राष्ष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर गावात एमबीए व एमसीएच्या विद्यार्थ्यांनी ‘व्यवस्थापनातून ग्रामविकास’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात ग्रामस्थांचाही सहभाग उल्लेखनीय आहे.
शहरात राहून व्यवस्थापनाचे धडे गिरविणाऱ्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात ग्रामीण भागात जाऊन तेथील विकासाचे व्यवस्थापन अभ्यासावे म्हणून भारती विद्यापीठ संचलित अभिजित कदम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्स व ड्रीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे बुधवारी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय शिबिरास प्रारंभ झाला. माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. ही अभिनव संकल्पना गावकऱ्यांनी उचलून धरली व शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. सकाळी गावस्वच्छता, नंतर पाणी बचत, मुलींचे हितरक्षण व शौचालयाचा वापर तथा सार्वजनिक स्वच्छता या विषयावर जनजागृती फेरी काढण्यात आली. या उपक्रमात गावच्या सरपंच विजया देवकते यांच्यासह माजी सरपंच सुभाष देवकते, अशोक देवकते, हणमंत विराजदार, कृष्णप्पा बिराजदार, मुख्याध्यापक जमादार यांचा प्रामुख्याने सहभाग होता. एमबीएच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन कुटुंबींची माहिती नोंदविली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवकांशी गावच्या विकास प्रश्नांसंदर्भात संवाद साधण्यात आला. या विकास प्रश्नांवर व्यवस्थापन तंत्र वापरून विकास कसा साधता येईल, याबाबत मुक्त चर्चा करण्यात आली. यात जलसंधारण, शेती विकास, युवा जागृती, महिला ब बालविकास, व्यसनमुक्ती,अंधश्रध्दा निर्मूलन, स्वयंरोजगार, संगणक साक्षरता आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. काशीनाथ भतगुणकी यांनी स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रश्नावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. हॅपी थॉट्सचे सुहास सोनी यांनी योगासन व तणावमुक्त जीवन यावर मार्गदर्शन केले. पाणीपुरवठा योजनेवर परमेश्वर राऊत यांनी संवाद साधला. गावकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. हास्य कलाकार अशोक सुरतगावकर यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.व्ही. एन. मरे, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल जाधव, स्मिता व्हनकोडे, सतीश माने, स्वप्नील नाईक, विजय वाघमोडे हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.