अंगणवाडी कर्मचा-यांचा संप तूर्त स्थगित करण्यात आला आहे. संप मिटविण्यात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काहीही संबंध नाही, पण ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब त्यांना शोभणारी नाही अशी टीका अंगणवाडी सेविका व मदतनीस कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
कृती समितीचे नेते राजेंद्र बावके, निशा शिवूरकर, नंदा पाचपुते व जीवन सुरुडे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून वाकचौरे हे थापा मारत आहेत. त्याला बळी पडू नये, राजकारणात मतपेटी म्हणून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा वापर होऊ नये म्हणून कृती समितीच्याच पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यातील दोन लाख सात हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस दि. ६ जानेवारीपासून संपावर गेले होते. अंगणवाडी कृती समितीने संप यशस्वी करण्यासाठी मोर्चे, जेल भरो, रास्ता रोको करून सरकारवर दबाव आणला. एकजुटीमुळे यश मिळाले. संपातील सेवासमाप्तीनंतर लाभ, आजारपणाची रजा, उन्हाळय़ाची सुटी, प्रकल्पाचे खासगीकरण न करण्याच निर्णय सरकारने घेतला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एक हजार रुपये व मदतनिसांच्या मानधनात पाचशे रुपये वाढ करण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. पण मानधनवाढीचा निर्णय १५ दिवसांत घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे तूर्तास संप स्थगित करण्यात आला. आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मिळेल ते पदरात घेऊन पुढील संघर्षांचा निर्णय कृती समिती घेणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अंगणवाडी केंद्र बंद ठेवून मासिक अहवाल न देता दोन महिने संप चालविण्यात आला. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. खासदार वाकचौरे कुठल्याही आंदोलनात सहभागी झाले नाहीत. ते स्वत:ला अंगणवाडी कर्मचा-यांचे स्वयंघोषित नेते समजतात, त्यांना प्रश्नांचे काही देणेघेणे नाही, निवडणूक व स्वत:चे वाढदिवस साजरे करण्यासाठी ते कर्मचा-यांच्या प्रश्नांचा ऊहापोह करतात. अंगणवाडी कर्मचा-यांना १० हजार रुपये वेतन होणार असे बिनबुडाचे वृत्त त्यांनी यापूर्वी दिले होते. त्यांच्या थापांना कुणी बळी पडू नये, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. पत्रकावर शरद संसारे, जीवन सुरुडे, मदिना शेख आदींच्या सह्या आहेत.