ऑटिस्टिक या मानसिक अवस्थेत जगणाऱ्या मुलाचे संगोपन करताना आलेले अनुभव अशाच प्रकारच्या पालकांपर्यंत पोहोचवावेत, या हेतूने ठाण्यातील एका महिलेने चार महिन्यांपूर्वी फेसबुकवर ‘तो राजहंस एक’ या नावाने एक स्थळ तयार केले असून त्याला  उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
ठाण्यातील मनीषा आणि राजन या सीलम दाम्पत्याचा सोहम हा ऑटिस्टिक मुलगा आता १६ वर्षांचा आहे. इतर अनेकांप्रमाणे सुरुवातीला मुलातील ऑटिझम घालविण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यातून आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय अन्य दुसरा कोणताही मार्ग नाही, हेच त्यांच्या लक्षात आले. सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असणारी ही मुले प्रत्यक्षात अतिशय हुशार असतात. अल्बर्ट आइनस्टाइन, बिल गेटस्, मोझार्ट ही त्यातील काही ठळक उदाहरणे. मात्र संवेदनांवर तसेच हालचालींवर नियंत्रण ठेवता येत नसल्याने ही मुले सतत वेडेवाकडे हातवारे करीत राहतात. एकमेकांना टाळ्या देत राहतात. त्यामुळे घराबाहेर या मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. रस्ता ओलांडताना, बसमध्ये चढताना मदत करावी लागते. यापैकी बऱ्याच मुलांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांच्या खिशात पत्ता आणि नावाचे कार्ड ठेवावेच लागते. पुन्हा प्रत्येक मूल वेगळे असते. प्रत्येकाचा स्वभाव, हालचाली आणि प्रतिक्रिया भिन्न असतात. सोहम सध्या ठाण्यातील लुईसवाडी येथील विग्जस् व्होकेशनल सेंटरमध्ये जातो. बहुतेक ऑटिस्टिक मुले अतिशय हुशार असतात. सोहमही अंकगणितात अतिशय पारंगत आहे.
प्रश्न मोठा, उपाय छोटे
सध्या जन्माला येणाऱ्या दर ६३ मुलांमध्ये एक ऑटिस्टिक अवस्थेतले असते. मात्र एवढय़ा मोठय़ा संख्येने असणाऱ्या या विशेष मुलांसाठी पुरेशा शाळा आणि प्रशिक्षण केंद्रे नाहीत. खाजगी प्रशिक्षण केंद्रे असली तरी त्याचे शुल्क सर्वसामान्यांना परवडत नाही. ऑटिझमविषयी फारशी माहिती नसल्याने सुरुवातीच्या काळात पालकांना खूप मन:स्ताप होतो. ऑटिझम हा आजार समजून तो बरा करण्याचे निष्फळ प्रयत्नही केले जातात. मात्र वेळ आणि पैसे वाया जाण्याव्यतिरिक्त त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. मुलामधील ऑटिझम स्वीकारण्यापेक्षा त्याच्याशी लढण्यात सर्व शक्ती खर्ची घातल्याने पालक हताश आणि निराश होतात. अशी कुटुंबे मग सहसा कुणाच्यात मिसळत नाहीत. मनीषा सीलम म्हणतात, ‘सोहममुळे आम्हीसुद्धा काही काळ या दुष्टचक्रातून गेलो. मात्र अखेर आहे ती परिस्थिती स्वीकारण्यात शहाणपणा आहे, हे समजले. या मुलांना सर्वसामान्य मुलांमध्ये खेळता येत नाही. कारण यांचे हातवारे पाहून ती मुले एक तर घाबरतात अथवा चिडवतात. या मुलांना त्याचे काही वाटण्याचा प्रश्नच नसतो, पण पालकांना विचित्र वाटते आणि मग अशी मुले घरातच डांबून ठेवली जातात.’
संघटनेच्या दिशेने पाऊल
ऑटिस्टिक मूल असणाऱ्या जास्तीत जास्त पालकांशी संपर्क साधावा या हेतूने फेसबुकवर सुरू झालेल्या ‘तो राजहंस एक’ या स्व-मदत गटात अनेक पालकांबरोबरच अशा मुलांसाठी शाळा चालविणारे संचालक, स्पीच थेरेपिस्ट आणि समुपदेशक सहभागी झाले आहेत. त्यामुळे पालकांना या विषयाची इत्थंभूत माहिती मिळू लागली आहे. सध्या सर्वसाधारणपणे अशा मुलांना मेणबत्त्या, भेटकार्डे, पिशव्या, उदबत्त्या आदी पारंपरिक उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्यक्षात ही मुले अतिशय हुशार असतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर होईल, अशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवे, असे मत मनीषा सीलम यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केले. गतिमंद तसेच मतिमंद मुलांप्रमाणेच ऑटिस्टिक मुलांच्या संगोपनाचा प्रश्न अनुत्तरितच आहे. पालक आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. ‘फेसबुक’वरील स्व-मदत गटामुळे त्याला संघटित स्वरूप येऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.