महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे मंदिर उभारण्याची योजना म्हणजे हिंसेला गौरवान्वित करणे होय, असे स्पष्ट प्रतिपादन वध्र्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चितरंजन मिश्र यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्तमानातील प्रश्न आणि साहित्य’ हा विषयावरील त्रिदिवसीय चर्चासत्रात ते बीजभाषक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. वीणा दाढे, यूएसएचे डॉ. बलराम सिंह, कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रा. प्रभाकर श्रोत्रिय, मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत मिरजकर आणि इतर यावेळी उपस्थित होते.
विद्यापीठ परिसरातील औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या सभागृहात बोलताना मिश्र यांनी अनेक वर्तमान घडामोडींचा उल्लेख केला. ते म्हणाले, जेव्हा खूप मोठय़ा प्रमाणात अनर्थ होत असतो. तेव्हा परंपरा आणि साहित्याला जग जवळ करते. प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरे शोधण्याचे कामही साहित्य करते. गांधींच्या मारेकऱ्यांचे मंदिर बनवण्याची योजना आखली जात आहे. मारेकऱ्याला एकप्रकारे पुजनीय करणे म्हणजे हिंसेला गौरवान्वित करणे होय. मात्र, या पाश्र्वभूमीवर सत्ता, व्यवस्था, गुणीजन आणि बुद्धिजीवी मुग गिळून असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. सिंह यांनी वर्तमानातील पर्यावरणाचा ऱ्हास आणि दहशतवादाचा मुद्दा उद्घाटकपर भाषणात मांडला. सुख साधनांच्या वाढीमुळे आपण प्रकृतीचा नाश करीत असल्याचे ते म्हणाले. डॉ. मिरजकर यांनी प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी स्वप्न दाखवण्याचे काम मराठीतील कथा, कविता, ललित कशाप्रकारे पार पाडत आहेत, याचा लेखाजोखा मांडला. गर्दीत हरवलेला माणूस, माणसाच्या अस्तित्वाचे भेदक दर्शन आणि दलित, स्त्रियांच्या जगण्याचे भावविश्वा मराठी साहित्य उलगडते.
बालविश्वापासून ते वृद्धविश्वापर्यंतचे प्रश्न मराठी साहित्यात हाताळले जातात, असे ते म्हणाले. डॉ. सिंह यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणातून साहित्याचा उल्लेख केला. डॉ. विनायक देशपांडे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी डॉ. वीणा दाढे, चर्चासत्राचे संयोजक डॉ. मनोज पांडे, आणि कार्यक्रमाचे संचालन करणारे डॉ. प्रमोद शर्मा यांच्या पुस्तकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. हिंदीच्या माजी विभाग प्रमुखांचा पाहुण्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. विद्युलता वारके आणि संतोष गिऱ्हे यांचे यावेळी सहकार्य लाभले.