साधु-महंतांनी तपोवन व शाही मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा आग्रह धरला असला तरी बारा वर्षांतून एकदाच मिरवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या शाही मार्गाचे अंशत: विस्तारीकरण करण्याचा निर्णय गुरुवारी स्थायी समितीने घेतला.
सभापती राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर तपोवन ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या शाही मार्गाच्या रुंदीकरणाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. पंचमुखी हनुमान ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ व नागचौक ते काटय़ा मारुती चौक १५ मीटर, रामकुंड ते मालवीय चौक व काटय़ा मारुती चौक प्रत्येकी १२ मीटर तसेच सरदार चौक ते काळाराम मंदिर दक्षिणमुखी दरवाजा नऊ मीटर या पद्धतीने शाही मार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. या मार्गावर प्रदीर्घ काळापासून वास्तव्य करणाऱ्या काही नागरिकांची घरे आहेत. या भागाचे सर्वेक्षणही करण्यात आले. ज्या ठिकाणी मोकळी जागा अथवा कोणी वास्तव्यास नसलेली घरे आहेत, त्या ठिकाणी मार्गाचे विस्तारीकरण केले जावे, असा आग्रह सदस्यांनी धरला. शाही मार्गाचा वापर बारा वर्षांतून केवळ एकदा सिंहस्थ काळात केला जातो. त्यासाठी स्थानिक नागरिकांना बेघर करायचे का, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. उपरोक्त भागात ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे, तिथे तो विस्तारित करण्यास हरकत नाही. तसेच मार्गावरील ज्या घरांत, वाडय़ात कोणी वास्तव्यास नाही, त्या ठिकाणी तो विस्तारला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावर चर्चा झाल्यानंतर शाही मार्गाचे अंशत: विस्तारीकरण करण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला.
महावितरण कंपनीला सिंहस्थासाठी करावयाच्या कामांसाठी द्यावयाच्या जागेचा मोबदला घेण्याचे ठरविण्यात आले. पालिकेला मोफत स्वरूपात जागा मिळत नाही. त्यामुळे आपली जागा महावितरणला मोफत का द्यावी, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. पालिका भूसंपादनाचे
पैसे मागत असल्यावरून मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पालिका आयुक्तांना फटकारले होते. स्थायीच्या सदस्यांनी मात्र मोफत स्वरूपात जागा न देण्याची भूमिका कायम ठेवली. अखेर त्या जागेचे नियमानुसार पैसे आकारण्याचे निश्चित झाले.