भूकंपनिधी कोणाच्या कार्यकाळात मंजूर झाला या संदर्भातील पुरावे घेऊन आमदार विक्रमसिंह पाटणकरांनी माध्यमांसमोर आमने-सामने यावे असे माझे आजही त्यांना आव्हान असून, वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा. माझी त्या ठिकाणी यायची तयारी असल्याचे आव्हान माजी आमदार शंभूराज देसाई यांनी आमदार पाटणकरांना दिले. तुम्ही निधी मंजूर करून आणला असाल तर पाटणकर तुम्ही समोरासमोर यायला घाबरता का असा सवालही त्यांनी केला. कराडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शंभूराज देसाई म्हणाले की, मी आमदार असताना २००७ च्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना चर्चेला आणली. त्या सूचनेवरील उत्तरात तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी भूकंप निधी देण्याचा निर्णय २४ जानेवारी २००७ रोजी मंत्रिमंडळ स्तरावर झाला असल्याचे सांगितले होते. त्या अधिवेशन काळातील प्रोसिडिंगच्या प्रती माझ्याकडे आहेत. पाटणकर यांना माझ्या काळात भूकंपनिधी मंजूर झाला असल्याचे मान्य नसेल तर त्यांच्याच सरकारच्या मंत्र्यांनी अधिवेशनात खोटी माहिती दिली असे म्हणायचे का, माझ्या काळात निधी मंजूर झाल्याचे सांगायला ते टाळत आहेत. यातून कोणाचा निष्क्रियपणा उघड होतोय ते दिसत आहे. या निधीसंदर्भात मी तब्बल ४६ वेळा लेखी पाठपुरावा केला असून त्या संदर्भातील फाईलही माध्यमांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. भूकंपनिधी मंजूर झाल्यानंतर तीन वष्रे तो दिला गेला नाही, म्हणून प्रतिवर्षी ५ कोटीप्रमाणे तीन वर्षांचा १५ कोटी निधी भूकंप पुनर्वसन निधी समितीकडे वर्ग करण्याची आपण मागणी केली होती. त्यानंतर पुढील दोन वर्षांचा निधी मिळाला तर १५ अधिक १० असा पंचवीस कोटींचा निधी मिळेल. दोन वर्षांतील १० कोटींचे श्रेय त्यांनी जरूर घ्यावे. त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. या निधीसाठी मी उच्च न्यायालायात जनहित याचिका दाखल केली. मिंत्रमंडळ स्तरावर झालेला निर्णय आणि त्यानंतर
तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांच्या दालनात कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीबरोबर झालेल्या बैठकीतील निर्णय पाहता दोन आठवडय़ात कोयना भूकंप पुनर्वसन समितीला निधी वर्ग करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. कोर्टाचा हा निकालही आमदार पाटणकरांना मान्य नसेल तर हा त्यांचा निष्क्रियपणाच म्हटला पाहिजे. माझ्या याचिकेत दखलपात्र काही नसते, तर उच्च न्यायालयाने ती दाखल करून घेतली असती का? शिवाय त्या याचिकेवर दिलेला निकाल हा भूकंपनिधी कोणाच्या काळात मंजूर झाला याला पुष्टी देणाराच आहे, तरीही या संदर्भात माध्यमांसमोर आमनेसामने यायची माझी केव्हाही तयारी आहे. यापूर्वीही मी अनेकदा आव्हान दिले आहे. ते स्वीकारून समोरासमोर येऊन पुरावे द्यायला पाटणकर का घाबरतात, असा सवालही शंभूराज देसाई यांनी केला.