उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी गावातील जगदंबा देवीच्या मंदिरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. मंदिरातील सीसी टीव्ही यंत्रणा नादुरुस्त असल्याने चोरटय़ाचा ठावठिकाणा लागू शकला नाही. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कार्यवाही करावी या मागणीसाठी शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढून रोष प्रगट केला.
वणी गावात जगदंबा देवीचे पुरातन मंदिर आहे. भरवस्तीत असणाऱ्या मंदिरात मध्यरात्री चोरीचा हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. दरवाजांचे टाळे तोडून चोरटय़ाने चांदीचा मुकुट काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो काढण्यात त्याला यश आले नाही. या वेळी मणी मंगळसूत्र व कानातील दागिने चोरीला गेल्याची चर्चा आहे. सुरक्षिततेसाठी मंदिरात सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना वारंवार केली गेली असली तरी ही व्यवस्था आजतागायत केली गेली नाही. यापूर्वी मंदिरात चोरीचे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे विश्वस्त मंडळाने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था उभारली होती. परंतु, ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा ही यंत्रणाच नादुरुस्त असल्याचे निष्पन्न झाले. पहाटेच्या सुमारास गावातील महिला दर्शनासाठी आली असता तिच्या हा प्रकार लक्षात आला. या महिलेने तातडीने पुजारी सुधीर दवणेंना त्याची माहिती दिली. त्यानंतर विश्वस्तांशी संपर्क साधून पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. परंतु, श्वान पथक मंदिराबाहेर घुटमळत राहिले. शुक्रवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या ठिकाणी भेट दिली.शुक्रवारी सकाळी याबाबतची माहिती गावात पसरल्यावर ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले. मंदिरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरटय़ांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. याबाबतचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.