आई राजा उदो उदो, येडासरीचा उदो उदोच्या गगनभेदी जयघोषात सुमारे १२ लाखांहून अधिक भाविकांनी येडेश्वरीच्या पालखीला खांदा देवून चुना वेचण्याचा मुख्य धार्मिक सोहळा मोठय़ा उत्साहात पार पाडला. प्रतिवर्षांप्रमाणे यंदाही महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातूनही भाविक मोठय़ासंख्येने चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी येरमाळ्यात दाखल झाले होते.
धार्मिक विधीनुसार सकाळी साडेआठ वाजता देवीची पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर नऊच्या सुमारास येडेश्वरीच्या पालखीच्या आई राजा उदो उदोच्या जयघोषात येरमाळा गावाच्या दिशेने प्रस्थान झाले. डोंगरावरून पालखी चुन्याच्या रानात जात असताना, लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन मोठय़ा आनंदाने घेतले. येडेश्वरी देवीची पारंपारिक गाणी म्हणत, हालग्या आणि सबळाच्या तालावर बेहोष होत भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी गावातील मुख्य चौकात आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने विधिवत फुलांचे हार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखीने चुन्याच्या रानाकडे प्रस्थान केले.
सकाळी अकराच्या सुमारास चुन्याच्या रानात पालखी पोचताच भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटला होता. लाखो भाविकांनी पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकले. त्यानंतर पालखी आमराईच्या दिशेने निघाली. आमराईत पालखीसोबत आलेल्या गावातील मानकरी, नागरिक व भक्तांची दर्शनासाठी झुंबड उडाली होती.
पालखीचे दर्शन घेण्यासाठी बार्शीचे आमदार दिलिप सोपल, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ओम राजेिनबाळकर, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील – दुधगावकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील स्वत जातीने चोख बंदोबस्त पार पाडत होते.