दिवाळी सर्वत्र आनंद आणि उत्साहाने साजरी होत असताना राजगडही अंधारात राहता कामा नये, या विचारातून पुण्यातील ‘क्षितिज क्रिएशन्स’ या संस्थेच्या दुर्गप्रेमी युवकांनी राजगडावर ऐन दिवाळीत दीपोत्सव साजरा केला. या उपक्रमात राजगड हजारो दीपांनी उजळून निघाला.
क्षितिज क्रिएशन्स या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत दुर्गसंवर्धन तसेच दुर्गविषयक अन्य उपक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांचे यंदा आठवे वर्ष होते. शिवकाळातील आठवणींना उजाळा देण्याबरोबरच आपल्या ऐतिहासिक ठेव्याविषयी युवकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न व्हावी या हेतूने या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा दिवाळीत राजगडाची स्वच्छता, गडावर दीपोत्सव, गडपूजन असा उपक्रम करण्यात आला. गौतम मोरे, रवी तांबारे, नरेंद्र डोईफोडे, श्रीकांत कदम, बसवराज करशेट्टी, माउली सूर्यवंशी आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.
राजगडावरील सदर तसेच सर्व दरवाजे, बालेकिल्ला, पद्मावतीदेवीचे मंदिर, रामेश्वर मंदिर यासह सर्व वास्तूंची स्वच्छता क्षितिज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रारंभी केली. त्यानंतर गडावर पद्मावती माची आणि बालेकिल्ला यांच्या मध्यभागी रांगोळ्यांचे गालिचे घालण्यात आले आणि शेकडो दिवे लावून गडावर दीपोत्सव करण्यात आला. गडावर आलेले इतर दुर्गप्रेमीही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या वेळी गडावरील महत्त्वाच्या ठिकाणी पुष्पहारही अर्पण करण्यात आले. महेश वाघमारे, कृष्णा मदिरे, दिनेश राऊत, नीलेश परदेशी, श्रीकांत जगताप यांनी विविध उपक्रम पार पाडले. दुर्गप्रेमींसाठी राजगडाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. त्याच जाणिवेतून हा उपक्रम राबवल्याचे गौतम मोरे यांनी सांगितले.