जिल्ह्य़ातील बुलढाणा, खामगाव व मेहकर तालुक्याला रात्रभर व सकाळी अकरा वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात सर्वदूर पाऊस झाला. सर्वाधिक म्हणजे ११० मि.मी. पाऊस बुलढाणा शहर व परिसरात झाला. त्या खालोखाल खामगांवमध्ये १०८ मि.मी. पाऊस पडला असून मेहकरात ८१ मि.मी. पाऊस झाला. रात्रभरापासून सकाळपर्यंत सातत्याने पाऊस झाल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. वाहतूकीलाही खोळंबा निर्माण झाला.
बुलढाणा शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा अजिंठा मार्गावरील देऊळघाट येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. शहरानजीक असलेल्या पैनगंगा नदीलाही पूर आल्याने येळगांव धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरानजीकच्या व पैनगंगा नदीच्या काठावरील कोलवड, सागवन, येळगांव, साखळी या गावांच्या शेतात मोठय़ा प्रमाणावर पुराचे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले. बुलढाणा शहरात धो धो कोसळलेल्या पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. शहरात ठिकठिकाणी पाण्याचे तलाव साचलेले आढळून आले. शहर परिसरातील नदी नाल्यांना गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच पूर गेला. अतिवृष्टीमुळे खामगांव व मेहकर तालुक्यातही जनजीवन विस्कळीत झाले. काही प्रमाणात पिकांचीही हानी झाली. बुलढाणा, चिखली व मेहकर तालुक्यात झालेल्या पावसामुळे पेनटाकळी व कोराडी प्रकल्पाच्या जलाशयाची पातळी वाढली आहे. जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात एकूण ६०९.८१ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्य़ात एकूण सरासरी पावसाच्या ४७ टक्के पाऊस झाल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले. गेल्या २४ तासात अन्य तालुक्यात झालेला पाऊस चिखली ३२ मि.मी., लोणार २८, सिंदखेडराजा १३, मलकापूर १९, मोताळा ५९, नांदुरा ५०, शेगांव ५०, जळगांव जामोद २२, संग्रामपूर ३० मि.मी. चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पाणीटंचाईचे संकटही दूर होण्याच्या मार्गावर आहे.