लातुरात दोन, हिंगोलीत एकाचा मृत्यू
लातूर जिल्ह्य़ात बुधवारी रात्री विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. औसा तालुक्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दोन जनावरे दगावली. जळकोट परिसरात जोरदार पाऊस झाला. रस्त्यावर झाडे पडल्याने काही तास वाहतूक खोळंबली होती.
औसा तालुक्याच्या काही भागात सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसादरम्यान माळकोंडजी येथील शेतकरी व्यंकट विभुते (वय ६२) सुरक्षित स्थळी जात असताना अंगावर वीज कोसळून ते जागीच ठार झाले. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. किनीथोट येथे कडब्याच्या गंजीवर प्लास्टिक झाकण्यास गेलेल्या हरी कांबळे या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळली. जवळच असलेल्या गंजीने पेट घेतला. या घटनेत कांबळे यांचा मृत्यू झाला. वीज पडून म्हाळुंब्रा येथे बैल व हसेगाववाडी येथे गाय दगावली.
लातूर शहरात रात्री नऊच्या सुमारास पडलेल्या हलक्याशा पावसाने लातूरकरांना असह्य़ उकाडय़ापासून दिलासा दिला. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची मात्र धांदल उडाली.
सखल भागात पाणी साचले. जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोळनूर, जळकोट व गुत्ती येथील ३३ केव्ही केंद्र बंद पडल्याने वीज गायब झाली. रस्त्यावर मोठमोठी झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली होती. घोणशी शिवारात नामदेव सांगवे यांच्या गोठय़ावर बाभळीचे झाड कोसळून गोठय़ातील म्हैस जखमी झाली. निलंगा तालुक्यातील निटूर व काही परिसरात पावसाने हजेरी लावली.