जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर प्रकल्पात ठरल्याप्रमाणे जागा न दिल्याबद्दल कारवाईचा इंगा दाखवत बडय़ा बिल्डरांकडून ‘म्हाडा’ने जवळपास ६५ हजार चौरस फूट जागा ताब्यात घेतली असून आता ‘डीबी रिअ‍ॅल्टी’ या राजकीयदृष्टय़ा ‘पॉवर’फुल असलेल्या बिल्डरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या काही महिन्यांत त्यांच्याकडे प्रलंबित असलेली १७५४ चौरस मीटर जागा ताब्यात घेण्याच्यादृष्टीने ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या मोबदल्यात ‘म्हाडा’ला जागा देण्याचे बंधन होते. पण ३३ बिल्डरांनी सर्व नियम धाब्यावर बसवत ‘म्हाडा’ला ठेंगा दाखवला आणि सुमारे एक लाख २२ हजार चौरस फूट जागा खिशात घातली. कसल्याही कारवाईची भीती नसल्यानेच बिल्डरांनी हे दुसाहस केले. सर्वसामान्यांच्या हक्काची ही जागा बिल्डरांकडून परत मिळवण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या आदेशानुसार ‘म्हाडा’ने या ३३ बिल्डरांना पुन्हा एकदा जागा देण्याबाबत नोटिस बजावली होती. त्यानुसार एक-एक प्रकरण हातावेगळे करण्यात येत आहे. नुकतीच ‘सुमेर समूहा’कडून ११४ घरे घेण्यात ‘म्हाडा’ला यश आले.
माटुंगा, दादर, प्रभादेवी, मुंबई सेंट्रल, भायखळा, माझगाव आदी ठिकाणी ही जागा असल्याने सर्वसामान्यांना मुंबईच्या मध्यवर्ती भागात हक्काचे घर मिळण्याची संधी आहे. त्यामुळे इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने आता जागा दाबून बसलेल्या उरलेल्या बडय़ा बिल्डरांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता ‘डी. बी. रिअ‍ॅल्टी’ या राजकीय लागेबांधे असलेल्या बिल्डरकडे या मध्यवर्ती मुंबईत तब्बल १७५४ चौरस मीटर जागा प्रलंबित आहे. अद्याप त्यांनी ही जागा ‘म्हाडा’ला दिली नसल्याने आता ती ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, असे समजते. याबाबत मंडळाचे मुख्याधिकारी मोहन ठोंबरे यांच्याकडे विचारणा केली असता, एकूण साडे तेरा हजार चौरस मीटर जागा ३३ बिल्डरांकडे प्रलंबित होती. ‘म्हाडा’ला ती सोपवली जात नव्हती. कारवाई सुरू केल्यानंतर आता एक-एक बिल्डर जागा देत आहे. ‘डी. बी. रिअ‍ॅल्टी’ने सुमारे १७ हजार चौरस फूट जागा ‘म्हाडा’ला देणे बाकी आहे. त्यांनी काही तांत्रिक मुद्दे पुढे केले आहेत. पण ते लवकरात लवकर मार्गी काढून येत्या काही महिन्यांत ही जागाही ‘म्हाडा’च्या ताब्यात येईल, असे ठोंबरे यांनी सांगितले.