चौकीदाराचा खून करून दरोडा
तपास पथकाला बक्षीस
कोणताही परिस्थितीजन्य पुरावा न सोडता चौकीदाराची निर्घृण हत्या करून आमदार राठोड त्यांच्या कार्यालयातील १ लाख १० हजाराची रक्कम लांबविणाऱ्या आरोपींना महत् प्रयासाने शोधून काढणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिराक्षकांनी १५ हजार व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांच्या या कार्याचा गौरव केला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली.

कोणताही परिस्थितीजन्य पुरावा न ठेवता अत्यंत शिताफीने चौकीदाराची हत्या करून आमदार संजय राठोड यांच्या घरवजा कार्यालयावर दरोडा घालून पोलिसांना आव्हान देणाऱ्या आरोपींचा अखेर शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखा व टोळीविरोधी पथकाला यश प्राप्त झाले. पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण केंद्रात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंदनसिंग बायस, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे, कॉंस्टेबल सय्यद साजीदसह या घटनेचा तडा लावणाऱ्या पथकातील सदस्यही उपस्थित होते.
गेल्या २० दिवसांपूर्वी आमदार संजय राठोड यांच्या घरवजा कार्यालयावर दरोडा घालून तेथील १ लाख १० हजाराची रक्कम लुटण्यात आली. लुटीपूर्वी शांत डोक्याने चौकीदार लक्ष्मण ठेंगरे यास चारचाकी वाहनातून किन्ही शिवारात नेऊन त्याची हत्या करण्यात आली होती. या आरोपींना हुडकून काढण्याचे जबर आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी शंभराहून अधिक हिस्ट्री शिटरची चौकशी केली. एवढेच नव्हे, तर प्रत्येक दृष्टीकोणातून या घटनेचा तपास केला. शेवटी पोलिसांचे कौशल्य कामी आले व या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळविले.
चौकीदाराची हत्या करून १ लाख ९ हजार रुपयांची रक्कम लुटल्याची कबुली देणारे आरोपी जितेश खत्री (२४), साहेबराव पवार (२५, दोघेही रा. अमराईपुरा) व विलास पवार (२४, रा. लोहारा) यांना शुक्रवारी स्थानिय गुन्हे शाखेने अटक केली. या गुन्ह्य़ाची त्यांनी कबुली दिली, मात्र त्यांचे दोन साथीदार अजूनही पोलिसांना गवसलेले नाहीत. लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इच स्टोन टू टर्न‘ ही पध्दत वापरून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी हुडकून काढले. जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंदनसिंह बायस आणि टोळी पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय कौशल्याने हे आरोपी शोधण्यात यश मिळविले.
घटनेच्या रात्री यवतमाळच्या दत्त चौकातील आमराई पुऱ्यातील जितेश खत्री, साहेब पवार, आणि विकास पवार यांच्यासह आणखी दोघांनी आमदार संजय राठोड यांच्या जुन्या निवासस्थानी पाहणी केली. त्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास सर्वानी मद्यप्राशन केले आणि एक चारचाकी वाहन घेऊन आमदार संजय राठोड यांच्या घरी हे पाचजण पोहोचले. ठरल्याप्रमाणे प्रथम एकाने फाटकातून आत शिरून चौकीदार लक्ष्मण सखाराम ठेंगरे (६०) याचे तोंड दाबले. इतरांनी हातपाय पकडून चाकूचा धाक दाखवून त्याला मोटारीत कोंबले. त्यानंतर चौकीदाराला सुमारे पाच कि.मी. अंतरावरील किन्ही या गावातील एका पडीत कुक्कुटपालन केंद्राजवळ नेऊन या सर्वानी त्याचा निर्घृण खून केला आणि मृतदेह तेथेच टाकून परत आमदार राठोड यांच्या घरी पोहोचले.
घराचा कडीकोंडा तोडून सर्वानी आत प्रवेश केला. त्यानंतर अगदी आरामशीर घरातील प्रत्येक कपाट फोडून उघडून त्यातील १ लाख १० हजार रुपये घेऊन हे सर्व रातोरात दरोडय़ात वापरलेल्या वाहनानेच बाहेरगावी निघून गेले.
या प्रकरणात आरोपींना कोणताही पुरावा मागे ठेवला नसतांनाही पोलिसांनी अतिशय कौशल्याने ही कामगिरी बजावली आहे.
या पोलीस ताफ्यात उपनिरीक्षक सुगत पुंडगे, सय्यद साजिद सय्यद हाशम, अखिल देशमुख, वसंत मडावी, विकास खडसे, अरुण नाकतोडे, गजानन अजमिरे, शेखर वांढरे, संजय दुबे, सुनील खंडागळे, रूपेश पाली, विनोद धोंडगे, बबलू चव्हाण, अतुल इंगळे, मंगेश आजणे, सुमित सोनवणे, सय्यद अनिस, रेवन जागृत यांचा समावेश होता.