केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी शहर व जिल्ह्यात विविध संस्था व संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने १२०० पोस्टकार्ड शरद पवार यांना पाठविण्यात आली. तर, १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी पत्रकान्वये दिली.
शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातून क्रीडा, शैक्षणिक, कृषी, सांस्कृतिक, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी  शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पत्राव्दारे शुभेच्छा तसेच विविध सूचनाही केल्या आहेत. असे १२०० पोस्टकार्ड १२:१२:१२ च्या मुहूर्तावर दिल्लीतील पवार यांच्या पत्त्यावर पोहोचतील अशी व्यवस्था प्रतिष्ठानने केली आहे. खा. समीर भुजबळ यांच्या प्रेरणेने व गणेश मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऋषिकेश देव, अमोर भामरे, उल्हास बोरसे आदींचे सहकार्य मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार संपूर्ण जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. १२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता हरसूल, १० वाजता त्र्यंबकेश्वर, १२.१२ वाजता नाशिकचे छत्रपती शिवाजी स्टेडियम, दुपारी १२.४५ वाजता पळसे तर, सायंकाळी सात वाजता तिरडशेत येथे कार्यक्रम होईल. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० दिंडोरी, दुपारी दोन वाजता कळवण, १४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता नांदुरशिंगोटे, ११ वाजता सिन्नर महाविद्यालय, १५ डिसेंबर रोजी बागलाण तालुका ग्रामीण व सटाणा शहरात कार्यक्रम होतील.  
१६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मालेगाव आणि दुपारी चार वाजता नांदगाव, १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरगाणा, १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ चांदवड, १९ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आणि दुपारी दोन वाजता पिंपळगाव बसवंत, असा सप्ताहाचा कार्यक्रम होईल.
राष्ट्रवादी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता त्र्यंबक नाक्याजवळील डॉक्टर हाऊसपासून या स्पर्धेस सुरूवात होईल. स्पर्धेत मोठय़ा संख्येने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.