महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या (मंगळवार) जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात इतरत्र त्यांनी जाहीर सभांमधून राजकीय धडाका उडवून दिला असताना तब्बल दोन दिवसांचा दौरा असला तरी नगरकर मात्र सभेला मुकले आहेत. सभेशिवायच ते शहरात पक्षबांधणीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करणार आहेत.
राज ठाकरे उद्या बीडहून दुपारी भगवानगडावरून (पाथर्डी) जिल्ह्य़ात प्रवेश करणार आहेत. दुपारी २ वाजता ते भगवानगडावर येणार असून ४ वाजता ते नगरला येतील. उद्याचा मुक्काम व परवा सायंकाळपर्यंत त्यांचे शहरात वास्तव्य आहे. जवळ, जवळ दोन दिवस थांबूनही त्यांची शहरात सभा मात्र होणार नाही. परवा (बुधवार) येथूनच ते औरंगाबादला रवाना होतील. नगर शहराची विधानसभेची निवडणूक मनसेने लढवली होती. त्यावेळी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे नगरला आले होते. त्यानंतर ते प्रथमच शहरात येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांची नगरला सभाही झाली होती. मात्र यावेळी त्यांनी शहरात सभेला फाटा दिला आहे. राज्यात अन्यत्र त्यांनी जाहीर सभेद्वारेच राजकीय राळ उडवून दिली असताना नगरला मात्र ते केवळ कायकर्ते, पदाधिकारी, प्रतिष्ठीतांशी चर्चा करतील. कोल्हापूर, सोलापूर, लातूर येथील त्यांच्या जाहीर सभांच्या पाश्र्वभुमीवर नगरकरांना त्यांच्या जाहीर सभेची अपेक्षा होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत जेथे राज ठाकरे यांच्या सभा झाल्या तेथे या दौऱ्यात जाहीर सभा होणार नसल्याचे पक्षाचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी सांगितले. त्यामुळेच नगर येथे सभेशिवाय गाठी-भेटी, चर्चेद्वारे ते नगरकरांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत असे डफळ म्हणाले.
दरम्यान राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात शहरातील कोणाचे मनसेत प्रवेश होतात काय याबाबत राजकीय वर्तुळाच उत्सुकता आहे. एका राष्ट्रीय पक्षातील एक मोठा गट प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून आहे. त्यादृष्टीनेही या दौऱ्याकडे नगरकरांचे लक्ष होते,  मात्र या गटानेही याही वेळी ‘वेट अ‍ॅन्ड वाच’चाच पवित्रा घेतला आहे. दरम्यान या वर्षांअखेरीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राज ठाकरे यांच्या उद्याच्या दौऱ्यात महत्वाची चर्चा होईल, असे डफळ यांनी सांगितले. या निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर धोरणात्मक निर्णय येईल असे ते म्हणाले.