एकामागून एक अशा बैठकांचे सत्र सुरूच राहण्याच्या प्रकाराने िपपरी महापालिकेचे बडे अधिकारी चांगलेच वैतागले आहेत. मंगळवारी एकाच दिवशी झालेल्या सलग बैठकांमुळे दिवसभर अडकून पडलेल्या अधिकाऱ्यांना अन्य कोणतेही काम करता आले नाही. मात्र हे दुखणे सांगायचे तरी कसे, अशी अडचण असल्याने सर्वानीच मौन धरले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केलेल्या सातकलमी योजनेचा आढावा घेण्यासाठी सकाळी अकरा वाजता बैठक होती, ती दुपारी एक वाजेपर्यंत चालली. त्यानंतर, स्थायी समितीची साप्ताहिक बैठक होती, ती साडेपाच पर्यंत सुरू होती. त्यामुळे प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीसाठी थांबावे लागले. ती संपल्यानंतर आयुक्तांनी लागूनच आढावा बैठक घेतली, ती रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होती. दिवसभराच्या बैठकांमुळे अधिकारी अवघडून गेले होते. यापूर्वी, अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर आयुक्तांनी अशीच पाच तास चाललेली बैठक घेतली होती. आयुक्तांची बैठक घेण्यामागची भूमिका चांगली आहे, त्यामुळे कामांना वेग येतो, असे मान्य करतानाच प्रदीर्घ वेळ चालणाऱ्या बैठकांमुळे अन्य कामांचा खोळंबा होतो. ज्या अधिकाऱ्यांचे काही काम नसते, ते देखील बैठकांमध्ये तासन्तास बसून असतात. त्यामुळे नागरिक व लोकप्रतिनिधींची गैरसोय होते, असा युक्तिवाद अधिकाऱ्यांकडून केला जातो. मात्र, आयुक्तांना हे सांगायचे कोणी व कसे, या धास्तीने सर्वानीच ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवले आहे.