नवी मुंबईत गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या जलधारांनी शहराचा वेग संथ केला. दोन दिवसांपासून पावसाचा जोर असल्यामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले.
पावसाच्या माऱ्याने लोकलचाही वेग मंदावल्याने चाकरमान्यांना नेहमीप्रमाणेच कोसळधारेचा फटका बसला. ट्रान्स हार्बर म्हणजेच ठाणे-वाशी लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. नवी मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाचे पर्जन्यमान शुक्रवारी सकाळी बेलापूर १७८, नेरुळ १४८, वाशी १०५, ऐरोली १३१ मिलीमीटर नोंदवले गेले. शहरात दिवसभराच्या पावसामुळे ठाणे- बेलापूर मार्गाच्या सखल भागात पाणी साचले. ऐरोली, दिघा, घणसोली, कोपरखरणे, वाशी, तुभ्रे येथील गावठणातील सखल भागात पाणी साचले होते. ११ ठिकाणी झाडे व झांडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. बोनकोडे, कोपरखरणे, वाशी येथे गटारांचे योग्य नियोजन न केल्यामुळे पाणी साठण्याची घटना घडली. महानगरपालिकेने केलेला १०० टक्के नालेसफाई दावा सपशेल फोल ठरला. नालेसफाई पुरेशी न झाल्यामुळे, पाण्याचा निचरा न झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले. ऐरोली, रबाले, वाशी, सानपाडा या ठिकाणच्या भुयारी मार्गात पाणी साचले होते. भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या.
पावसामुळे ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्था सुस्थितित ठेवण्याचा प्रयत्न केला. वाशी येथील सेंटर वन मॉलसमोर रस्त्यावर तसेच सव्‍‌र्हिस रोडवरदेखील पाणी साचले होते. रॉयन इंटरनॅशनल स्कूलपाशी पाणी साचले होते. पण तेथे पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात आला. दिवसभर सुरू असणाऱ्या पावसामुळे विद्यार्थ्यांनीदेखील शाळेला दांडी मारली.
कोपरखरणे, वाशी येथील होल्डिग पाँड पाण्याने भरले होते. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबईतील कोपरखरणे, वाशी, नेरुळ, बेलापूर या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

शाळेला बुट्टी
पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने शाळांना एक दिवसाची बुट्टी घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे नवी मुंबईतील बहुतांश शाळांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. तर मुंबई विद्यापीठाने शुक्रवारी होणाऱ्या सर्व प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. ऐरोली, वाशी, घणसोली परिसरात पाणी तुंबू लागल्याच्या बातम्या येऊ लागताच ज्या शाळा सकाळी सात-साडेसातच्या सुमारास भरल्या होत्या त्यांनी मुलांना घरी परत पाठविण्यास सुरुवात केली. तर दुपारच्या सत्रातील मुलांच्या पालकांना सेलफोनवर मेसेज पाठवून शाळा बंद असल्याचा निरोप शाळांनी पाठविला. तर काहींनी दूरध्वनीवरून मुलांच्या पालकांना सूचना दिल्याने मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा बंद राहिल्या. मुंबई विद्यापीठाच्या काही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. काही महाविद्यालयांमध्ये सकाळच्या सत्राला येणाऱ्या मुलांना लोकल सेवा बंद असल्याने काही काळ तेथेच मुक्काम ठोकावा लागला.

न्यायालयालाही सुट्टी
एरव्ही कितीही पाऊस पडला आणि वकीलवर्ग पावसामुळे सुनावणीला हजर राहू शकला नाही तरी न्यायालयांचे कामकाज सुरू असते. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा आणि त्यामुळे सर्व सेवा ठप्प पडल्याचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावरही झाला. कमर्चारीवर्ग न्यायालयात पोहोचलाच नसल्याने चार न्यायमूर्तीच्या शपथविधीचा कार्यक्रम सकाळी पार पडल्यानंतर न्यायालय प्रशासनाने उच्च तसेच कनिष्ठ न्यायालयांना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे कसेबसे न्यायालय गाठलेल्या वकिलांनी पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.