सोलापूर शहर व परिसरात सोमवारी सकाळपासून दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केल्याने वरूणराजाच्या पुनरागमनाची चिन्हे दिसत होती. परंतु प्रत्यक्षात वरूणराजाने चांगलीच हुलकावणी दिल्याने सर्वाचा भ्रमनिरास झाला. गेल्या आठवडय़ापासून पाऊस गायब झाल्याने दुष्काळग्रस्त ग्रामीण भागात चिंता व्यक्त होत आहे. केवळ माढा व माळशिरस या दोन तालुक्यातच पावसाने सरासरी ओलांडली असून उर्वरित भागात पावसाची अपेक्षित साथ दिसून येत नाही.
जून महिन्यात जिल्ह्य़ात १०५.२९ मिलिमीटर इतका सर्वसाधारण सरासरी पाऊस पडणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा कमी म्हणजे केवळ ८४.२७ मिमी इतकाच सरासरी पाऊस होऊ शकला. केवळ माढा व माळशिरस या दोन तालुक्यातच पावसाने सरासरी ओलांडल्याचे दिसून येते. माढा तालुक्यात जून महिन्यात पावसाची सरासरी ९९.६९ मिमी असताना त्याहून जास्त म्हणजे १५३.४४ मिमी इतका पाऊस झाला. तर, माळशिरस तालुक्यातील जून महिन्यात ८८.४९ मिमी इतका सरासरी पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १०७.८६ मिमी पाऊस झाला. पावसाने माढा व माळशिरस या दोन तालुक्यातच साथ दिली. उर्वरित सर्व नऊ तालुक्यांमध्ये पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरण दिसून येते.
जून महिन्यात जिल्ह्य़ात अन्य तालुक्यांमध्ये पडलेला मिमीमध्ये पाऊस असा: उत्तर सोलापूर-८७.६०, दक्षिण सोलपूर-७३.७८, बार्शी-४९.६२, अक्कलकोट-८८.४०, पंढरपूर-७७.५६, मंगळवेढा-५४.४३, सांगोला-६१.९३, मोहोळ-९०.८७ व करमाळा-८१.४५. यात बार्शी, मंगळवेढा, सांगोला या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने याठिकाणी शेतकरीवर्गातून चिंतेचा सूर ऐकायला मिळतो. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली असून केवळ आकाशात ढगांची गर्दी होऊन पाऊस पडण्याच्या आशा पल्लवित होतात. प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने दुष्काळी भागात काळजीचे वातावरण दिसून येते. यापूर्वी रोहिणी नक्षत्राच्या पावसाने साथ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साही वातावरणात खरीप पिकांच्या पेरण्यांची तयारी केली. काही भागात पावसामुळे जमीन ओलसर असल्याने पेरण्यांना वेग आला होता. तूर, सूर्यफूल, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांची लागवड करण्यात आली. परंतु नंतर पावसाने चांगलीच ओढ दिल्याने पेरण्या वाया जाणार की काय, या काळजीत शेतकरी दिसतो.