शहर परिसरात शासकीय कार्यालये तसेच राजकीय पक्ष, संस्था व संघटना यांच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक ठिकाणी फेरी काढून संविधानाविषयी जनजागृती करण्यात आली. तर काही संस्थांनी व्याख्यान, चर्चासत्र यांचे आयोजन केले होते.
भारिप महासंघातर्फे संविधान प्रतींचे पूजन
भारिप बहुजन महासंघ नाशिक शहराच्या वतीने संविधान गौरव दिनानिमित्त संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिचे पूजन करण्यात आले. जिल्हा महासचिव नंदकिशोर साळवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मीना भालेराव, शहराध्यक्षा सुमन वाघ, सचिव सम्राट पगारे आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष वामन गायकवाड यांनी भारतीय संविधान, त्याचे स्वरूप व व्याप्ती याविषयी माहिती दिली. शहर उपाध्यक्ष नीलेश सोनवणे यांनी आभार मानले.
महावितरणतर्फे संविधान प्रास्तविकेचे वाचन
महावितरण नाशिक शहर मंडल कार्यालयात भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाबरोबरच २६/११ घटनेतील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मंडल अधिक्षक अभियंता रा. धों. चव्हाण यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास चंद्रशेखर हुमने, व्यवस्थापक श्रीकृष्ण राणे, जान्हवी कांगणे, व्ही. जे. मवाडे आदी उपस्थित होते. कनिष्ठ विधी अधिकारी नितल वर्पे व सहाय्यक अभियंत्यांनी भारतीय संविधान दिनाविषयी माहिती दिली. डॉ. बाबासाहेबांनी देशाला आदर्श घटना देऊन तमाम भारतीयांना जगण्याचा खरा अर्थ दिला असेही ते म्हणाले. भारतीय घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. श्रीकृष्ण राणे यांनी सूत्रसंचालन केले.
काँग्रेस समितीत चर्चासत्र
नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड आणि स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष पंडित येलमामे यांच्या उपस्थितीत संविधान दिनानिमित्त चर्चासत्र घेण्यात आले. अ‍ॅड. छाजेड यांनी भारत देशाची घटना, संविधान हे देशातील सर्वाना समान न्याय व हक्क देण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केल्याचे सांगितले. यापुढे प्रत्येक ब्लॉकमध्ये संविधान दिन साजरा करणार असल्याची घोषणा छाजेड यांनी केली. येलमामे यांनी देशात राष्ट्रीय एकात्मता टिकावी यासाठी संविधानाने महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे सांगितले. शहर महिला काँग्रेस अध्यक्षा वत्सला खैरे, ज्येष्ठ पदाधिकारी अ‍ॅड. रामनाथ गुळवे यांनी भारतीय संविधान तसेच मूलभूत हक्कांबाबत माहिती दिली.