देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने या बाजार समितीवर देवळ्याचे सहाय्यक निबंधक ए. एल. आव्हाड यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. सोमवारी सकाळी आव्हाड यांनी देवळा बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. प्रशासक नियुक्तीनंतर सहा महिन्यात निवडणूक घ्यावी, अशी तरतूद आहे. त्यामुळे या निमित्ताने निवडणुकीचा मार्गही मोकळा होणार असल्याने मोर्चेबांधणीचे काम सुरू होणार आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र कृषी उत्पन्न झाली आहे. बाजार समितीला त्या अधिनियम-नियमान्वये कामकाज करणे बंधनकारक आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २० ऑगस्ट २०१३ रोजी संपली आहे. बाजार समितीने संचालक मंडळास मुदतवाढ मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याच मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे अधिनियम १९६३ चे कलम १५ अ (१) च्या तरतुदीनुसार जिल्हा उप निबंधक सुनील बनसोडे यांनी देवळ्याचे सहाय्यक निबंधक अे. एल. आव्हाड यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. त्यानुसार सकाळी १० वाजता आव्हाड यांनी बाजार समितीच्या प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला असल्याची माहिती सचिव दौलतराव शिंदे यांनी दिली. दरम्यान, प्रशासन नेमणुकीनंतर पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत निवडणूक घेण्यात यावी, असी तरतूद आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी आगामी काळात तालुकावासियांना पहावयास मिळणार आहे.