महापालिकेने आयोजित केलेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या फेरविचाराचा प्रस्ताव काँग्रेससह सर्व विरोधकांनी मंगळवारी स्थायी समितीमध्ये बहुमताने मंजूर केला. त्यामुळे स्थायी समितीमध्ये सुरू झालेल्या कुस्तीत सत्ताधारी राष्ट्रवादीचा सपशेल पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौर चषक कुस्ती स्पर्धा गेल्या महिन्यात पार पडली असली, तरीही या स्पर्धेच्या खर्चाला मंजुरी देणारा जो ठराव स्थायी समितीत मंजूर केला होता, त्या ठरावाला फेरविचार प्रस्ताव देण्यात आला आहे. मनसेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव दिला होता. स्थायी समिती बैठकीच्या विषयपत्रिकेवर मंगळवारी हा प्रस्ताव आला. त्यावरून राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष अशी विभागणी झाली. सुमारे दीड तास या विषयावर जोरदार वादंग झाले. मात्र, काँग्रेससह मनसे, भाजप आणि शिवसेना या चारही पक्षांनी कोणत्याही परिस्थितीत या खर्चाला मंजुरी देणार नाही, अशी भूमिका घेतली.
सत्ताधाऱ्यांनी हा फेरविचार प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी स्थायी समितीत प्रयत्न केले. मात्र, विरोधकांनी मतदान घेण्याचाच आग्रह धरला. अखेर फेरविचार प्रस्तावावर मतदान घेण्यात आले आणि फेरविचार प्रस्ताव दहा विरुद्ध सहा अशा बहुमतांनी मंजूर झाला. प्रस्तावाच्या बाजूने काँग्रेस, मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या दहा सदस्यांनी केले, तर विरोधात राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी मतदान केले.
फेरविचार प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे कुस्ती स्पर्धेवर झालेल्या खर्चाबाबत आता नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्पर्धेची सर्व बिले देऊन झाली असून त्याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. स्पर्धेचा ठराव ज्या दिवशी मंजूर झाला, त्याच दिवशी फेरविचाराचाही प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने फेरविचाराची योग्य ती दखल घेऊन बिले देण्याची घाई करायला नको होती, असे विरोधकांचे म्हणणे आहे. याबाबत मंगळवारी आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, की फेरविचार आजच मंजूर झाला आहे. त्याबाबत आता पुन्हा तपासणी करून वस्तुस्थिती तपासून पाहावी लागेल.