बंद घरातून ऐवज चोरीस जाण्याच्या प्रकारांमध्ये अलीकडच्या काही दिवसांत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात हमखास अशा चोऱ्या घडू लागल्या आहेत. अशा प्रकारे झालेल्या तीन चोऱ्यांमध्ये साडेपाच लाखांवर ऐवज चोरटय़ांनी लांबविला. क्रांती चौक, जवाहरनगर व मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांमध्ये या बाबत नोंद करण्यात आली. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ४ लाख ६६ हजार रुपयांचे किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रकमेच्या चोरीची नोंद झाली. फिर्यादी शिवप्रकाश शंकरलाल लाहुटी (वय ६०, नूतन कॉलनी) बुधवारी दुपारी साडेबारा ते संध्याकाळी सहा या दरम्यान डय़ुटीवर गेले होते. त्यांची पत्नी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेली होती. ही संधी साधून चोरटय़ाने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश मिळविला व हा ऐवज लांबविला. जवाहरनगर पोलिसांत विद्याधर प्रभाकर इंगळे (वय ३७, तापडियानगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. मंगळवारी सकाळी सात ते रात्री अकराच्या दरम्यान इंगळे हे घराला कुलूप लावून कंपनीच्या कामानिमित्त पुणे येथे गेले होते. काम संपवून घरी आले असता कोणी तरी चोरटय़ाने घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले. तिसरी घटना मुकुंदवाडी परिसरात घडली. फिर्यादी महेंद्र धर्मशंकर बांडे (वय ३३) यांच्या घरी अंबिकानगर येथून बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास चोरटय़ाने २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा लॅपटॉप व पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला.