* जिल्ह्य़ातील ७१ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये
* राज्यातील २६ जिल्ह्य़ांपेक्षा ठाणे तालुक्याची लोकसंख्या अधिक
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ात एकूण १३ तालुके असले, तरी त्यापैकी तब्बल ७१ टक्के लोकसंख्या ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आणि वसई या सहा तालुक्यांच्या शहरी भागांमध्ये एकवटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही तीन महापालिकांचा समावेश असणाऱ्या ठाणे तालुक्याची लोकसंख्या तब्बल ३८ लाख आहे. राज्यातील ३५ पैकी २६ जिल्ह्य़ांच्या लोकसंख्येपेक्षा ठाणे तालुक्याची लोकसंख्या अधिक आहे. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्य़ाची लोकसंख्या १ कोटी १० लाख ५४ हजार १३१ इतकी आहे. त्यापैकी तब्बल ७८ लाख ६८ हजार ४०३ इतकी लोकसंख्या ठाण्याच्या शहरी भागातच आहे. जनगणनेची ही आकडेवारी मुंबईचेच एक विस्तारित रूप असलेल्या ठाणे तालुक्याचे मुंबईच्या धर्तीवर उपनगर जिल्ह्य़ात रूपांतर करून उर्वरित जिल्ह्य़ाचे विभाजन करावे, या मागणीस पुष्टी देणारी आहे. २००१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्य़ाची लोकसंख्या ८१ लाख ३१ हजार ८४९ इतकी होती. म्हणजे दहा वर्षांत जिल्ह्य़ाच्या लोकसंख्येत २९ लाख २२ हजार २८२ इतकी भर पडली. लोकसंख्या वाढीचे हे प्रमाण तब्बल ३५.९३ टक्के इतके आहे. गेल्या दशकभराहून अधिक काळ ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनाचा प्रश्न मांडला जात आहे. मात्र नव्या जिल्ह्य़ाचे मुख्यालय कुठे असावे, या मुद्दय़ावर एकमत होत नसल्याने बराच काळ हा विषय रेंगाळला आहे. जिल्हा विभाजनासंदर्भात वस्तुस्थितीचे अवलोकन करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिल्यानंतर आता लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.      
शहरीकरण प्रत्यक्षात ८० टक्क्य़ांच्या घरात
तीस वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्य़ात एकही महापालिका नव्हती. १९८२ मध्ये स्थापन झालेली ठाणे ही जिल्ह्य़ातील पहिली महापालिका. सध्या जिल्ह्य़ात सात महापालिका आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या सव्वा चार लाखांच्या घरात आहे. म्हणजे सहजपणे आणखी एका महापालिकेची जिल्ह्य़ात भर पडू शकते. कल्याण तालुक्यातील २७ तसेच ठाणे तालुक्यातील १४ गावांनी तीव्र लढा देऊन अनुक्रमे कल्याण-डोंबिवली तसेच नवी मुंबई महापालिकेत जाण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहिले असले, तरी ही गावे शहरीकरण मात्र थोपवू शकली नाहीत. त्याचबरोबरच वाडा, कुडूस, मुरबाड, शहापूर, बोईसर आदी गावांचे बऱ्यापैकी शहरीकरण झालेले आहे. अंबरनाथ तालुक्यातील काही गावे आता विस्तारित बदलापूरचा भाग म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. जिल्ह्य़ाच्या सीमेवरील वांगणी या गावासही नगरपालिकेचे वेध लागले आहेत. पालघर तालुक्यातील बोईसर येथे लवकरच नगरपालिका स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन नुकतेच मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. शहरीकरण झालेल्या या गावांची लोकसंख्या लक्षात घेतली तर जिल्ह्य़ाच्या शहरी लोकसंख्येचे प्रमाण सहज ८० टक्क्य़ांहून अधिक होईल.      
नागरी लोकवस्त्यांचे ठाणे  
ठाणे महापालिका-                      १८ लाख १८ हजार ८७२,
नवी मुंबई महापालिका-               ११ लाख १९ हजार ४७७
मीरा-भाईंदर महापालिका-              ८ लाख १४ हजार ६५५
वसई-विरार महानगरपालिका-         १२ लाख २१ हजार २३३
कल्याण-डोंबिवली  महापालिका-    १२ लाख ४६ हजार ३८१
भिवंडी महानगरपालिका-               ७ लाख ११ हजार ३२९    
उल्हासनगर महापालिका                ५ लाख ६ हजार ९३७
अंबरनाथ नगरपालिका-                 २ लाख ५४ हजार ३
बदलापूर नगरपालिका                    १ लाख ७५ हजार ५१६.
एकूण लोकसंख्या-                      ७८ लाख ६८ हजार ४०३.