कुणाच्या घरात एका मुलीचे नाव यादीत आहे तर इतर सदस्यांची नावे गायब तर कोणाच्या घरातील सर्व सदस्यांची नांवे यादीत आहेत तर एकाचे नांव गायब. काही घरातील सर्वच्या सर्व सदस्यांची नांवे गायब.. मतदार यादीतील घोळाचे असे विविध नमुने मतदान प्रक्रियेला केवळ दोन दिवस शिल्लक असताना पुढे येत आहे. आजतागायत नियमितपणे मतदान करणाऱ्या अनेकांची नावे गायब झाल्यामुळे संबंधितांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात शिवसेना आणि काही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारदारांनी स्पष्ट नावांसह तक्रारी सादर केल्यास काही कारवाई करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पुणे शहरात हजारो उमेदवारांची नांवे यादीतून गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होते की काय, याची धास्ती मतदारांना वाटत आहे. शहरातील राजीवनगर, इंदिरानगर, गंगापूर रोड, सिडको, कॉलेजरोड आदी भागात मतदार चिठ्ठींचे वाटप सुरू झाल्यावर यादीतील करामती समोर येऊ लागल्या. राजीवनगर व इंदिरानगर भागात शेकडो नागरिकांची नांवे मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याकडे शिवसेनेने एका निवेदनाद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या शिवाय, काही नागरिक वैयक्तिकपणे तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मतदार यादीतून नाव गायब होण्याचे प्रकार विचित्र स्वरूपाचे आहेत. कॉलेज रोडवर वास्तव्यास असणाऱ्या सृष्टी जैन तीन वर्षांपूर्वी पतीसह परदेशातून नाशिकमध्ये स्थायिक झाल्या. पती, सासू व सासरे यांची नांवे मतदार यादीत असली तरी त्यांचे नांव यादीत नाही. कुटुंबीयांच्या मतदार चिठ्ठी आल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्याचे जैन यांनी सांगितले. इंदिरानगर येथे राहणाऱ्या मधुकर टकले यांच्या कुटुंबीयांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आपण मागील चाळीस वर्षांपासून मतदानाचा अधिकार बजावत आहोत. परंतु, मतदार याद्यांची तपासणी केली असता आपल्या स्वत:सह मनीषा टकले व अश्विनी टकले यांची नांवे गायब झाल्याचे लक्षात आले, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आज दाद मागूनही काय उपयोग होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजीवनगर परिसरातील अनेकांची नांवे या पद्धतीने गहाळ झाल्याचे टकले यांनी सांगितले. गंगापूर रस्त्यावरील काही भागात महापालिका निवडणुकीत मतदान करणाऱ्या काही मतदारांची नांवे गहाळ असल्याचे नगरसेविका सीमा हिरे यांनी सांगितले.
अभोळकर गल्लीत वास्तव्यास असलेल्या जोशी कुटुंबीयांच्या यादीत वेगळाच प्रकार निदर्शनास आला. जोशी यांची मुलगी ज्ञानदा हिचे नांव यादीत आहे, पण खुद्द त्यांच्यासह पत्नी, भाऊ व वहिनीचे नांव गायब झालेले आहे. तसेच काही प्रकार त्यांच्या आसपासच्या कुटुंबीयांबाबतही घडले आहेत. फावडे लेनमध्ये वास्तव्यास असलेल्या अविनाश खैरनार यांच्या मुला-मुलीने विशेष मोहिमेत नांवनोंदणी केली होती. त्यात मुलीचे नाव यादीत समाविष्ट झाले, पण मुलाचे नाव समाविष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादीतील घोळाचे असे वेगवेगळे नमुने पुढे येत असून यामुळे मतदानापासून नाहक वंचित राहण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात शिवसेनेसह काही वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले. शिवसेनेला स्पष्ट नांवासह तक्रारी करण्यास सांगण्यात आले आहे. स्पष्ट स्वरूपात नावासह तक्रारी आल्यास काही कारवाई करणे शक्य होईल, असे पाटील यांनी सांगितले.
सुमारे पावणेदोन लाख मतदारांच्या नांवाला कात्री
मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेंतर्गत झालेल्या छाननीच नाशिक जिल्ह्यातील तब्बल एक लाख ७१ हजार मतदारांची नांवे कमी करण्यात आली होती. त्यात ८२, २८८ स्थलांतरित, १५,१३७ दुबार नांवे तर १८,१९१ मृत झालेल्या मतदारांच्या नावांचा समावेश आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक यंत्रणेने विशेष मोहीम राबविली. त्या वेळी ९१ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ८० हजार ७६२ अर्ज स्वीकारण्यात आले. उर्वरित ११ हजार अर्ज नामंजूर करण्यात आले. विशेष मोहिमेंतर्गत ८० हजार ७६२ मतदारांची नांवे पुरवणी मतदार यादीत समाविष्ट होणार असल्याचे यंत्रणेने जाहीर केले होते.
जिल्ह्यात एकूण ३८ लाख ८७ हजार ६६५ मतदार
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण जिल्ह्यात मतदारांची संख्या ३८ लाख ८७ हजार ६६५ इतकी आहे. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी या लोकसभा मतदारसंघासह धुळे मतदारसंघाचाही काही भाग समाविष्ट होतो. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात १५ लाख ९३ हजार ५०५ मतदारांची संख्या असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १५ लाख २९ हजार ८६४ इतके मतदार आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या सात लाख ६४ हजार २९६ आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी २० लाख ५५ हजार २१६ पुरुष तर १८ लाख २३ हजार ४९० महिला मतदार असल्याची माहिती निवडणूक शाखेने आधीच जाहीर केली आहे.
मतदार जागृती अभियानाची ‘गर्जना’
भारतीय घटनेने मतदान करण्याचा अमूल्य अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. पण, मतदारानाच्या दिवशी ५० टक्के मतदार गैरहजर राहून घटनेची पायमल्ली करतात. यामुळे अयोग्य उमेदवार निवडून आल्यावर पाच वर्षे त्याच्या नांवे उलट आरडाओरड केली जाते. मतदानाचा अधिकार न बजावता लोकशाहीच्या नावाने खडे फोडणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गोविंदनगर, मुंबई नाका येथील गर्जना फाऊंडेशन सामाजिक संस्थेने ‘आपला हक्क आपले मतदान’ या नावाने संकल्पपत्र तयार केले आहे. या संकल्पपत्राच्या एक लाख प्रती मतदारापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत.

