळा रंग ॥
ययेल नक्षीची चोळी वरी भिंग ॥
आणखी एका द्रौपदी वस्त्र वर्णनाच्या गीतामध्ये, सहाही कडव्यांमध्ये सहा साडय़ांची नावे व कृष्णाचीही सहा नावे आली आहेत.
वस्त्र फेडी दुर्योधन
पहिला पितांबर
पाठीशी दामोदर
द्रौपदीच्या
वस्त्र फेडी दुर्योधन
दुसरी पैठणी
पाठीशी चक्रपाणी
द्रौपदीच्या
वस्त्र फेडी दुर्योधन
तिसरी वल्लरी
पाठीशी मुरारी
द्रौपदीच्या
वस्त्र फेडी दुर्योधन
चवथा ग शेला
पाठीशी सावळा
द्रौपदीच्या
वस्त्र फेडी दुर्योधन
पाचवे अमोल
पाठीशी घननीळ
द्रौपदीच्या
वस्त्र फेडी दुर्योधन
सहावे जरतारी
पाठीशी कंसारी
द्रौपदीच्या
एका गीतात कवी म्हणतो, द्रौपदीला कासई साडी नेसलेली बघून दुर्योधनाला वाटते की अशी बायको आपल्याला असावी.!
द्रौपदी नेसे रंगारंगाची कासई
दुर्योधनाच्या मनात अशी असतूरी असावी
द्रोपदीच्या मिऱ्या आसडिता हे भागले
यादव इचे बंधू दिंड कैलासी लागले
अशाच प्रकारच्या एका गीतात दहा साडय़ा आणि त्यांच्या दहा पेठा यांची नावे आली आहेत. या गीतातल्या एका ओळीत ‘भिवंडीची शुभ्र पांढरी’ असा उल्लेख आहे. याबद्दल मी ‘रंग संवेदना’ या लेखात लिहिले होते. ते वाचून एक वाचक, ज्या वस्त्र रसिकही आहेत, श्रीमती नीलिमा इनामदार यांनी मला भिवंडीची साडी आपल्या श्वेत रंगासाठी खूप प्रसिद्ध होती असे सांगितले. तसेच त्यांनी या साडीच्या स्वरूपाबद्दल आणि त्या रेशमाबद्दलही विशेष माहिती दिली. या गीतात या कवीने जर असा उल्लेख केला नसतां तर भिवंडीची साडी आणि तिचे वेगळेपण याबद्दलची नोंद राहूनच गेली असती.
बनारसचा शालू भरजरी
येवल्याची रेशमी पैठणी
इंदूरची ती नाजूक काळी
धारवाडची जाड इरकली
सुरतची ती छापील साडी
भिवंडीची शुभ्र पांढरी
मालेगांवची साडी काकाणी
इचलकरंजीची जाडी भरडी
राजस्थानची लाल पिवळी
लखनौची ती साडी निराळी
अशा प्रकारचे वैशिष्टय़पूर्ण वस्त्र वैभव मिरवणारा आपला मराठी समाज, असे काव्य वैभव निर्माण करू शकतो, यात नवल ते काय.!!
viva@expressindia.com