News Flash

खैरेंवर आरोप-निषेधाने मनपाच्या सभेत गदारोळ!

औरंगाबाद महापालिकेचा खेळखंडोबा खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे झाला, असा आरोप करीत त्यांचा निषेध करीत भारिप- बहुजन महासंघाचे नगरसेवक मिलिंद दाभाडे व अमित भुईगळ यांनी गदारोळ

| September 27, 2013 01:55 am

खैरेंवर आरोप-निषेधाने मनपाच्या सभेत गदारोळ!

औरंगाबाद महापालिकेचा खेळखंडोबा खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे झाला, असा आरोप करीत त्यांचा निषेध करीत भारिप- बहुजन महासंघाचे नगरसेवक मिलिंद दाभाडे व अमित भुईगळ यांनी गदारोळ केल्याने मनपाची सर्वसाधारण सभा गाजली.
मनपा अंदाजपत्रकास न्यायालयाची स्थगिती, प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकातील कामांनाच मंजुरी देण्याबाबत तत्कालीन प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांचे पत्र या विषयांवरून सभेत आरोप-प्रत्यारोप झाले. मनपाचे काही अधिकारी नगरसेवकांना वेठीस धरण्यास षड्यंत्र रचत आहेत. परिणामी शहरातील सर्व विकासकामे रेंगाळल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ज्या पद्धतीने अंदाजपत्रक सादर केले, त्यातील उणिवा स्पष्ट सांगत या पुढे केवळ स्पीलओव्हरच्या तरतुदीतूनच कामे करावी लागतील, असे सांगितले. मनपाच्या तिजोरीत येणारी रक्कम व तयार केलेले अंदाजपत्रक यातील तूट लक्षात घेता व न्यायालयीन आदेशाचा विचार करता विकासासाठी निधीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले.
सभा सुरू झाल्यानंतर केवळ पदाधिकाऱ्यांच्याच वॉर्डात कामांना मंजुरी दिली जाते. सर्वसामान्य नगरसेवकांची कामे होत नाहीत, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुरू केली. नगरसेवक राजू शिंदे यांनी २१ ऑगस्टला तत्कालीन आयुक्त गोकुळ मवारे यांनी काढलेले पत्रच सभागृहासमोर ठेवले. या पत्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसारच कामे प्रस्तावित करावी, अशा आशयाचा मजकूर असल्याचे सांगण्यात आले. २१ ऑगस्टला काढलेले पत्र पदाधिकाऱ्यांना दाखविले होते काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हे पत्र निघण्याच्या ३ दिवस आधी पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डात २२ कोटींची कामे मंजूर केली. त्यानंतर  अधिकाऱ्यांनी तयार केलेले अंदाजपत्रकच मंजुरीस वापरले जावे असे का सांगितले जाते, अशी विचारणा करण्यात आली.
या बरोबरच न्यायालयाने अंदाजपत्रकाला दिलेल्या स्थगिती आदेशाचे नक्की स्वरूप काय, याची विचारणा करण्यात आली. अंदाजपत्रकातील वाढीव रकमेबाबत काही अधिकाऱ्यांना आक्षेप होते. मात्र, ज्या पद्धतीने कागदपत्रांची फिरवाफिरव झाली, त्यावरून विकासकामांना खीळ बसावी, असे षड्यंत्र अधिकारी रचत असल्याचा आरोप नगरसेवक समीर राजूरकर यांनी केला. या अनुषंगाने आयुक्तांनी खुलासा करावा, अशा सूचना देण्यात आल्या. या वेळी २१ ऑगस्टला काढलेले पत्र रद्द केल्याचे आयुक्तांनी जाहीर केले.
एकूण अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार नवीन काम घेणे शक्य नसल्याचा सूर त्यांचा होता. त्याला नगरसेवकांनी आक्षेप घेतले. चर्चेत भारिप-बहुजन महासंघाच्या २ नगरसेवकांनी मनपाचा खेळखंडोबा खासदार खैरे यांनी केल्याचा आरोप केला व त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्याने कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. ‘खैरे मुर्दाबाद व त्यांचा निषेध’ हे शब्द परत घ्यावेत, अशी विनंती महापौरांनी केली. मात्र, ती दोन्ही नगरसेवकांनी धुडकावली.
हा कॅमेरा कोणाचा?
पत्रकारांच्या गॅलरीत नेहमी एक कॅमेरामन उभा असतो. तो नक्की कोणत्या वृत्तवाहिनीचा, असा प्रश्न भारिपचे अमित भुईगळ यांनी उचलून धरला. त्याला साथ देत मिलिंद दाभाडे यांनी, हा कॅमेरा ‘मछलीखडक’ वाहिनीचा आहे. मछलीखडक भागात खैरे राहतात. प्रत्येक बैठकीचे चित्रण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा कॅमेरामन उभा असतो. त्याचा कॅमेरा सुरू झाला की, अनेक नगरसेवक मित्र बोलेनासे होतात. काही अधिकाऱ्यांनाही तो तापदायक असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. तो कोणाच्या परवानगीने सभागृहात आला, अशी विचारणा करताच आपण त्यांना परवानगी दिल्याचे महापौरांनाही सांगावे लागले. प्रत्येक सर्वसाधारण सभा व महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या वेळी कॅमेऱ्याची नजर यावरून सभागृहात आज गोंधळही झाला आणि हशा पिकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2013 1:55 am

Web Title: accuse remonstrate on khaire in glamour of corporation meeting
Next Stories
1 खड्डय़ांवर नगरसेवकांचे ‘मौन’, मंत्र्यांकडून मात्र सूचक भाष्य!
2 आमदार जाधवांच्या सेना प्रवेशाच्या वृत्ताने कन्नडचे शिवसैनिक अस्वस्थ
3 न्यायालयाच्या केबिनमध्येच लाचखोर वकील सापळय़ात
Just Now!
X