घाटावर पिकणाऱ्या उसाप्रमाणेच कोकणातही गोड ऊस पिकवला जाऊ शकतो, हा प्रयोग उरणच्या शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा ऊस येथील शेतकरी किसन गोंधळी यांनी पिकवला असून, त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले ही ऊसशेती करत आज चांगले आर्थिक उत्पन्न मिळवीत आहेत. वर्षांतील सात महिन्यांत केवळ ५० हजार खर्च करून अडीच लाखांचे उत्पन्न या उसाच्या शेतीतून मिळत असल्याची माहिती त्यांच्या मुलांनी दिली आहे. 

उरण व रायगड तसेच कोकण परिसरात केवळ भातशेती आणि काही प्रमाणात भाजीपाला, याशिवाय नारळ, सुपारी आदी पिके घेतली जातात. खाडी किनाऱ्यावर वसलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील शेतकरी किसन गोंधळी हे चिरनेरच्या नाक्यावर रसवंती गृह चालवीत होते. त्यासाठी त्यांना ऊस विकत आणावा लागत होता. या व्यवसायात बाहेरील उसाला अधिक पैसे मोजावे लागत होते. ते परवडत नसल्यामुळे पाच वर्षांपूर्वी गोंधळी यांनी आपले मित्र मोहन पवार या घाटावरील शिक्षकांच्या मदतीने घाटावरून उसाची बी आणून आपल्या दीड एकर जमिनीत तिची पेरणी केली व उसाची शेती करण्याचा प्रयोग करून पाहिला आणि आश्चर्य म्हणजे तो प्रयोग यशस्वी झाला. या प्रयोगामुळे उसासाठी पोषण हवामान नसतानाही कोकणातही उसाची शेती होऊ शकते हे कोकणातल्या शेतकऱ्यांना दाखवून त्यांनी आपला आदर्श निर्माण केला. उसातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने गोंधळी यांनी शेजारील शेतात दहा गुंठय़ांचा तलावही केला आहे. या तलावातील पाणी ११ महिन्यांच्या उसाच्या पिकाला पुरून शिल्लक राहत आहे. दीड एकरात पिकवण्यात येणाऱ्या उसाला बाजारात विकला असता तर आज सहा हजार रुपये टनाच्या किमतीत दीड लाख रुपये मिळाले असते, परंतु गोंधळी यांच्या मुलांनी तसे केले नाही. चार वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर संग्राम आणि संदीप गोंधळी या त्यांच्या दोन मुलांनी त्यांचा हा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू ठेवला आहे. दीड लाखाऐवजी वार्षिक तीन लाख रुपयांचे उत्पन्न आज ते मिळवत असून ५० हजारांचा खर्च वजा केल्यास अडीच लाखांचा नफा ही दोन्ही मुले आज कमावत आहेत. सध्याच्या परिस्थितीत उरणसारख्या औद्योगिक परिसरात शेती हा आतबट्टय़ाचा व्यवसाय झाला आहे. शेतीची विक्री करून शेतकरी धनवान होत असताना या दोन्ही भावंडांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय मोठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उसाच्या रसाच्या व्यवसायाची दिवसेंदिवस भरभराट होऊ लागल्याने शेतीत पिकवला जाणारा ऊसही आता कमी पडू लागला आहे. त्यामुळे उसाच्या शेतीचे क्षेत्र वाढवणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची माहिती संग्राम गोंधळी यांनी दिली आहे.

शेती विभागाचे दुर्लक्ष
चिरनेरमधील प्रयोगशील शेतकरी पारंपरिक भातशेती सोडून नगदी पीक असलेले तसेच पोषक हवामान नसलेले उसासारखे पीक घेऊन नफा कमावण्याचे उदाहरण निर्माण करीत आहेत. मात्र रायगड जिल्ह्य़ातील शेती विभागाने या प्रयोगशील शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या संदर्भात उरण तालुक्याचे कृषी अधिकारी काशिराम वसावे यांच्याशी संपर्क साधला असता एकच पिकात प्रयोग केला असल्याने त्यांचे नाव प्रयोगशील शेती पुरस्कारासाठी पाठवता येत नाही, मात्र त्यांच्या व्यवसायातील वाढीसाठी अनुदानाचा प्रस्ताव तयार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी लवकरच शेती शास्त्रज्ञांची एक टीम येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.