बॉलीवूडमध्ये ‘प्रोफेशनॅलिझम’ जपण्याची आणि ‘पर्फेक्शनिस्ट’ होण्याची चढाओढ सतत चालू असते. या ‘पर्फेक्शनिस्ट’साठी हे कलाकार कोणत्या थराला जातील, काहीच सांगता येत नाही. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे ‘नौटंकी साला’ या चित्रपटातील ‘दिल की तो लग गयी’ हे गीत! या गाण्याचे चित्रीकरण ‘बार’मध्ये बसून दारू पिणाऱ्या नायिकेवर झाले आहे. त्यामुळे गाण्यामध्ये आवाजात योग्य ती ‘मादकता’ आणण्यासाठी संगीत दिग्दर्शक माइकी याने गायिका सबा आझादला ध्वनिमुद्रणाच्या आधी दारू पाजली. या दोघांच्या मते या मद्यपानामुळे गाण्यासाठी हवा तसा परिणाम साधता आला आहे.
‘दिल की तो लग गयी’ हे गाणे चित्रपटातील नायिकेवर चित्रित झाले आहे. विशेष म्हणजे ही नायिका बारमध्ये बसून मद्याचा आस्वाद घेत हे गाणे गात असते, असा प्रसंग आहे. संगीत दिग्दर्शक माइकी याला सबाकडून नेमका हाच परिणाम साधायचा होता. गाण्याचे ध्वनिमुद्रण झाल्यानंतर हा परिणाम खूपच चांगल्या प्रकारे साधला गेल्याचे लक्षात आले. या गाण्यात सबाचा आवाज अत्यंत मखमली भासल्याचे कौतुक सगळ्यांनीच केले. थोडी चौकशी केल्यानंतर मग या मखमली आवाजामागचे गुपित उघड झाले.
माइकीने सबाला ध्वनिमुद्रणाच्या आधी थोडी दारू पिण्याचा सल्ला दिला होता. थोडीशी दारू प्यायल्यानंतर सबाच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, असा माइकीचा अंदाज होता आणि तो खराही ठरला. सबाने हे गीत अत्यंत मादक आवाजात योग्य त्या परिणामांसह गायले. आता सबाच्या या नव्या प्रयोगाचा कित्ता किती गायिका गिरवतात, हे पाहायला हवे. सबाच्या या प्रयोगाला ‘पर्फेक्शन’साठीचा प्रयत्न म्हणणे खूपच गमतीशीर आहे.
कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केल्याशिवाय केवळ आपल्या आवाजातून योग्य तो परिणाम साधणाऱ्या लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त यांच्यासारख्या गायिकांकडून सबाने धडे घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय गाण्यात एका ओळीच्या नंतर गायिकेच्या तोंडी केवळ एक उचकी टाकून योग्य परिणाम देणाऱ्या सी. रामचंद्र यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकाचे उदाहरण माइकीनेही डोळ्यासमोर ठेवायला हवे.