07 March 2021

News Flash

रेल्वेत दररोज पाच मोबाईल लंपास..

रेल्वेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१४ या वर्षांत मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल ४४२ ने गुन्हे वाढ झाली आहे.

| January 22, 2015 01:36 am

रेल्वेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१४ या वर्षांत मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल ४४२ ने गुन्हे वाढ झाली आहे. त्यात गंभीर गुन्ह्य़ांबरोबर महिलांवरील अत्याचारांचाही समावेश आहे. रेल्वेतून प्रवास करताना दररोज सरासरी पाच मोबाइल चोरीला जातात, तर प्रवास करताना दररोज सरासरी १० प्रवाशांना अपघातात आपला प्राण गमवावा लागतोय.
 रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मागील वर्षांतील विविध गुन्हेगारीचा आढावा घेतला. २०१३ या वर्षांत एकूण २ हजार ६७६ गंभीर गुन्ह्य़ांची नोंद झाली होती, तर २०१४ मध्ये त्यात ४४२ ने वाढ होऊन तब्बल ३ हजार ११८ गुन्ह्य़ांची नोंद झालेली आहे. २०१४ या वर्षांत तब्बल ८ कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली होती. एकीकडे गुन्ह्य़ांत वाढ होत असली तरी दुसरीकडे गुन्ह्य़ांची उकल करण्याचे प्रमाण घटले आहे. २०१३ मध्ये हे प्रमाण ६८ टक्के होते, तर २०१४ मध्ये ते घसरून ५८ टक्के झाले आहे. पण आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ७२ टक्के एवढे वाढले आहे. प्रवाशांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार द्यावी यासाठी रेल्वेने विविध उपाययोजना करून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गुन्ह्य़ांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे सिंघल म्हणाले. गुन्ह्य़ांची लवकर उकल व्हावी यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या फेसबुक पेजवरूनही १३ प्रवाशांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या आहेत.
रेल्वेतून प्रवास करताना २०१४ या वर्षांत तब्बल साडेतीन हजार प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यात रूळ ओलांडताना १ हजार १९२, लोकलमधून पडून ७९४, गॅपमधून पडून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे; परंतु अद्यापही १०६९ मृत प्रवाशांची ओळख पटलेली नाही.
रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षांत दीड हजारांहून अधिक मोबाइल फोन ट्रेनमधून चोरण्यात आले. म्हणजे दिवसाला सरासरी पाच मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या मोबाइल्सची किंमत २ कोटी १७ लाख एवढी आहे. मोबाइल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी मोबाइल कंपन्यांशी संपर्क करून काही विशेष अ‍ॅप्लिकेशन तयार करता येईल का, याबाबत चर्चा सुरू असल्याचे आयुक्त सिंघल यांनी सांगितले.
दोन वर्षांतील ९७ जण अद्यापि बेपत्ता
२०१३ मध्ये रेल्वेतून प्रवास करणारे १६२ आणि २०१४ मध्ये २१० जण बेपत्ता झाले होते. त्यातील ९७ जणांचा अद्यापि शोध लागलेला नाही. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शोध या संकेतस्थळामार्फत शोध सुरू आहे.
 लवकरच देशभरातील गुन्ह्य़ांची माहिती व्हावी यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला जाणार असल्याचे आयुक्त सिंघल यांनी सांगितले. देशातील सर्व वरिष्ठ रेल्वे अधिकारी या ग्रुपद्वारे जोडले जाऊन गुन्ह्य़ांबाबत चर्चा केली जाणार आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:36 am

Web Title: average 10 railway commuter in mumbai die per day
Next Stories
1 आपला प्राध्याअ‍ॅपक
2 पे अ‍ॅण्ड पार्क विरोधात रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात
3 रस्त्यावरील दिव्यांचे स्वयंचलित नियंत्रण
Just Now!
X