हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मुलांची तरुण फळी बॉलीवूडमध्ये एका लाटेसारखी आली. त्यातील एक नाव म्हणजे श्रद्धा कपूर. अभिनेता शक्ती कपूरची मुलगी आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची भाची. चित्रपटसृष्टीतील दोघांची नावे श्रद्धाशी जोडली गेली आहेत. श्रद्धाची आई शिवांगी कपूर ही पद्मिनी कोल्हापुरेची बहीण. वडील कपूर असल्यामुळे पंजाबी घरातील असले तरी मी स्वत:ला मराठी मुलगीच मानते, असं सांगणाऱ्या श्रद्धाची बाप्पावर किती श्रद्धा आहे, तिला स्वत:ला मराठी मुलगी म्हणवून घ्यावंसं का वाटतंय, याविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा.

बाप्पा आणि माझं नातं हे अगदी माझ्या जन्मापासूनचं आहे. मी जन्मल्यापासून आमच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे बाप्पांचे आगमन हे आमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण करणारं असतं. मुळात बाप्पाला आम्ही सगळे खूप मानतो. त्याच्यावर माझी निस्सीम श्रद्धा आहे. आतापर्यंत मी घरच्या गणपतीच्या तयारीत सहभाग घेत आले आहे, असं श्रद्धा कपूर सांगते. ‘आशिकी २’ या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे दुसऱ्याच चित्रपटात श्रद्धा कपूरची गाडी बॉलीवूडमध्ये रुळली आहे. या यशामुळे आनंदित असलेली श्रद्धा यावर्षी बाप्पांच्या आगमनाची सगळी तयारी स्वत: करणार असल्याचे सांगते. गेल्या वर्षी ‘आशिकी २’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मौजमजा करीत मला गणेशोत्सवाची तयारी करता आली नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. दरवर्षी आम्ही स्वत:च गणपतीची आरास करतो, नैवेद्य तयार करतो. लहानपणापासून आम्ही हा उत्सव धुमधडाक्यात साजरा करतो. गणपती घरी आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत आमच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आलेलं असतं. जुहूमध्ये राहत असल्यामुळे विसर्जनाच्या दिवशीही आम्ही जुहू बीचवर जातो. पारंपरिक पद्धतीने फुगडय़ा घालणं, गणपतीची आरती करणं, त्याची मनोभावे पूजा करून मगच आम्ही त्यांना निरोप देतो. यावर्षी विसर्जनासाठी मी जाऊ शकेन की नाही हे सांगणे अवघड आहे. पण गणपतीची तयारी मात्र मी स्वत:च करणार आहे, असे श्रद्धाने सांगितले.
तुला स्वत:ला मराठी मुलगी म्हणवून घ्यावंसं का वाटतं? असं विचारल्यावर ती हसून म्हणाली, ‘मी फक्त नावापुरतीच कपूर आहे. माझी आई मराठी आहे, माझी मावशी, माझे आजोबा आम्ही सगळे एकाच सोसायटीत राहतो. या सोसायटीत मराठी कुटुंबे राहात असल्याने मी लहानपणापासून मराठमोळ्या वातावरणात वाढले. माझ्या आईशी माझं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मी तिच्याकडून अनेक गोष्टी शिकत गेले. त्यामुळेच असेल कदाचित, पण महाराष्ट्रीय संस्कार माझ्यावर लहानपणापासूनच रुजत गेले आहेत, असे श्रद्धा म्हणाली. मला मराठीही बोलता येतं, पण माझं मराठी ऐकल्यानंतर माझे आजोबा मात्र हसू लागतात. त्यांच्या मते मला मराठी बोलता येत असलं तरी ते ऐकणाऱ्याला चांगलं वाटेल असं नाही. पण तरीही मी मराठी बोलते आणि माझ्या व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्रीय मुलीचे जे संस्कार आहेत ते बऱ्याचदा समोरच्यांनाही जाणवतात. माझ्या व्यक्तिमत्त्वातील या मराठीपणामुळेच मला ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘आरोही’च्या भूमिकेसाठी यश मिळवून दिले, असे ती म्हणते.  ‘आशिकी २’साठी दिग्दर्शक मोहित सुरीला मराठी मुलगी हवी होती. मी मराठी असल्यानेच त्याने माझी या भूमिकेसाठी निवड केली. आज मला ‘आरोही’च्या भूमिकेसाठी इतका प्रतिसाद मिळालाय की तो पाहून मी थक्क होते. दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमांसाठी मी नुकतीच पुणे व बारामतीला जाऊन आले. तेथे गेल्यावर लोकांना ‘आरोही’ किती आवडलीय याचं प्रत्यंतर मला आलं. मला लोक ‘आरोही’ याच नावाने हाका मारत होते. याचं शंभर टक्के श्रेय हे माझ्यातील मराठी संस्कारांनाच आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वावरची मराठी छाप मला लोकांशी जोडून गेली. त्यामुळेच ‘आरोही’ त्यांना आपलीशी वाटली, असं श्रद्धाने नमूद केलं. ‘आशिकी २’च्या यशामुळे चांगल्या हिंदी चित्रपटांचे प्रस्ताव आपल्याकडे येत आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या चित्रपटांची अधिकृत घोषणाही लवकरच होईल. चित्रपटांतील चांगली वाटणारी भूमिका निवडण्याचं स्वातंत्र्य मला मिळालंय. त्यामुळे यावर्षी मी खूप खूश आहे. म्हणूनच मी बाप्पांकडे काहीही मागणार नाही. त्याची केवळ मनापासून सेवा करणार आहे. बाप्पांच्या येण्याने मिळणारा आनंद वेगळाच आहे.

मी फक्त नावापुरतीच कपूर आहे. लहानपणापासून मराठमोळ्या वातावरणात वाढलेय