महिला सुरक्षेबद्दल सजगता बाळगल्याने प्रसिद्धी मिळतेय, म्हणून महिला सुरक्षेसाठीच्या विविध घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात एकही घोषणा अमलात आणायची नाही, हा प्रकार सध्या सर्रास घडताना दिसतो. मात्र महिला सुरक्षेचे उपाय योजल्याबद्दल खास पुरस्कार स्वीकारणाऱ्या बेस्टमध्येदेखील असाच प्रकार घडल्याची धक्कादायक बाब गुरुवारी बेस्ट समितीच्या सभेतच समोर आली. बेस्टच्या एका बसगाडीत आपला विनयभंग झाल्याची तक्रार एका महिलेने केली. पोलिसांनी या गाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पुरावा म्हणून मागितले आणि बेस्ट प्रशासनाची अकार्यक्षमताच उघड झाली. या गाडीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने बेस्ट प्रशासन हा पुरावा देण्यास असमर्थ ठरले.
११ ऑगस्ट रोजी बेस्टच्या ६७ क्रमांकाच्या बसमधून प्रवास करीत असताना एका महिलेची छेड काढली गेली. तिने तातडीने ही गोष्ट वाहकाला सांगताच गाडी काळाचौकी पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनीही तिची तक्रार नोंदवून घेतली. या बसगाडीत पुढील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा बसवला असल्याने पोलिसांनी बेस्ट प्रशासनाकडे या कॅमेऱ्यातील चित्रीकरण पुराव्यादाखल मागितले. मात्र हा कॅमेरा नादुरुस्त असल्याने चित्रीकरण उपलब्ध नाही, असे सांगण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. विशेष म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या ६७व्या वर्धापन दिनी गेल्या आठवडय़ात याच क्रमांकाच्या बसमध्ये बेस्टने खास कार्यक्रमही केला होता.
याबाबत समिती सदस्य केदार होंबाळकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. बेस्टच्या बसगाडय़ांमध्ये ३८०० सीसीटीव्ही कॅमेरे असून महिला सुरक्षेसाठी बेस्ट कटिबद्ध असल्याच्या वल्गना प्रशासन करीत असते. मात्र या कॅमेऱ्यांचा उपयोग काय, असा प्रश्न होंबाळकर यांनी उपस्थित केला. त्यावर, सीसीटीव्ही कॅमेरे असले, तरी तब्बल १६०० कॅमेऱ्यातील चित्रीकरण साठवण्याची व्यवस्था नाही. तसेच प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यास बेस्ट बांधील नाही, असे उत्तर बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी दिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण साठवण्याची व्यवस्था असलेल्या बसगाडय़ांमध्येही अनेक कॅमेरे निकामी आहेत.

बेस्टला सुरक्षा व्यवस्थेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांसाठी बेस्टने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे भांडवल केले होते. मात्र आता यातील बहुतांश कॅमेरे बिघडले असून कार्यरत कॅमेऱ्यांचीही चित्रीकरण व्यवस्था सुस्थितीत नाही. आपण महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याची शेखी मिरवताना बेस्ट प्रशासनाने आधी बसगाडय़ांमधील त्रुटी समजून घ्याव्यात, अशी टीका समिती सदस्य होंबाळकर यांनी केली.