यशवंतपूर-पंढरपूर-चंदीगड एक्स्प्रेसमध्ये एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि रेल्वे गाडीतील खानपान सेवा कर्मचारी यांच्यात खाद्यपदार्थाच्या दर्जावरून रविवारी झालेल्या हाणामारी प्रकरणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वेतील वाढत्या असुरक्षिततेचा प्रश्न गाजत असताना आता रेल्वेत मिळणाऱ्या खाद्याच्या दर्जाविषयी तक्रारी येऊ लागल्याने या संपूर्ण प्रकरणाची रेल्वे विभागाने चौकशी करण्याची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.
कोपरगाव ते मनमाड दरम्यान रविवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास धावत्या गाडीत ही घटना घडली.
यशवंतपूर-चंदीगड या गाडीतून एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेचे ६० कार्यकर्ते बंगळूरू ते नवी दिल्ली असा प्रवास करत होते. रविवारी दुपारी या विद्यार्थ्यांनी पेन्ट्रीकारमधील बिर्याणी घेतली. त्यात एका कार्यकर्त्यांच्या बिर्याणीत खिळा निघाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी धावत्या गाडीतच पेन्ट्रीकारच्या डब्यात जाऊन खाद्यपदार्थाच्या दर्जाबाबत जाब विचारला. पेन्ट्रीकार कर्मचारी व कार्यकर्ते यांच्यात वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. कर्मचाऱ्यांनी जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांवर गरम पाणी व नंतर गरम तेल फेकले. त्यात तीन कार्यकर्ते जखमी झाले. कोपरगाव येथून ही हाणामारीची घटना सुरू झाली. घाबरलेल्या प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविण्याचाही प्रयत्न केला. विद्यार्थी कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याने पेन्ट्रीमधील कर्मचाऱ्यांनी कारचे दरवाजे बंद करून घेतले. गाडी साडेतीनच्या सुमारास मनमाड स्थानकात आल्यावर पोलिसांनी पेन्ट्रीकारचा दरवाजा तोडून डब्यात प्रवेश करत १७ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. दोन्ही बाजुकडील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.
पेन्ट्रीकारमधील खानपान सेवा व खाद्याचा दर्जा बेचव असून त्यासंदर्भात तक्रार करण्यासाठी गेलो असता कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत अंगावर गरम तेल फेकल्याचे विद्यार्थी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर, विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात खाद्यपदार्थ घेऊनही त्याचे पैसे दिले नाही. त्यांना बिर्याणी बदलून देण्यात आली, असे  खानपान सेवा कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकाराने अलीकडे रेल्वेतील प्रवास हा प्रवाशांसाटी तापदायक झाल्याचे सिध्द होत आहे. विशेषत्वाने रेल्वेत लुटमारीच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय झाला आहे. भुसावळ ते मनमाड आणि मनमाड ते इगतपुरी या परिसरात रेल्वेमध्ये प्रवाशांना धाक दाखवित लूट करून फरार होण्याचे प्रकार अधिक होत आहेत. याच महिन्यात नाशिक येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय तरूणाला पैशांसाठी भोसकण्याचा प्रकार नाशिकरोड ते मनमाड या दरम्यान रेल्वे प्रवासात घडला. पोलिसांनी याप्रकरणी त्वरीत कार्यवाही करत संशयितांना अटक करण्यात यश मिळविले. या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेली तत्परता निश्चितच वाखाणण्याजोगी असली तरी असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून उपाययोजनांची गरज आहे. प्रत्येक डब्यात संशयितांची चौकशी करणे, रेल्वे स्थानकावर नाहक रेंगाळणाऱ्यांना अटकाव करणे, स्थानक येताच रेल्वे थांबण्याआधीच फलाटावर उडी मारून फरार होणे, असे प्रकार रोखण्याची आवश्यकता आहे.
हे प्रकार होत नसताना आता चक्क रेल्वेतील खाद्याच्या दर्जावरून प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याने प्रवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.