भिकारी, बेवारस यांच्या खून सत्रामुळे हादरलेल्या कोल्हापूर पोलिसांनी आता भिकारी मुक्त शहर करण्याचा विडा उचलला आहे. या अंतर्गत तीन भिकाऱ्यांची एक तुकडी शनिवारी पुण्यातील बेगर्स होमकडे रवाना करण्यात आली. शहरातील भिकाऱ्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान पोलीस व जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे.    
शहरामध्ये गेल्या काही दिवसामध्ये खून सत्राची मालिका सुरू झाली आहे. यामध्ये ११ जणांना प्राण गमवावा लागला आहे. हा सीरियल किलरचा प्रकार असल्याची चर्चा आहे. खून झालेल्यांतील बहुतेक सर्व जण भिकारी व बेवारस आहेत. हल्लेखोरांकडून याच लोकांना पुन्हा लक्ष केले जाऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सावध झाली आहे. त्यातूनच भिकाऱ्यांना एकत्रित करून त्यांची रवानगी पुण्याला करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
शनिवारी या कामासाठी शहरातील पोलीस कार्यरत झाले होते. महालक्ष्मी मंदिर, तेथील शनिमंदिर या परिसरात भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले. तर शनिमंदिरासमोर काही कुष्टरोगी भीक मागत होते. त्यांना एकत्रित करून शहरातील शेंडापार्क येथे असलेल्या कुष्ठधाममध्ये पाठविण्यात आले.
    भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. तीन भिकारी आज पुण्यातील बेगर्स होमकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.