23 September 2020

News Flash

डोंबिवलीतील प्रदूषण रोखण्यासाठी ‘सीईटीपी’त बसविली ४५ लाखांची यंत्रणा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात काही कंपन्यांकडून प्रदूषण केले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सरधोपट सरसकट सर्वच कंपनी मालक प्रदूषण करतात म्हणून

| February 18, 2014 01:00 am

उद्योजकांनीच घेतला पुढाकार
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात काही कंपन्यांकडून प्रदूषण केले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सरधोपट सरसकट सर्वच कंपनी मालक प्रदूषण करतात म्हणून ते चोर आहेत असे ठरवून कंपन्या बंद करण्याची कारवाई करीत आहेत. यामुळे व्यथित झालेल्या औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योजकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने परदेशी बनावटीचे ४५ लाखाचे ‘मोनो बेल्ट फिल्टर प्रोसेस’ ही अत्याधुनिक मशीन ‘सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या’ (सीईटीपी) डोंबिवली विभागात बसविली आहे.
‘एमआयडीसी’च्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात दररोज एमआयडीसी, विविध कंपन्यांमधून उत्पादनाची प्रक्रिया झाल्यानंतर जे रासायनिक सांडपाणी येते, ते प्रक्रिया केंद्रात घुसळले जाते. प्रक्रिया केंद्राची क्षमता १५०० ते १६०० क्युबिक मीटर आहे. हे घुसळलेले रासायनिक पाणी तीन ते चार टप्प्यांच्या रासायनिक प्रक्रियांमधून बाहेर काढले जाते. घुसळण करूनही रसायनातील अनेक घटक या रासायनिक प्रक्रियेत विरघळत नाहीत. ते सांडपाण्याच्या तळाला साचून राहतात. हे अविद्राव्य घटक नाला प्रदूषित करतात. अविद्राव्य रासायनिक घटक नाल्यात जाऊन नाला प्रदूषित होऊ नये म्हणून ‘मोनो बेल्ट फिल्टर प्रोसेस’ ही अत्याधुनिक मशीन महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे उद्योजकांनी सांगितले.
नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्यानंतर जे अविद्राव्य घटक टाकीच्या तळाला राहतात, ते घटक अत्याधुनिक यंत्रामध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत अविद्राव्य घटकातील पाणी काढून उरलेला रासायनिक चिखलासारखा काळा भाग या मशीनमधून बाहेर फेकला जातो. हा अंशत: सुका-ओला असलेला ‘रासायनिक चिखल’ स्वयंचलित पद्धतीने वाळतो. हा रासायनिक चिखल ट्रकमध्ये भरून तळोजा येथील प्रकल्पात नेण्यात येतो. यापूर्वी हा रासायनिक चिखल वाळविण्यासाठी आठवडा लागायचा. त्यानंतर त्याची वाहतूक केली जात होती. पावसाळ्यात हा चिखल वाळत नसल्याने वाहून नेणे अवघड होत असे. आता ही प्रक्रिया झटपट झाली असल्याचे उद्योजकांनी सांगितले.  

सुक्याबरोबर ओलेही..
डोंबिवली एमआयडीसीतील बहुतेक कंपन्यांचे मालक, चालक हे परदेशातील शिक्षण घेतलेले तर काही मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलजी’मधील पदव्युत्तर पदवीधर, पीएच.डी.धारक आहेत. बहुतेक उद्योजक हे डोंबिवली, मुंबई परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे सामाजिक भान ठेवून प्रत्येक जण उत्पादन करतो. अनेकांचे वास्तव्य एमआयडीसी भागात आहे. असे असताना कुणीही हेतुपुरस्सर प्रदूषण करीत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळावर न्यायालय किंवा लवादाने ताशेरे ओढले की, त्याचा राग मंडळाचे अधिकारी कंपन्यांवर काढतात. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके थोडे उद्योजक प्रदूषणाबाबत बेफिकिरी दाखवितात आणि शिक्षा मात्र इतर सर्वाना भोगावी लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 1:00 am

Web Title: 45 lakhs system for preventing pollution
टॅग Thane
Next Stories
1 मोबाइल लहरींना बेकायदा इमारतींचा अडथळा
2 ‘टीएमटी’च्या विस्ताराला अतिक्रमणांचा खोडा
3 डोंबिवलीत अवकाळी पाऊस
Just Now!
X