News Flash

विसर्जन मिरवणुकींमध्ये ध्वनिप्रदूषण शिगेला

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम तलावासारख्या संकल्पना राबवणाऱ्या ठाणे शहरात विसर्जन मिरवणुकींदरम्यान मात्र ध्वनिप्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याचे दिसून आले आहे.

| September 20, 2013 06:53 am

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम तलावासारख्या संकल्पना राबवणाऱ्या ठाणे शहरात विसर्जन मिरवणुकींदरम्यान मात्र ध्वनिप्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याचे दिसून आले आहे. अनंत चतुदर्शीनिमित्ताने निघालेल्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने दुपटीने वाढलेल्या ध्वनिप्रदूषणातून हे स्पष्ट झाले आहे. दहीहंडी उत्सवाप्रमाणेच गणेशोत्सवामध्येही ढोल-ताशांचा ढणढणाट, डॉल्बी, डीजे, बेंजोच्या कर्णकर्कश आवाजाने संपूर्ण शहरात बेलगाम धिंगाणा सुरू होता.
ठाणे शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा अभ्यास ठाण्यातील स्वयंसेवी संस्थेने अनंत चतुदर्शीच्या सकाळी साडेनऊ ते रात्री ११ वाजेपर्यंत केला. रस्त्यांवर डीजेवर वाजणारे लुंगी डान्स, बत्तमीझ दिल, पिंकी, मुन्नी, कॅरेक्टर ढिला है अशा हिंदी गाण्यांचा धिंगाणा सुरू होता. शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय आणि सरकारी कार्यालय परिसर अशा शांतता क्षेत्रांतही आवाजाची मर्यादा पाळली जात नव्हती. पोलीस यंत्रणांनी जणू या मंडळांना नियम धाब्यावर बसवण्याचा परवानाच दिल्याच्या आविर्भावात ही मंडळे वागत होती. शांतता क्षेत्रात झालेल्या आवाजाच्या नोंदणीवरून आवाजाची पातळी सुमारे दीड ते दुपटीने वाढली होती.
राम मारुती रोड, गजानन महाराज चौक, समर्थ भंडार, तलावपाळी, सेंट जॉन हायस्कूल, सिव्हिल हॉस्पिटल, चिटणीस हॉस्पिटल, गोखले रोड, हॉरिझोन हॉस्पिटल, गोडबोले हॉस्पिटल, पोलीस कमिशनर ऑफिस, कळवा गणेश घाट आणि ठाणे पूर्वेतील विसर्जन घाटांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वात जास्त ध्वनिप्रदूषण हे तलावपाळी, सेंट जॉन हायस्कूल, कळवा येथील गणेश घाटावर होते. या भागांत ९० ते ९५ डेसिबल्स आवाजाची पातळी नोंदविण्यात आली आहे. त्याखालोखाल ८५ ते ९० डेसिबल्सची नोंदणी गजानन महाराज चौक, सिव्हिल हॉस्पिटल, चिटणीस हॉस्पिटल, गोखले रोड, हॉरिझोन हॉस्पिटल आणि ठाणे पश्चिमेतील विसर्जन घाटावर होती. ८० डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजाची नोंद समर्थ भंडार, गोडबोले हॉस्पिटल, पोलीस मुख्यालयाच्या परिसरात झाली.
कारवाई नाही..
ध्वनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करीत ध्वनिप्रदूषण करणारे साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र असे नियम तोडले जात असतानाही पोलिसांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 6:53 am

Web Title: noise pollution in ganesh visarjan
टॅग : Ganesh Visarjan,Thane
Next Stories
1 ‘पाणी स्वस्त मिळते म्हणून नासाडी करू नका’
2 जाहिरात फलकांनी कल्याण-डोंबिवली शहरांचे विद्रूपीकरण
3 कचराळी तलावात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा!
Just Now!
X