नैसर्गिक प्रवाहांच्या गळचेपीमुळे २००८ मध्ये शहराला महापुराचा जोरदार तडाखा बसल्याचे सर्वज्ञात असताना व पावसाळ्यात वेळोवेळी घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडत असतानाही नाले बुजविण्याचे प्रकार अद्याप थांबले नसल्याचे पुढे आले आहे. सिंहस्थाच्या नावाखाली सध्या चाललेल्या कामांतर्गत बारदान फाटा ते त्र्यंबक रस्ता या रस्त्याच्या विस्तारीकरणात पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नालाच निम्मा बुजवला जात आहे. त्यासाठी या नैसर्गिक नाल्याच्या मध्यभागी भिंत उभारून मातीचा भराव टाकला जात आहे. या पध्दतीने नाला निम्मा लुप्त झाल्यास पावसाळ्यात त्यातील पाणी रस्त्यावर उसळी घेणार हे सांगण्यासाठी कोणी तज्ज्ञाची गरज नाही.
शहर वेगाने विस्तारत असताना या प्रक्रियेत नैसर्गिक नाले व ओहोळ एका मागोमाग एक लुप्त होत असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. सिमेंट क्रॉक्रिटचे जंगल फोफावत असुन त्यात नैसर्गिक घटकांची जपवणूक करण्याचे दायित्व लक्षात घेतले गेले नाही. अतिक्रमणामुळे गोदावरीच्या पात्राची पाणी वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा संकोच याची परिणती २००८ मध्ये महापुराची तीव्रता वाढण्यात झाली. नदीचे पात्र संकुचित होत असताना शहरातही तेव्हा वेगळी स्थिती नव्हती. पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ, नाले बुजविण्याची किमया आधी झाली असल्याने कधी नव्हे ते रस्त्या-रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहिल्याचा अनुभव नाशिककरांना घ्यावा लागला होता. इतके सारे घडूनही आजही नाले बुजविण्याचे उद्योग थांबले नसल्याचे अधोरेखीत होत आहे. गंभीर बाब म्हणजे, ही किमया एखाद्या बांधकाम व्यावसायिकाप्रमाणे खुद्द महापालिका सिंहस्थाच्या नावाखाली करत आहे. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यातील एक म्हणजे बारदान फाटा ते त्र्यंबक रस्ता या बाह्य वळण रस्त्याचे विस्तारीकरण. त्यात एका ठिकाणी नाल्यात भिंत उभारत माती टाकून जागा तयार केली जात आहे.
फाशीच्या डोंगरावरून गोदावरी नदीकडे जाणारा हा नाला आहे. गंगापूर रस्त्यावरून बारदान फाटय़ाकडे वळाल्यानंतर लगेच डाव्या बाजुला समोरून येणारा विस्तीर्ण नाला दृष्टीपथास पडत होता. तो आता निम्मा बुजविला जात आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुला शेती आणि काही फार्म हाऊस आहेत. नागरी वस्ती विरळ असल्याने खुलेआमपणे हे काम सुरू असल्याचे दृष्टीपथास पडते. या संदर्भात प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नैसर्गिक नाला बुजविण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार केली. हा नाला बुजविण्यात येऊ नये म्हणून प्रशासनाला पत्र दिले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून हे काम पुढे रेटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्ता विस्तारीकरणासाठी आसपासचे शेतकरी जागा देण्यास तयार आहेत. त्यांच्याशी पालिका प्रशासनाने चर्चा केली नाही. फाशीच्या डोंगराच्या खाली पाझर तलाव आहे. त्यातून मार्गस्थ होणारा हा जिवंत नाला असल्याचे त्यांनी सांगितले. पलीकडील जागेचा विचार न करता नाला बुजविण्यास भविष्यात वेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नैसर्गिक नाल्यासाठी जागा सोडली असल्याचे नमूद केले. ३० मीटरचा हा रस्ता सध्या कुठे सहा ते कुठे १३ मीटर आहे. सिंहस्थासाठी तो सरसकट १३ मीटपर्यंत रुंद केला जात आहे. पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची जागा सोडण्यात आली आहे. जी जागा पालिकेच्या ताब्यात होती त्यावर काम सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.