पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे सध्या रोज नवे प्रकरण बाहेर पडत असतानाच आता प्रश्नपत्रिका पूर्ण न तपासताच निकाल जाहीर करण्याची नवीन करामत परीक्षा विभागाने करून दाखवली आहे. अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये हा गैरप्रकार आढळून आला. पुनर्मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेची छायाप्रत (फोटो कॉपी) पुन्हा तपासणे अपेक्षित असताना ती न तपासताच विद्यार्थ्यांचा ‘निकाल’ लावण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
अभियांत्रिकी शाखेची परीक्षा मे-जूनमध्ये झाली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी मिळून साधारण नव्वद हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र, अभियांत्रिकी शाखेची पुढील सत्र परीक्षा सुरू होऊनही अनेक विषयांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सत्र परीक्षा द्यावी लागली. मात्र, उत्तरपत्रिकेच्या प्रत्यक्ष छायाप्रती माहितीच्या अधिकाराद्वारे हाती आल्या, त्यावेळी त्यामध्ये अनेकांच्या उत्तरपत्रिका अर्धवट तपासलेल्या आढळल्या. याशिवाय इतरही चुका लक्षात आल्या.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रति दिल्या जातात. त्या देण्यापूर्वी तपासणे व आधीच्या चुका सुधारून त्यानुसार निकाल बदलणे अपेक्षित असते. मात्र, या निकालात बदल नसल्याचे पत्र विद्यापीठाकडून अनेक विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहे. अशा छायाप्रति अनेक विद्यार्थ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार उत्तरपत्रिकेतील प्रश्न तपासण्यात आलेले नाहीत, काही प्रश्नांचे गुण एकूण गुणांमध्ये धरण्यात आलेले नाहीत. काही उत्तरपत्रिकांमध्ये तर विद्यार्थ्यांनी जे प्रश्न सोडवलेले नाहीत, त्यालाही गुण देण्यात आले आहेत आणि सोडवण्यात आलेले प्रश्न तपासलेले नाहीत, असे घोटाळे छायाप्रतीनुसार दिसून येत आहे.
वास्तविक पुनर्मूल्यांकनाच्या निमित्ताने उत्तरपत्रिका तपासताना पूर्वी झालेली चूक सुधारण्याची एक संधी विद्यापीठालाही मिळाली होती. तरीही विद्यापीठाने उत्तरपत्रिका पूर्ण न तपासताच विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. सध्या वीस विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासताना अशा प्रकारच्या चुका झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, सूत्रांनुसार हा आकडा कितीतरी पटीने अधिक असल्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थी मूळ निकालानुसारच उत्तीर्ण होण्याची शक्यता असताना त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. त्यानंतर पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावतानाही विद्यापीठाने केलेला निष्काळजीपणा दाखवला आहे.
परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची निराशा, परत त्याच विषयाची परीक्षा, अशा तणावांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पुढील वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रवेश घेतले होते, ते प्रवेश आता धोक्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेने केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘आम्ही हातात उत्तरपत्रिका आल्यानंतर त्यातील प्रश्न तपासण्यात आले नसल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, पुनर्मूल्यांकनाचा निकाल आल्यानंतर काही अडचणी असतील तर या, असे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, पुनर्मूल्यांकनानुसारही निकालात बदल नसल्याचे पत्र विद्यापीठाने पाठवले आहे.’     

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची नवी करामत
 पुनर्मूल्यांकनामध्येही उत्तरपत्रिकांची तपासणी नाही
 माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिका मिळाल्याने गैरप्रकार उघड
 गैरप्रकार झाल्याची परीक्षा नियंत्रकांची कबुली

गैरप्रकार झाल्याची परीक्षा नियंत्रकांची कबुली
याबाबत परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना उत्तरपत्रिकांच्या तपासणीत चुका झाल्याची कबुली दिली. त्या म्हणाल्या, ‘उत्तरपत्रिकांच्या तपासणीमध्ये चुका झाल्या आहेत, पुनर्मूल्यांकनाचे निकालही उशिरा लागले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना तक्रारी आहेत, त्यांचे निकाल नव्याने पाठवण्यात येतील. अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे सध्या नेमक्या किती विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत असा प्रकार घडला आहे, ते नेमके सांगणे कठीण आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केली आहे. त्यांच्या उत्तरपत्रिका तपासलेल्या शिक्षकांवर आणि मॉडरेटरवर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठीही परीक्षा विभागांकडून उपाय करण्यात येत आहेत.’