सलग १६ दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही आधी सांगितल्यानुसार पाणीपुरवठा न झाल्यामुळे संपूर्ण रात्र पाण्याच्या प्रतीक्षेत जागून काढणाऱ्या शहरातील महिलांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मंगळवारी रौद्रावतार धारण करत जलकुंभावर हंडा मोर्चा काढून पाणीपुरवठा कक्षातील दूरध्वनी तोडून टाकला. या वेळी हंडे आदळून व घोषणाबाजी करत त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला.
मनमाड शहरातील पाणीटंचाई कमालीची तीव्र झाली असून उन्हाळ्यापाठोपाठ पावसाळ्यातही हे संकट कायम होते. हिवाळ्यातही या परिस्थितीत बदल झालेला नाही. १५ ते २० दिवसांनंतर एकदाच होणारा पाणीपुरवठा निश्चित केलेल्या वेळी होत नाही. यामुळे नागरिक संतप्त होऊन दररोज मोर्चा काढतात. मंगळवारी पुन्हा तसाच प्रकार घडला. सोमवारी रात्री कोर्ट रोड, राजवाडा भागात पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या भागातील महिलांनी रात्र अक्षरश: जागून काढली. संपूर्ण रात्र वाट बघूनही पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे संतापलेल्या महिला व नागरिकांनी रिकामे हंडे घेऊन थेट शिवाजी चौकातील जलकुंभावर धाव घेतली. येथील कक्षातील दूरध्वनी संच हंडय़ाने तोडून टाकला.
उपरोक्त भागात सोमवारी रात्री १० नंतर पाणीपुरवठा होईल, असे आधी सांगण्यात आले. बरीच प्रतीक्षा करूनही पाणी न आल्याने अनेकांनी शिवाजी चौक जलकुंभावरील दूरध्वनीवर संपर्क साधला, परंतु पाणी कधी येईल याचे उत्तर मिळाले नाही, अनेकांचे दूरध्वनीही उचलण्यात आले नाहीत, अशी तक्रार या वेळी करण्यात आली. तब्बल १६ दिवसांनंतरही पाणीपुरवठा न झाल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी रिकामे हंडे घेऊन जलकुंभावर धाव घेतली. त्या वेळी योग्य माहिती देण्यास कोणीही सक्षम अधिकारी वा कर्मचारी नसल्याने त्यांचा संताप अधिक वाढला.
पाणी येत नसल्याने घरात खडखडाट झाला असून दैनंदिन वापराला कोठून पाणी आणणार, असा सवाल त्यांनी केला. पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा याबाबत योग्य ती उत्तरे देत नाही, माहिती दिली जात नाही. या वेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिका कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी रात्री दहानंतर पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.