गेल्या चार महिन्यांपासून प्राधान्य गटातील लाभार्थीना शासकीय दरानुसार धान्य वितरित होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. रेशनचा काळाबाजार त्वरित थांबवावा, अशी मागणी करून तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी दिला.
प्राधान्य गटातील हजारो नागरिकांचे उत्पन्न २० हजारांपेक्षा कमी असूनही त्यांना स्वस्त धान्य दुकानातील योजनांचा लाभ मिळत नाही. मग शिधापत्रिकेचा उपयोग काय, असा संतप्त सवाल उपस्थित करून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रॉकेलचा कोटा पूर्ववत करा, दारिद्रय़ रेषेखालील नागरिकांना धान्य द्या, बीपीएलचे सर्वेक्षण करा, काळाबाजारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा इत्यादी मागण्या केल्या.
शासनाच्या विरोधात आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. माजी आमदार दीनानाथ पडोळे, डॉ. प्रशांत बनकर, पिंकी वर्मा, विशाल खांडेकर, शैलेंद्र तिवारी, ईश्वर बाळबुधे, राजेश माकडे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो लाभार्थी शिधापत्रिका घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
दिले.
आंदोलनात सिंधू मानवटकर, आनंदी बावनकर, राहुल कामडे, ढेलुराम सिलोटिया, रबिया शाह, प्रमिला यादव, सोमा ठाकरे, माहेश्वरी जोशी, जया वराडकर, उर्वशी गिरडकर, भोजराज बोंदरे, राहुल मिरासे, दिनकर वानखेडे, वर्षां श्यामकुळे, रज्जाक पटेल, सुनील मेश्राम, धीरज क्षीरसागर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.