*   कपडय़ांवरून पटली ओळख
यवतमाळ जिल्ह्य़ाच्या घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील अपहृत सपना गोपाल पळसकर (७) हिचे सोमवारी गावालगतच महसूल विभागाच्या पडीत  जमिनीवर शरीराची कवटी, कपडे व काही हाडे सपनाच्याच देविदास पुनाजी आत्राम या मामाला दिसून आली. ही माहिती त्याने तिचे वडील गोपाल पळसकर यांना सांगितली. हे प्रकरण महिला मनसे अध्यक्ष लता चंदेल यांनी उचलून धरले होते. पोलीस आयुक्त बिपीन बिहारी यांच्याकडे याबाबत दाद मागितली तेव्हा त्यांना २० दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यामुळे गोपाल पळसकर यांनी ही माहिती लता चंदेल यांना कळविली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंदेलसिंग बयास यांना कळविली व या घटनेच्या तपासाला वेग आला.
२४ ऑक्टोबर २०१२ या दिवशी ऐन दसऱ्याला सपना बेपत्ता झाली होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला; परंतु ती न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी २५ ऑक्टोबरला घाटंजी पोलीस ठाण्याला तक्रारी देण्यात आली होती. तिने लाल रंगाचा फ्रॉक व पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. विधानसभेतही हा प्रश्न गाजला. सीआयडी चौकशीची मागणीही झाली व तपास एलसीबीकडे देण्यात आला. पोलिसांनी राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश कडे जाऊन तपास केला. शेवटी ७ महिन्यांनंतर काल गावाजवळून ७०० मीटर अंतरावर चोरंबा घाटंजी रस्त्यावरून १५० मीटर अंतरावर झुडुपामध्ये सपनाच्या मामाला कवटी, कपडे हाडे व केस दिसून आले. अतिरिक्त एस.पी. डाखोरे व चंदनसिंह बयास यांनी पाहणी केल्यावर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मिळालेले कपडे, हाडे, केस व माती कपडय़ावरील मातीचे नमुने परीक्षणा करिता पाठविण्यात आले आहे. त्याची डीएनए चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे सपनाचे समोरील दात पडले होते ते या कवटीतही आढळून आले. आता सपनाची आई शारदा पळसकर हिने आरोपीला त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.