‘स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत डोंबिवली’ ही संकल्पना घेऊन डोंबिवली शहरातील वाढते बकालपण रोखण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांची एक बिगर राजकीय चळवळ स्थापन करण्यात येत आहे. या चळवळीत सहभागी होण्यासाठी डोंबिवलीतील सुमारे २०० नागरिकांनी भ्रमणध्वनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळीच्या निमंत्रकांशी बुधवारी संपर्क साधला.
कल्याण, नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथ, भिवंडी परिसरातील नागरिकांनीही या चळवळीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही चळवळ फक्त डोंबिवली शहरापुरती मर्यादित आहे. आपण आपल्या भागात अशीच चळवळ उभारण्याच्या सूचना या  निमंत्रकांकडून देण्यात येत आहेत. डोंबिवली परिसरातील आयरेगाव, नांदिवली, आजदे, एमआयडीसी सुदर्शननगर, मिलापनगर, उमेशनगर, गरीबाचापाडा, ठाकुर्ली, टिळकनगर, रामनगर, आनंदनगर, पेंडसेनगर, आगरकर रोड, गोग्रासवाडी, टाटा लाइन, सुनीलनगर, गांधीनगर, स्टार कॉलनी, भावे सभागृह परिसर, टंडन रोड आदी भागांतील नागरिकांनी चळवळीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिगर राजकीय चळवळीत सहभागी होण्यासाठी विविध वयोगटांतील पुरुष, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रांतील वकील, डॉक्टर, निवृत्त अधिकारी, कर्मचारी, विकासक, वास्तुविशारद, सनदी लेखापाल, उद्योजक, नोकरदार यांनी तयारी दर्शविली आहे. चळवळीत सहभागी होण्यासाठी महिलांचा उत्साह मोठय़ा प्रमाणात आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीतील अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्तपणे आपल्या संस्थांसह या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे या चळवळीतील एक निमंत्रक प्रा. उदय कर्वे यांनी सांगितले.
डोंबिवली शहरात पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बकालपणा आला असून कचरा, रस्ते, अनधिकृत बांधकामे यांसारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहेत. शहराचे हे बकालपण बघवत नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून शहराचा होत असलेला उकिरडा दूर होण्याची सुतराम शक्यता नाही. पाच वर्षांनंतर निवडणुकीत लोकप्रतिनिधी मतांचे घेणेकरी आणि मतदार देणेकरी या भूमिकेत राहिले तर डोंबिवली शहर स्वत:चे अस्तित्व गमावून बसेल. शांत, सुंदर डोंबिवलीचे दर्शन दुर्लभ झाल्यामुळे अशा बिगर राजकीय चळवळीची या शहराला गरज होती. ती पूर्ण होत आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी निमंत्रकांकडे व्यक्त केल्या आहेत. याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बिगर राजकीय चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पोलिसांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. चळवळीचे संघटन आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरविण्यासाठी लवकरच सर्व सहभागी नागरिकांची एक बैठक निमंत्रकांतर्फे आयोजित करण्यात येणार आहे.