पुण्यानंतर नाशकात धोक्याची घंटा
पुणे व कोकणात पार पडलेली मतदान प्रक्रिया पाहिल्यास ‘ज्याच्या हाती सत्ता तो पारधी’ असे लक्षात येते. ही मंडळी कुठल्याही थराला जावू शकतात. कुठे पैशाचा तर कुठे मद्याचा महापूर. कोकणात मतदान यंत्रात काही भानगडी झाल्याच्या बातम्या आल्या तर पुण्यात कळस म्हणजे हजारो मतदारांची नांवे गहाळ करण्यात आली. निवडणूक जिंकायची तर ती कोणत्याही थराला जाऊन जिंकलीच पाहिजे, अशी उमेदवारांची वृत्ती झालेली दिसते. ज्या ठिकाणी उमेदवार मनगटी दंडेलशाही करतात, त्याच ठिकाणी अशा गोष्टी घडल्याचे दिसते. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाशिकमध्ये मतदान होत असून मतदारांनी अतिशय शांतपणे मतदान यंत्र पाहून मतदान करावे. कारण, राज्यातील इतर भागांसारखे या ठिकाणी होऊ शकते. मागील लोकसभा निवडणुकीत काही भागात राजरोस बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यंदा तर बोगस मतदानाची अत्याधिक शक्यता आहे. मतदानाचा दिवस म्हणजे मनगटांना काम, अशी आजची स्थिती आहे. हे चित्र बदलायचे असेल तर मतदारांनी सावधपणे मतदान करावे.
– चंद्रशेखर गावित

माहिती अधिकाराचे अस्त्र वापरावे
नाशिकसह राज्यातील अनेक भागांत हजारो मतदारांची नांवे मतदार यादीतून गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर, ज्या मतदारांची नांवे निवडणूक शाखेने परस्पर मतदाराला न विचारता अथवा मतदाराने तशी मागणी केलेली नसताना वगळली तर अशा मतदाराने माहितीच्या अधिकारात नांव वगळण्याचे कारण विचारल्यास संबंधित निवडणूक शाखेला मतदाराचे स्वत:चे नाव वगळण्याचे कारण देणे बंधनकारक आहे. किंबहुना माहितीच्या अधिकारात अशी माहिती निवडणूक शाखेने स्वत:हून प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. माहितीचा अधिकार कायद्यान्वये लोकांना बाधा पोहोचते अशी महत्त्वाची धोरणे आखताना आणि असे निर्णय जाहीर करताना सर्व संबंधित वस्तुस्थिती प्रसिद्ध करणे तसेच आपल्या प्रशासनिक किंवा न्यायिकत्व निर्णयाबाबतची कारणे बाधित व्यक्तींना कळवतील. त्यानुसार निवडणूक शाखेने ज्या मतदारांची नांवे कमी किंवा वगळलेली आहेत, अशा सर्व लोकांना त्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेतल्यामुळे ते मतदानापासून वंचित होत असल्याने निवडणूक शाखेने नाव वगळण्याची माहिती स्वत:हून देणे बंधनकारक होते. याबाबत मतदार तसेच राजकीय पक्षही अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते. ज्या मतदारांची नांवे वगळलेली आहेत, अशा हजारो मतदारांनी एकाच वेळेस माहितीच्या अधिकारात अर्ज करून त्यामागील कारणांची मागितल्यास निवडणूक शाखेत धावपळ उडेल. ही कारणे देणे निवडणूक शाखेला बंधनकारक आहे. उपरोक्त अर्जाला उत्तर देताना स्पष्ट कारण दिले नाही दिशाभूल करणारे कारण दिले किंवा खोटी माहिती दिली तर संबंधित जन माहिती अधिकारी अडचणीत येऊ शकतात. त्यांना दंड अथवा शिस्तभंग कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच यापुढे परस्पर नांवे वगळण्याची चूक न करता जबाबदारीने काम करतील.
प्रशांत देशमुख (माहिती अधिकार कार्यकर्ता)

या टप्प्यावर  काही होणे नाही..
गेल्या वर्षभरात मरण पावलेले मतदार, एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असलेले मतदार किंवा मूळ पत्त्यावर राहत नसलेल्या मतदारांची पूर्ण चौकशी करून मतदार यादीतून नांवे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात येणाऱ्या मतदारांबाबत प्रत्येक मतदारसंघनिहाय नावानिशी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच ९ मार्च रोजी विशेष मोहिमेद्वारे हजारो मतदारांची नांवे चौकशीअंती संबंधित मतदार यादीमध्ये नोंदविण्यात आली आहेत. आता निवडणुकीच्या या टप्प्यावर कोणत्याही नावाचा नव्याने समावेश करणे शक्य होणार नाही. मतदार ओळखपत्र असेल आणि मतदार यादीत नाव नसेल तरी मतदान करता येणार नाही. मतदार ओळखपत्र दिल्यानंतरही मतदार स्थलांतरित होत असतात.
जिल्हाधिकाऱ्यांचे  जाहीर निवेदन