जालना शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस वीजजोडणी देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधिमंडळात दिले. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंटय़ाल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या विविध पक्षीय आंदोलनातील पुढील कार्यक्रम आता स्थगित करण्यात आले आहेत.
भाजपचे खासदार रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरविंद चव्हाण, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सोहेल सिद्दिकी, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे, मनसेचे जि. प. सदस्य रवी राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार गोरंटय़ाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, वीजजोडणी देण्यात येणार असल्याने पुढील आंदोलन मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांनी आपणास दूरध्वनीवरून सांगितले. त्यामुळे आता येथून पुढे होणारा मोर्चा व जालना ‘बंद’ आंदोलन स्थगित केले आहे. विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल गोरंटय़ाल यांनी यावेळी त्यांना धन्यवाद दिले.
विनोद तावडे व एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला. अन्य पक्षांच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी वीजजोडणी देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. अरविंद चव्हाण म्हणाले की, ज्या सरकारने पाणी योजनेसाठी पावणेदोनशे कोटी दिले, ते सरकार वीजजोडणीही देईल, असा आपला विश्वास होता. विधिमंडळात घोषणा होण्यापूर्वी दुपारी जालना स्थानकावर वीज जोडणीच्या मागणीसाठी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेससमोर रेल रोको आंदोलन करण्यात आले. आमदार गोरंटय़ाल, खासदार दानवे, अरविंद चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वीजजोडणी देण्याच्या पवार यांच्या घोषणेबद्दल समाधान व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी आपल्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली, तेव्हा त्यांनी या प्रश्नातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही हा प्रश्न उपस्थित करून स्थगन प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले होते. या संदर्भात विविध पक्ष, सामाजिक संघटना,   व्यापारी, उद्योजक आदींनीही दोन-तीन दिवस शहरात आंदोलन केले होते.
पालकमंत्री राजेश टोपे यांनी वीज जोडणीच्या घोषणेबद्दल अजित पवार यांचे जालना शहरातील जनतेच्या वतीने आभार मानले. टोपे यांच्याकडून पत्रकात म्हटले आहे की, टोपे व गोरंटय़ाल यांनी योजनेस निधी मिळण्यासाठी अनेकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे विशेष बाब म्हणून सरकारने योजनेस ८० कोटी दिले. वीजजोडणीच्या अनुषंगिक कामासाठी पालकमंत्री टोपे यांनी जिल्हा नियोजन समितीने अडीच कोटी रुपये दिले.