News Flash

पुढच्या वर्षी लवकर या..!

गोदावरी-कुर्ला एक्स्प्रेसमधील गणेश विसर्जनावेळी आक्षेपार्ह गाणे वाजविल्यावरून चार जणांविरुद्ध मनमाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

| September 20, 2013 07:34 am

आक्षेपार्ह गाणे वाजविल्यावरून तिघांना पोलीस कोठडी
गोदावरी-कुर्ला एक्स्प्रेसमधील गणेश विसर्जनावेळी आक्षेपार्ह गाणे वाजविल्यावरून चार जणांविरुद्ध मनमाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईवरून मनमाड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना व भाजपसह काही राजकीय पक्षांनी या कारवाईचा निषेध केला आहे. मंगळवारी रात्री गोदावरी एक्स्प्रेस मनमाडला आल्यानंतर गुरूद्वाराच्या मागील भागात हा प्रकार घडला. ‘बनायेंगे हम मंदिर’ अशी धून संबंधितांनी मिरवणुकीवेळी वाजविली. याची माहिती दुरध्वनीवरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर अंबादास जाधव, किरण परळकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तीन संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संबंधितांची पोलीस कोठडीत रवानगी केली. मिरवणुकीत गाणे कोणते वाजवायचे याची यादी शासनाने आता जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना व इतर पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
खास प्रतिनिधी, नाशिक
ढोल ताशांचा गजर आणि डिजेच्या दणदणाटात गुलालाची उधळण करत नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणरायाला ‘पुढील वर्षी लवकर या’ अशी साद घालत निरोप देण्यात आला. सुमारे अकरा तास चाललेल्या नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत गुलालवाडी मित्र मंडळाचे बाल-गोपाळांचे लेझिम पथक आणि युवतींचा सहभाग असणारे बँड पथक हे जसे खास आकर्षण ठरले, तसेच नेत्रदीपक रोषणाईने सजविलेल्या भव्य गणेश मूर्ती, मर्दानी खेळांसोबत रंगलेली दहीहंडी ही देखील वैशिष्ठय़े राहिली. दरम्यान, मनमाड येथे ‘बनायेंगे हम मंदिर’ या गाण्याची डिजेवर धून वाजविल्यावरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकडी बारव येथे दुपारी दोन वाजता महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते महापालिकेच्या गणपतीची आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. महापालिकेने यंदा खास ढोल-पथक मागविले होते. आ. वसंत गिते, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, नगरसेवक अशोक मूर्तडक, गजानन शेलार, डॉ. प्रदीप पवार, विनायक पांडे आदिंनी मिरवणुकीत काही काळ नृत्यही केले. मूर्तडक यांना ढोल वाजविण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतरचा मान रविवार कारंजा मित्र मंडळाचा होता.
या मंडळांसोबत यशवंत व्यायाम शाळेच्या खेळाडूंकडून रोप मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. गुलालवाडी मित्र मंडळाच्या ढोल पथकांमध्ये युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग होता. जमिनीवर ढोल रचून त्यावर उभे राहत युवती झांज व चिपळ्यांचा गजर करीत होत्या. शिवाय, बालगोपाळांचे लेझिम पथक ही नेहमीची ओळख गुलालवाडींने यंदाही कायम ठेवली. या मंडळाची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांची धडपड सुरू होती.
यंदा मिरवणुकीत सूर्यप्रकाश नवप्रकाश, मुंबई नाका मित्र मंडळ, साक्षी गणेश, शिवसेवा मित्र मंडळ, गोरेराम या मित्र मंडळांतर्फे विशेष प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात आल्यामुळे अंधार पडल्यानंतर गणेश मूर्तींचे सौंदर्य अधिकच खुलून दिसले. आकर्षक मूर्तीना भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांची चढाओढ सुरू होती.
‘नाशिकचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा गणेश सनईच्या सूरात मार्गक्रमण करत होता. यावेळी महिलांतर्फे पारंपरिक वेशभूषेत फुगडय़ा व तत्सम खेळ सादर करण्यात आले. गोरेराम मित्र मंडळाच्या मिरवणुकीत चित्तथरारक मर्दानी खेळांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. खेळादरम्यान दहीहंडी ही उभारण्यात येत होती.  
मिरवणूक रेंगाळू नये म्हणून पोलीस यंत्रणेने बरीच दक्षता घेतली असली तरी ठिकठिकाणी मंडळांचे राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांमार्फत होणाऱ्या स्वागताने त्यास अपेक्षित यश मिळाले नाही. स्वागत कमानीसमोर नाचण्यात बराच वेळ घालविला जात असल्याने काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
मिरवणुकीत एकूण २३ मंडळे सहभागी झाली. परंतु, त्यांचे क्रमांक काहिसे मागे-पुढे झाले होते. राजकीय दबाव टाकून काही मंडळांनी पुढील क्रमांक हिसकावल्याने मध्येच शेवटच्या काही क्रमांकांच्याा मंडळांचा शिरकाव झाल्याचे दिसत होते.
 न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री बारा वाजता वाद्ये वाजविण्यास पोलिसांनी प्रतिबंध केल्यावर काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा परिसरात ठिय्या दिला. परिणामी, काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मिरवणूक पूर्ववत केली. असा किरकोळ अपवाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडल्याची माहिती उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. वाद्ये बंद झाल्यामुळे गणेश मंडळांनी शक्य तितक्या लवकर विसर्जन करण्यास प्राधान्य दिले.
दरम्यान, शहरातील नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड, सातपूर, अंबड इतर भागातही वाजतगाजत व विधीवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागातही असाच उत्साह दिसून आला.
मनमाडमध्ये शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री नीलमणीची खास पुणेरी थाटात संस्कृती व परंपरेचे जतन करत निघालेली पालखी, सर्वात जुन्या आझाद गणेश मंडळासह युवकक्रांती गणेश मंडळ व अनेक मंडळांच्या झांज पथकासह निघालेल्या मिरवणुका हे वैशिष्ठय़े ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 7:34 am

Web Title: 11 hours immersion procession in nashik
टॅग : Nashik
Next Stories
1 नाशिकमध्ये सुमारे दीड लाख गणेश मूर्तींचे ‘संकलन’
2 ‘रिलायन्स’च्या साथीने आता ‘गोदापार्क’ची वाट
3 अन्नपदार्थ विक्रेत्यांना परवाना घेण्याचे आवाहन
Just Now!
X